Join us
Daily Top 2Weekly Top 5

शारीरिक-मानसिक आजार लपवून लागतात लग्न, फसवणूक केलेल्या लग्नात मुलामुलींची आयुष्य बरबाद-जबाबदार कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2025 17:42 IST

लग्नपूर्व समूपदेशनासह लग्नपूर्व आरोग्य चाचण्या कायद्यानं बंधनकारक असण्याची गरज आहे.

ठळक मुद्दे‘लग्नापूर्वीची आरोग्य तपासणी’ हा केवळ एक टेस्ट नाही, तर तो ‘प्रतिबंधात्मक उपाय’ ठरू शकतो. यामुळे अनेक आजार, वंध्यत्वाशी संबंधित समस्या किंवा मानसिक अस्थिरता आधीच स्पष्ट होऊ शकतात आणि गैरसमज, फसवणुकीमुळे तुटणारी लग्न वाचतील.

प्रेरणा ज्योत्स्ना गंगाधर व्यवहारे

लग्नसराई सुरू झाली. लोक ठरवून लग्न करताना किंवा एकूणच लग्न जुळवताना पत्रिका पाहतात. गुणांची जुळवाजुळव करतात. नातलग, मध्यस्थ, आई–वडील सगळेच एकच चर्चा करतात, मुलगा कसा आहे? मुलगी कशी आहे? नोकरी काय आहे? घर कुठे आहे? पगार किती आहे?’ पण या सगळ्या चर्चेत एक प्रश्न मात्र कायम दुर्लक्षित राहतो, दोघांचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य कसं आहे?लग्नानंतर ते सर्वांत महत्त्वाचं ठरतं, नातं सुंदर घट्ट होतं किंवा नात्यात आणि पर्यायानं जगण्यात अनेक गोष्टी बिनसतात.होतं काय, लग्न जमवताना जात, पदवी, पगार, घर, शेती या गोष्टींवर भरपूर चर्चा होते. पण, तब्येत कशी आहे, काही मानसिक किंवा शारीरिक आजार-व्याधी आहेत का? कुटुंबात कुणाला गंभीर आजार आहेत का, मानसिक त्रास आहेत का, हे बोललंच जात नाही. कुणी विचारत नाही, कुणी सांगत नाही.काहीजण तर आपले, हल्ली अनेकांना असणारे बीपी-शुगर-टीबीसारखे आजार लपवतात. काही शारीरिक त्रुटी ते अगदी टीबीपासून एचआयव्हीपर्यंतचे संसर्गही लपवतात. तेच मुलींचंही पीसीओडी, थायरॉइड, इन्फर्टिलिटीसारखे आजार किंवा लक्षणं सांगितलीच जात नाही.

 

काय करायला हवं?

लग्न ठरवताना काही चाचण्या करून एकमेकांना त्याचे रिपोर्ट्स दिले पाहिजे. मानसिक शारीरिक नेहमी होणारे आजार, अगदी वारंवार होणारे त्रासही सांगितले-विचारले पाहिजे. काही रक्तचाचण्याही आवश्यक आहेत.सीबीसी, ब्लड ग्रुप कोणता, एचआयव्ही, हिपेटायटिस बी आणि सी, थायरॉइड, बीपी, शुगर, थॅलेसेमिया, सिकल सेल, VDRL (लैंगिक संबंधातून होणाऱ्या आजारांची टेस्ट), फर्टिलिटी व रिप्रॉडक्टिव्ह हेल्थ टेस्ट, आणि मानसिक आरोग्य तज्ज्ञाकडून मेंटल हेल्थ, स्ट्रेस चाचणीही करून घ्यायला हवी.चाचण्या करून घेणं म्हणजे अविश्वास वाटणं असं मनात यायचंही काही कारण नाही. कारण, या चाचण्या आजार शोधण्यासाठी नाही तर लग्न करताना परस्परांना आपली संपूर्ण माहिती देण्यासाठी आहे. उलट त्यातून एकमेकांविषयी विश्वास वाढेलच. जबाबदारीसह सोबत जगण्याचं भानही येईल. स्वीकारही वाढेल.पण होतं काय की लपवलेलं सत्य लग्नानंतर उघड झालं की नातं कोसळतं. मनस्ताप होतो. फसवणूक होते. त्याचा परिणाम फक्त दोन व्यक्तींवर नाही, तर दोन कुटुंबांवर होतो. दोन आयुष्यांचा प्रश्न असतो. त्यांचं जगणं सोपं राहत नाही. त्यापेक्षा थोडा प्रामाणिकपणा आणि वेळीच आरोग्य तपासणी केली तर ते दोघांच्याही हिताचं ठरेल.नाती आणि नात्यातला विश्वास टिकण्याची ही पहिली पायरी ठरेल!

