कापसापेक्षाही मऊ - लुसलुशीत दहीवडे! पिठात कालवा १ पदार्थ - पाहुणेही विचारतील रेसिपी...
Updated:April 10, 2026 20:05 IST2026-04-10T20:00:20+5:302026-04-10T20:05:02+5:30
tips to make dahi vada soft and fluffy : how to make spongy dahi vada at home : जिभेवर ठेवताच विरघळणारे आणि कापसापेक्षाही मऊ दहीवडे करण्याच्या टिप्स...

tips to make dahi vada soft and fluffy
दहीवडे म्हटलं की तोंडाला पाणी सुटतंच! मऊ, लुसलुशीत वडे आणि त्यावर गारेगार दह्याचा थर - हे परफेक्ट कॉम्बिनेश कोणालाही आवडणार नाही असं होऊच शकत नाही. सण - समारंभ असो किंवा पाहुण्यांचा पाहुणचार, पुढ्यात खमंग दहीवडे असतील तर जेवणाची चव दुपटीने वाढते. पण अनेकदा घरी बनवलेले दहीवडे आतून कडक होतात किंवा त्यांना हवी तशी जाळी पडत नाही.
how to make soft dahi vada
दहीवडे परफेक्ट होण्यासाठी फक्त डाळ भिजवणे ती वाटणे किंवा पीठ आंबवणे इतकंच करुन उपयोगाच नसतं तर काही खास टिप्स आणि ट्रिक्स फायदेशीर ठरतात. जर तुम्हालाही जिभेवर ठेवताच विरघळणारे आणि कापसापेक्षाही मऊ दहीवडे करायचे असतील तर या खास ट्रिक्स उपयोगी पडतील.
१. डाळीचे योग्य प्रमाण :-
दहीवडे फक्त उडीद डाळीचे करण्याऐवजी त्यात थोडी मूग डाळ (उदा. १ कप उडीद डाळीला पाव कप मूग डाळ) घाला. यामुळे वडे हलके आणि पचायला सोपे होतात.
२. पीठ फेटण्याची पद्धत :-
डाळ वाटून झाल्यावर ते पीठ एकाच दिशेने किमान ५ ते ७ मिनिटे हाताने नीट फेटून घ्या. पीठ हलके झाले आहे की नाही हे पाहण्यासाठी, पाण्याचे एक भांडे घ्या आणि त्यात थोडं पीठ टाका. जर पीठ पाण्यावर तरंगले, तर समजावे की तुमचे दहीवडे कापसासारखे नरम होणारच.
३. पाण्याचा वापर :-
डाळ वाटताना पाणी अगदी कमी वापरा. जास्त पाणी झाले तर वडे तेलकट होतात आणि त्यांना हवा तसा आकार येत नाही.
४. हिंग आणि मिठाचे पाणी :-
वडे तळल्यानंतर ते थेट दह्यात न टाकता, कोमट पाण्यात थोडे मीठ आणि हिंग टाकून त्यात १०-१५ मिनिटे भिजत ठेवा. यामुळे वड्यांमधील जास्तीचे तेल निघून जाते आणि ते आतून छान फुलतात.
५. वडे पिळण्याची पद्धत :-
पाण्यातून वडे काढताना ते दोन्ही हातांच्या तळव्यामध्ये धरून हलक्या हाताने दाबा. जास्त जोरात दाबल्यास वडे फुटू शकतात.
६. दह्याचे टेक्श्चर :-
दहीवड्यासाठी दही कधीही मिक्सरला फिरवू नका, यामुळे ते पातळ होते. दही नेहमी पुरणयंत्रातून किंवा साध्या गाळणीतून चमच्याने गाळून घ्या, ज्यामुळे ते हॉटेलसारखे क्रीमी आणि दाटसर होईल.
७. साखरेचा वापर :-
दह्यात चवीनुसार पिठीसाखर आणि थोड काळे मीठ घातल्यास दहीवड्याची चव अधिक खुलते.
८. सर्व्ह करताना टॉपिंग करा :-
भाजलेलं जिरे पावडर, चाट मसाला, चिंचेची चटणी आणि कोथिंबीर घातल्याने चव दुप्पट होते.
९. बॅटर तयार करताना :-
जेव्हा तुमची डाळ व्यवस्थित भिजून फुगेल, तेव्हा ती मिक्सरमध्ये बारीक वाटून तिचं बॅटर तयार करा. आता त्यामध्ये १ चमचा मीठ आणि जिरे घाला. मीठ घातल्याने बॅटर थोडं घट्ट राहील आणि जिरं चवीत भर घालेल. बॅटरमध्ये अर्धा चमचा बेकिंग सोडा घाला, यामुळे बॅटर छान फुलेल आणि वडे मऊ होतील.
१०. वडे तयार करण्यासाठी :-
कढईमध्ये मध्यम आचेवर तेल गरम करा. वडे तळण्यासाठी तयार बॅटर घ्या. हाताला थोडंसं पाणी किंवा तेल लावा, त्यामुळे बॅटर हाताला चिकटणार नाही. आता छोटे गोल आकाराचे वडे बनवून गरम तेलात टाका. वडे जास्त वेळ तळू नका - फक्त हलके सोनेरी होईपर्यंत तळा आणि लगेच बाहेर काढा.