silent divorce : गेल्या काही वर्षात घटस्फोटांच्या वेगवेगळ्याच संकल्पनांची चर्चा आहे. गेल्या काही महिन्यांत स्लीप डिव्होर्सची चांगली चर्चा झाली. यात पती-पत्नी एकाच घरात राहतात, लग्न मोडत नाही पण ते वेगवेगळ्या खोल्यांमध्ये झोपतात. त्यालाच स्लीप डिव्होर्स म्हटलं जातं. आता एक नवीन संकल्पना चर्चेत आहे. त्याला म्हणतात सायलेंट डिव्होर्स! आता हा काय नवीन प्रकार म्हणाल, तर गोष्ट वेगळीच आहे..
नात्यांमध्ये आजकाल वाद इतके वाढलेले बघायला मिळतात, की लोक शेवटी आपला वर्षानुवर्षांचा संसार मोडून वेगळे होतात. त्यानंतर नव्यानं आयुष्य जगायला सुरूवात करतात. पण इथे तशी काडीमोड नाही. सायलेंट डिव्होर्स म्हणजे कायदेशीररीत्या घटस्फोट घेतला जात नाही. पती-पत्नी म्हणून जोडपी सोबत राहतात, जगासाठी त्यांचं लग्न टिकलेलंच असतं पण इमोशनली ते एकमेकांपासून वेगळे असतात. नात्यातली भावनिक गुंतवणूक संपलेली असते.
काय आहे सायलेंट डिव्होर्स?
सायलेंट डिव्होर्समध्ये लग्नातली भावनिक गुंतवणूक संपलेली असते. पती पत्नी म्हणून एकमेकांविषयी प्रेमही संपलेलं असतं. पण ते आर्थिक कारणांसाठी आणि मुलांसाठी एकाच घरात सोबत राहतात. बाहेरून तर या जोडप्यांचं नातं एकदम नॉर्मल आणि चांगलं दिसतं. पण आतून त्यांचं एकमेकांबद्दलचं प्रेम संपलेलं असतं. नात्यात ना प्रेम असतं, ना भांडण. फक्त एका घरात रुममेट्सारखं राहणं. मुलांची शाळा-कॉलेजची फी, किराणा इतर गोष्टींवर ते बोलतात, पण दोघांमधला संवाद संपलेला असतो.
सायलेंट डिव्होर्सच्या टप्प्यात आपलं नातं गेलं तर..
१. जोडप्यांमध्ये संवाद, बोलणं कमी होणं, केवळ आवश्यक गोष्टी कामांपुरतं बोलणं.
२. ना एकमेकांना फोन, ना मेसेज ना शेअरिंग.
३. लग्न करुनही जोडीदाराची सोबत नाही.
४. परस्परांसोबत वेळ घालवण्यातला रस संपतो.
५. शरीरसंबंध संपतात. राेमान्सही संपतो.
हे टाळता येईल का?
सायलेंट डिव्होर्स म्हणजे खरंतर संपलेला संवाद. तो पुन्हा सुरुच करता येऊ शकतो. नातं निरस होण्यापूर्वी बोलणं आणि झालंच असेल निरस तर ते नातं टिकावं, अधिक चांगलं व्हावं म्हणून दोघांनीही प्रयत्न करायलाच हवे. आवश्यक तिथे काऊन्सिलिंगची मदत घेता येते.