Join us  

लग्न मानवलं तुला, सुधारली तब्येत असं अनेकींना ऐकावं लागतं, का वाढतं लग्नानंतर वजन ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 5:15 PM

लग्न झाल्यानंतर अनेकींची तब्येत सुधरलेली दिसते. मग साहजिकच ''हं..... लग्न मानवलं हं तुला..., छान झालीये तब्येत... '' असे बहुतांश मुलींना ऐकावे लागते. काय आहे बरं हे नेमकं.. लग्न झाल्यावर वर्षभरातच अनेक जणी जाड का होतात.... ?

ठळक मुद्देलग्नानंतर अवघ्या एका वर्षातच ८० टक्के तरूणींची तब्येत सुधारते. पुरूषांच्या बाबतीत हे प्रमाण ४० ते ५० टक्के एवढे आहे. लग्नानंतर महिलांच्या शरीरात अनेक हार्मोनल बदल होत असतात. त्याचाही परिणाम वजन वाढण्यावर होतो. (सर्व छायाचित्रे प्रातिनिधिक असून सजावटीसाठी आहेत.)

लग्नासाठी ब्लाऊज शिवायला टेलरकडे गेल्यावर नवऱ्या मुलीची आई टेलरला हमखास एक वाक्य सांगते... ते वाक्य म्हणजे ''नवरीचे ब्लाऊज शिवताना माया जरा जास्त ठेवा बरं का... म्हणजे तब्येत चांगली झाली की उसवायला बरं पडेल....''. टेलर जर का एखादी महिला असेल तर मग लग्नानंतर ब्लाऊज का आणि किती उसवावे लागते, यावर भरपूर चर्चाही रंगते. म्हणजेच लग्न झाल्यावर मुलीची तब्येत सुधारणार हे सगळ्यांनीच किती गृहित धरलेलं असतं, याचं हे एक छाेटंस उदाहरण. 

 

पण नेमकं असं का होतं असावं ? आपल्या नात्यागोत्यातल्या किंवा मैत्रिणींपैकी बऱ्याच जणींसोबत हे असंच झालेलं असतं. ज्या मुली लग्नाच्या आधी अगदीच हडकुळ्या असतात, त्यांच्या बाबतीत हा बदल नक्कीच सकारात्मक असतो. पण ज्या ऑलरेडी गुटगुटीत किंवा तब्येतीने चांगल्या असतात, त्यांच्या बाबतीत असं होणं, चिंता वाढविणारं असतं. म्हणूनच लग्नानंतर खूप वजन वाढू नये, म्हणून या काही बाबींकडे आवर्जून लक्ष दिले पाहिजे. 

 

का वाढते लग्नानंतर वजन ?१. गोडाधोडाचे खाणे वाढतेलग्न ठरल्यावर आपल्याकडे केळवण नावाचा प्रकार सुरू होतो. यामध्ये नातलग आणि मित्रमंडळी जेवायला बोलावतात. कधीकधी तर पंचपक्वान्नाचा बेत केला जातो. यामुळे वजन वाढण्यासाठी पोषक वातावरण मिळण्यास सुरूवात होते. लग्नानंतरही पहिले काही दिवस नव्या नवरीचे लाड होतात. जेवायला बोलावणारी मंडळीही खूप असतात. त्यामुळे खाण्यावर काहीही नियंत्रण राहत नाही आणि वजन वाढायला सुरूवात होते.

 

२. खाण्याच्या सवयी आणि वेळा बदलतातलग्नानंतर नव्या नवरीचे संपूर्ण आयुष्यच बदलून जाते. तिला नव्या घरातल्या प्रथा परंपरा जशा स्विकाराव्या लागतात, तशाच खाणपानाच्या सवयीही बदलून जातात. जेवण, नाश्ता यांच्या वेळाही बदललेल्या असतात. त्यामुळे या वेळांशी जुळवून घेतानाही वजन वाढीचा त्रास होऊ शकतो. याशिवाय प्रत्येक घरी पदार्थ बनविण्याची पद्धत वेगवेगळी असते. कुठे अधिक तेलकट आणि मसालेदार जेवण आवडते, तर कुणाला खूप गोड पदार्थ आवडतात. या सगळ्यांशी जुळवून घेताना आराेग्यावरही परिणाम होतो.

 

३. झोपण्याच्या वेळा बदलणेमाहेरी असताना मुलींवर कामाचा जास्त भार नसतो. त्यामुळे त्यांना त्यांची झोप पुर्ण करता येते. सासरी मात्र हळूहळू अनेक जबाबदाऱ्या अंगावर पडू लागतात. यामुळे मग झोप अपूरी होते आणि त्याचाही परिणाम वजन वाढीवर दिसून येतो.

 

४. ताणतणाव वाढतात लग्न होऊन सासरी गेल्यावर मुलींना वरवर वाटत नसले, तरी मनातून अनेक गोष्टींबाबत दडपण आलेले असते. नव्या वातावरणात जोडीदारासोबत आपल्याला जुळवून घेता येईल ना ?, आपल्याला सगळे जमेल ना ?, अमूक एक गोष्ट केली तर सासरची मंडळी काय म्हणतील ? , सासरच्या मंडळींसोबत कसे वागायचे, कसे बोलायचे ?, असे अनेक विचार नवविवाहितांच्या मनात सुरू असतात आणि कळत नकळत त्यांनी या गोष्टींचे दडपणही घेतलेले असते. त्यामुळे वाढलेली स्ट्रेस लेव्हल वजन वाढविण्यास मदत करते.

 

५. व्यायामाचा अभावलग्नानंतर अनेक जणींना स्वत:साठी वेळ काढणे शक्य होत नाही. वेळ मिळाला तरी इतर कामांमुळे आलेला थकवा पाहून व्यायाम करावासा वाटत नाही. एकीकडे जीवनशैलीत आणि आहारात झालेला बदल आणि दुसरीकडे व्यायामाच अभाव यामुळे लग्नानंतर अनेक जणींची तब्येत सुटत जाते.

 

टॅग्स :रिलेशनशिपआरोग्यहेल्थ टिप्सवेट लॉस टिप्समहिला