black thread on Waist of children : काळा रंग हा दृष्ट लागण्यापासून बचाव करण्यासाठी म्हणून ओळखला जातो. डोळ्यांना काळज लावणं असो वा हाता-पायांमध्ये काळा धागा बांधणं असो दृष्टी लागू नये म्हणून अशा अनेक गोष्टी केल्या जातात. बऱ्याच लोकांची मान्यता असते की, नुकत्याच जन्मलेल्या बाळांना दृष्ट लागू नये म्हणून काळा धागा बांधायला हवा. मग बाळाच्या गळ्यात, हातात, पायांमध्ये कंबरेमध्ये काळा धागा बांधला जातो. मात्र, लहान मुलांच्या हाता-पायांमध्ये अशाप्रकारे काळा धागा बांधणं नुकसानकारक ठरू शकतं. याचा खुलासा डॉ. अमोल अन्नदाते यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून केला.
डॉ. अमोल अन्नदाते यांनी एका फेसबुक रीलमध्ये काळ्या धाग्यामुळं लहान मुलांचं कसं नुकसान होतं किंवा त्यांचं आरोग्य कसं बिघडतं याबाबत माहिती दिली आहे. डॉक्टर अमोल यांनी व्हिडिओत सांगितलं की, "माझ्याकडे साधारण १० ते १२ दिवसांच्या बाळाला त्याला ताप आल्यामुळे आणण्यात आलं होतं. मला एक महत्वाचा सल्ला द्यायचा आहे की, आपल्याकडे नव्यानं जन्माला आलेल्या बाळांच्या हाता-पायांना काळे धागे बांधले जातात. पण आपल्या रूढी-मान्यतांना बाजूला ठेवून हे काळे धागे बांधणं बंद करा. कारण या काळ्या धाग्यांमुळे बाळांना इन्फेक्शन होण्याचा सगळ्यात जास्त धोका असतो. त्यामुळे सुरूवातीचे किमान तीन महिने तरी बाळांना असे धागे बांधू नका".
व्हिडीओ बघण्यासाठी इथे क्लिक करा.
एकंदर काय तर आपल्या बाळाला कुणाची दृष्ट लागू नये ही पालकांना वाटणारी भावना योग्यच आहे. पण त्याहून महत्वाचं बाळाचं आरोग्य आहे. जर इतक्या कमी वयात बाळाचं आरोग्य बिघडलं तर त्याला पुढेही आरोग्यासंबंधी समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्यांना बांधण्यात आलेल्या धाग्यांमध्ये अनेक बॅक्टेरिया असतात. बाळांच्या अंगाला लावलेलं तेलही त्यात मुरतं. त्यामुळे या धाग्यांद्वारे बाळांना इन्फेक्शन होतं. अशात त्यांना ताप, सर्दी-खोकला अशा समस्या होतात. म्हणून पालकांनी रूढी-परंपरा थोड्या बाजूला ठेवून आपल्या बाळाच्या आरोग्याचा आधी विचार करावा.