Shocking Divorce Survey : आजकाल लोन हे तसं सगळ्यांच्याच जीवनाचा महत्वाचा भाग झालं आहे. घर घेण्यासाठी असो, गाडी घेण्यासाठी किंवा इतर काही काम करण्यासाठी असो लोक लोन घेतात. पण अलीकडेच करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणातून धक्कादायक बाब समोर आली आहे. भारतात लग्न तुटण्यामागची सगळ्यात मोठी कारणं प्रेमाची कमतरता नसून पैशांसंबंधी समस्या आणि असमानता आहेत. बरेच लोक पोटगी आणि घटस्फोटासंबंधी खर्चासाठी सुद्धा लोन घेतात.
सर्वेक्षणादरम्यान टियर-1 आणि टियर-2 शहरांतील 1,258 घटस्फोटित किंवा घटस्फोटाच्या प्रक्रियेत असलेल्या लोकांशी बोलल्यानंतर समोर आलं की, आर्थिक समस्या किंवा मतभेद हेच नातं तोडण्यामागचं मोठं कारण ठरतात.
काय झाला खुलासा?
लग्नानंतर 46% महिला नोकरी सोडतात किंवा कमी करतात. 42% पुरुषांना घटस्फोटाच्या वेळी पोटगी आणि कायदेशीर खर्चासाठी कर्ज घ्यावं लागतं. इतकंच नाही तर पोटगी देणाऱ्या 29% पुरुषांची नेट वर्थ निगेटिव्ह झाली. घटस्फोटानंतर 38% पुरुषांची वार्षिक कमाई फक्त मेंटेनन्समध्ये खर्च होते.
घटस्फोटाचा खर्च
सर्वेक्षणात आढळून आलं की, 19% महिलांनी घटस्फोटावर 5 लाखांहून अधिक खर्च केला. पुरुषांमध्ये हा आकडा 49% इतका होता. 53% महिलांना पतीच्या अर्ध्या किंवा त्याहून जास्त मालमत्तेवर हक्क मिळाला. 26% प्रकरणांत महिलांना पतीच्या मालमत्तेपेक्षा जास्त रक्कम मिळाली.
पैशामुळे तुटलेले नाते
सर्वेक्षणानुसार, 67% जोडप्यांनी मान्य केलं की त्यांच्या पैशांवरून नेहमीच भांडणं होत होती. 43% लोकांनी सांगितलं की पैशांचा वादच त्यांच्या घटस्फोटाचं खरं कारण होतं. लग्नाच्या वेळीही परिस्थिती असमान होती, 56% महिलांची कमाई पतींपेक्षा कमी होती, तर फक्त 2% महिलांची कमाई जास्त होती.
1 Finance चे CEO केवल भानुशाली सांगतात की, “पैशांसंबंधी वाद हे घटस्फोटाची मोठी कारणं आहेत. त्यात घटस्फोटाचा खर्च परिस्थिती आणखी अवघड करतो.”
काय करता येईल उपाय?
हे सर्वेक्षण सांगतं की, लग्नाआधी आणि लग्नानंतर पैशांबाबत दोघांमध्ये स्पष्टपणे संवाद फार महत्त्वाचा आहे. जुनं कर्ज, भविष्यातील बचत, कुटुंबाच्या जबाबदाऱ्या यावर आधीच चर्चा करावी. उत्पन्न आणि खर्चातील चढ-उतारांवर चर्चा करावी. दीर्घकालीन आर्थिक नियोजनावर लक्ष द्यावं. जर पती-पत्नीने पैशांबाबत पारदर्शकपणे बोलून योग्य प्लॅनिंग केलं, तर नुसते भांडण कमी होणार नाहीत तर घटस्फोटासारखी वेळही टाळता येईल.