मानसिक आरोग्य महत्त्वाचं..आज समाजात शारीरिक आजारांवर बोलणं सोपं झालं आहे, पण मानसिक आजार अजूनही लाज, भीती आणि संकोचाचा विषय मानला जातो. काहीजण उपचार घेत असतात, पण उघड बोलत नाहीत. अगदी काही वेळा तर आई–वडील किंवा घरच्यांना माहिती असूनही, ते “लोक काय म्हणतील?” या भीतीने गोष्टी लपवतात आणि लग्न लावून देतात.मुलगा-मुलगी दोघांच्याही बाबतीत हे होणं चूक. लग्नानंतर जेव्हा सत्य समोर येतं, तेव्हा जोडीदाराला “आपल्याला फसवलं गेलं” असं वाटणं स्वाभाविक आहे. विशेषतः मुलींच्या बाबतीत, अनेकदा “हिला कोण सांभाळेल आयुष्यभर?” या विचारातून घाईघाईने लग्न लावून दिलं जातं. पण, तो निर्णय पुढे दोघांच्याही आयुष्यात वेदना आणि अन्याय घेऊन येतो.म्हणून मानसिक आरोग्य चाचणीही महत्त्वाची आहे.

 

सत्य आणि सुधारणा

भारतामध्ये दरवर्षी सुमारे दीड लाख घटस्फोट नोंदवले जातात. त्यापैकी जवळपास वीस टक्के प्रकरणांमध्ये आरोग्याशी संबंधित कारणं असतात. कोणीतरी आजार लपवतो, कोणीतरी मानसिक अस्थिरतेबद्दल सांगत नाही, आणि मग लग्नानंतर जेव्हा सत्य समोर येतं, तेव्हा पायाखालची जमीन सरकते.आपण समाजात नेहमी म्हणतो, “आजकाल लग्न टिकत नाहीत” किंवा ‘‘आता नात्यांना स्थैर्य नाही.” पण हे सगळं बोलताना त्यामागची कारणंही महत्त्वाची आहेत. कारण, खोटेपणावर नाती टिकतच नाहीतच.

शासन आणि समाजाचं पुढचं पाऊल

अजूनही आपल्याकडे लग्नापूर्वी प्री-मॅरिटल हेल्थ चेकअप बंधनकारक नाही. काही राज्यांनी त्याबाबत सूचना दिल्या आहेत, पण ती कायदेशीर अट नाही. पण, आता वेळ आली आहे की शासनाने या विषयाकडे सुधारणा आणि जबाबदारीच्या दृष्टीने पाहावं. या चाचण्या सक्तीच्या करायला हव्या.लग्न नोंदणीसाठी आरोग्य तपासणीचा पुरावा आवश्यक ठरवण्यात यावा. तर लोकांमध्ये याविषयीची जागरूकता वाढेल आणि या प्रक्रियेचा स्वीकारही सहज होईल. हे पाऊल बंधन नाही, तर संरक्षण ठरेल जोडप्यांच्या आरोग्यासाठी, त्यांच्या भविष्यासाठी आणि पुढच्या पिढीसाठी.‘लग्नापूर्वीची आरोग्य तपासणी’ हा केवळ एक टेस्ट नाही, तर तो ‘प्रतिबंधात्मक उपाय’ ठरू शकतो. यामुळे अनेक आजार, वंध्यत्वाशी संबंधित समस्या किंवा मानसिक अस्थिरता आधीच स्पष्ट होऊ शकतात आणि गैरसमज, फसवणुकीमुळे तुटणारी लग्न वाचतील.

connect.prernawrites@gmail.com  

English
हिंदी सारांश
Web Title : Concealing Illnesses Leads to Marriage Fraud, Ruining Lives: Who's Responsible?

Web Summary : Marriages often conceal critical health information, causing future relationship turmoil. Pre-marital health checkups, including mental health, are vital. Transparency and early detection can prevent deception, strengthen trust, and ensure healthier unions, ultimately benefiting families.
टॅग्स :रिलेशनशिपशुभविवाहघटस्फोटआरोग्य