श्रावणी सोमवार: उपवासामुळे खूप थकवा येतो? ५ टिप्स- दिवसभर राहा एकदम फ्रेश
Updated:July 28, 2025 13:00 IST2025-07-28T11:18:11+5:302025-07-28T13:00:35+5:30

श्रावणी सोमवारचा उपवास अनेक जण हौशीने करतात. जे नेहमीच उपवास करतात, त्यांना जड जात नाही. पण ज्यांना उपवासाची फारशी सवय नसते, त्यांचा उत्साह दुपारपर्यंत टिकून राहातो. पण त्यानंतर मात्र हळूहळू गळून गेल्यासारखं होतं. थकवा येऊ लागतो.
म्हणूनच श्रावणी सोमवारचा उपवास करताना काही गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजेत. जेणेकरून उपवासाचा थकवा येणार नाही आणि दिवसभर अगदी फ्रेश वाटेल.
नाश्त्याची वेळ टळू देऊ नका. सकाळी पोटभर नाश्ता करा. नाश्त्याला साबुदाणा खिचडी, साबुदाण्याचे वडे, तळलेल्या पापड्या, चिप्स असे तेलकट, जड पदार्थ खाऊ नका. त्याउलट भाजणीचं थालिपीठ, भगर असे पदार्थ खा.
नाश्ता झाल्यानंतर साधारण दोन अडीच तासांनी कोणतं ना कोणतं फळ खा. फळामुळे अंगात ताकद टिकून राहाते.
अधूनमधून ताज्या दह्यापासून तयार केलेलं कमी आंबट असणारं गोडसर ताक प्या. ताकामध्ये मीठ किंवा किंचित साखर घालून प्या. यामुळे जास्त एनर्जेटिक वाटतं.
लिंबू सरबत घेणे हा देखील एक चांगला पर्याय आहे. लिंबू साखर घेतल्याने थकवा येत नाही. एनर्जी टिकून राहाते. पण ज्यांना ॲसिडीटीचा त्रास होतो त्यांनी लिंबू पाणी जास्त घेऊ नये.
चहा- कॉफी यांचं प्रमाण कमी करा. कारण ॲसिडीटी, पोटातली उष्णता वाढण्यासाठी ते कारणीभूत ठरतात. त्यामुळे चहा कॉफी ऐवजी पुरेशा प्रमाणात पाणी प्या आणि ताजी फळं खाण्यास प्राधान्य द्या.