नवीन लग्न झालेल्या मुलींची पहिली पाच वर्षं मंगळागौर(Mangalagauri 2025) करतात आणि सर्व वयोगटातल्या बायका त्यात आनंदाने सहभागी होतात. कारण, निमित्त जरी नववधूच्या कोडकौतुकाचे असले तरी हा सण सगळ्याच बायकांना विरंगुळा देणारा आहे. त्यामुळे छोट्या मुलींपासून अगदी आजीबाईसुद्धा नटून थटून मंगळागौरीला जातात, गप्पा, गाणी, उखाणे, खेळ, खाऊ अशी धमाल करतात.
यंदा २५ जुलै रोजी श्रावणमास(Shravan 2025) सुरु होत आहे, तर पहिली मंगळागौर २९ जुलै रोजी पुजली जाईल. त्यादिवशी नागपंचमीचाही(Nag Panchami 2025) सण आहे. पूर्वी विवाहित बायका नागदेवतेला आपला भाऊ मानून पूजा करत असत. आपल्या सौभाग्यासाठी प्रार्थना करत असत. कालौघात प्रत्यक्ष नागपूजन होत नसले तरी पाटावर रांगोळी काढून घरोघरी पूजा केली जाते. आदल्या दिवशी मेहेंदी लावली जाते. नवे कपडे, दागिने घालून मिरवले जाते. यावेळेस तर योगायोगाने पहिली मंगळागौर त्याच दिवशी आल्याने उत्साह द्विगुणित होईल हे नक्की!
मंगळागौरीच्या तारखा
त्यानंतर २९ जुलै,
५ ऑगस्ट
१२ ऑगस्ट
१९ ऑगस्ट
तयारी कशी कराल?
१२ ऑगस्ट रोजी अंगारक संकष्टीचा(Angarak Chaturthi 2025) योग आला आहे.
त्यामुळे अनेकांचे उपास लक्षात घेऊन त्याप्रमाणे मेन्यू ठरवता येईल. कारण, सध्या मंगळागौरीचेही स्वरूप बदलले आहे. पूर्वी घरगुती प्रमाणात खेळली जाणारी मंगळागौर आता हॉल घेऊन, सजावट करून, शे-दोनशे लोकांना बोलवून साजरी केली जाते. मंगळागौरीचे खेळ, गाणी सगळ्यांना पाठ नसतात, त्यामुळे ते सादर करणारे महिला पथक बोलावले जाते. नव्या नवरीने घातलेली फुगडी, घेतलेला उखाणा सर्वांचे लक्ष वेधून घेतो.
या नवीन लग्न झालेल्या मुलींना वशेळी म्हणतात. सौभाग्य टिकून राहावे यासाठी लग्नानंतर पहिली पाच वर्षे मंगळागौरीची यथासांग पूजा करतात, जागरण करतात, देवीची आरती करतात आणि तिची कृपा प्राप्त व्हावी अशी प्रार्थना करतात. सकाळी पूजा आणि संध्याकाळी खेळ, नाच, गाणी असा कार्यक्रम रंगतो.
या दिवशी सकाळी स्नान करून पूजा करण्यात येते.त्यात मंगळागौर म्हणजे पार्वतीची धातूची मूर्ती (माहेरून आणलेली अन्नपूर्णेची मूर्ती) मांडण्यात येते. शेजारी महादेवाची पिंडही ठेवतात. मंगळागौरीची षोडषोपचारपूजा करतात. मग आरती करून प्रसाद वाटला जातो. त्यानंतर पूजेसाठी आलेल्या सवाष्णींचे भोजन होते. रात्री जागरणाच्या वेळी, विविध खेळ खेळण्याचा प्रघात आहे. खेळांमध्ये परंपरागत चालत आलेली गाणीही म्हणतात - लाट्या बाई लाट्या सारंगी लाट्या, अठूडं केलं गठूडं केलं आदी गाणे म्हणण्यात येतात. नऊवारी लुगडे नेसून व नाकात नथ, पारंपरिक दागिने घालून हे व्रत करण्यात येते.वटवाघूळ फुगडी, बस फुगडी, तवा फुगडी, फिंगरी फुगडी, वाकडी फुगडी, आगोटापागोटा, साळुंकी, गाठोडे, लाटा बाई लाटा, घोडा हाट, करवंटी झिम्मा, टिपऱ्या, गोफ, सासू-सून भांडण, अडवळ घुम पडवळ घुम, सवतीचे भांडण, दिंड, घोडा - इत्यादी. असे साधारणतः ११० प्रकारचे खेळ यात खेळले जातात.यात सुमारे २१ प्रकारच्या फुगड्या, ६ प्रकार आगोटा पागोट्याचे असतात.
या सर्व खेळ प्रकारांमुळे शरीराच्या विविध अवयवांना व्यायाम होतो. अर्थात हे खेळ खेळण्यासाठी शरीर तेवढे लवचिक हवे. पूर्वीच्या काळी केवळ घरातील कामे करणाऱ्या महिलांना या खेळातून आनंदही मिळे. हे खेळ खेळताना महिला जोडीने गाणीही म्हणतात. मंगळागौर हे व्रत कष्टाचे, दमणुकीचे नसून चापल्य देणारे, चैतन्य देणारे व सामूहिक जीवनाचा आनंद देणारे आहे.
आता तर या खेळांमध्ये नवरदेवही आनंदाने सहभागी होतात. बायकोबरोबर फुगडी घालतात, उखाणा घेतात. सगळा महिला वर्ग त्यांच्याभोवती फेर धरून त्यांचे नाते फुलवतो. उत्सवमूर्तीही आनंदात असते. फोटो, व्हिडीओ, सेल्फी, रिल्स यामुळे कार्यक्रमात रंगत येते. दुसऱ्या दिवशी ऑफिस असल्याने अनेक जणी नाईलाजाने जागरण आटोपते घेतात, पण मनात आनंदाचा ठेवा घेऊन जातात.
तुमची पहिली मंगळगौर असेल किंवा तुम्ही कोणाच्या मंगळागौरीला जाणार असाल तर मस्त नऊवारी साडी, नथ, दागिने यांची आत्ताच खरेदी करून ठेवा आणि हो, थोडाफार खेळांचाही सराव सुरु करा!