Join us  

कितीही पाठांतर करा, रट्टा मारा पण परीक्षेत काहीच आठवत नाही, असं का होतं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2024 2:23 PM

पाठांतर करतो म्हणत मुलं नक्की काय करतात? परीक्षेत घोका आणि ओका करुन काहीच उपयोग होत नाही कारण..

ठळक मुद्देसायनिक सूत्रं एकदम परीक्षेच्या आधी पाठ करून काही उपयोग नाही.

डॉ. श्रुती पानसे

परीक्षा अगदी जवळ आली आहे. पण काही केल्या सगळं पाठ होत नाही? कधीकधी तर पाठांतर खूप केलेलं असतं तरीही प्रश्नपत्रिका समोर आली की काहीच आठवत नाही, असं का होत असेल? अभ्यासातील एखादी गोष्ट न समजता पाठ केली तर विसरायचा धोका असतो; पण जे नीट समजलेलं आहे ते कधीच विसरलं जाऊ शकत नाही. पण समजलेलंच नसेल तर पुस्तकच्या पुस्तक नुसतं पाठ करुन ऐनवेळी काहीच आठवत नाही असं होऊच शकतं.

खरंतर पाठ्यपुस्तकातील सगळ्या गोष्टी पाठ करायच्या नसतात; उदा. निबंध, गणितं, प्रश्नांची जशीच्या तशी उत्तरं वगैरे. कधी कधी सूत्र, व्याख्या, लेखक-कवीचं नाव आणि धड्याचं नाव यांच्या जोड्या, रासायनिक सूत्र अशा काही गोष्टी पाठ असाव्या लागतात; पण तरीही अर्थ समजला नसेल तर आणि अर्थ समजेपर्यंत पाठ करायला जाऊच नये; कारण त्याचा अर्थ कळला तरच ते पेपरमध्ये लिहिता येतं.त्यामुळे अर्थ समजण्यासाठी ते पुन:पुन्हा वाचणं, सोडवणं, काही गोष्टी लिहिणं,यातून आपोआप लक्षात राहतं. वेगळं पाठ करण्याची गरज पडत नाही. असा अभ्यास जास्त चांगला आहे.

(Image : google)

मग काय करायला हवं?

१. गणिताची सूत्रं तर अभ्यास करून करूनच लक्षात ठेवावीत. त्यासाठी वेगळा कुठलाही मार्ग नाही.२. लेखक-कवी आणि धड्याचं नाव यासाठी धडा वाचताना प्रत्येक वेळी लेखकाचं नाव ही वाचायला हवं. धड्याच्या नावावरून लेखकांचं नाव आठवा. लेखकाच्या नावावरून धड्याचं नाव आठवा, असा खेळ स्वत:च खेळा. आपोआप लक्षात राहील.३. कोणत्याही विषयाच्या व्याख्या अभ्यासायच्या असतात. या व्याख्या पटकन समजू शकतील अशा असतील तर त्यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत; पण लांबीने मोठ्या असतील, गुंतागुंतीचा अर्थ असेल तर त्या मोठ्या व्याख्येचे आपल्या सोयीनुसार योग्य भाग पाडा.क्रमाने एक-एक करून समजावून घेताना पाठ होईलच. प्रत्येक भागाचा अर्थ समजला तर जास्तच सोपं.

(Image : google)

४. रासायनिक सूत्रं एकदम परीक्षेच्या आधी पाठ करून काही उपयोग नाही. रोज पाच पाच सूत्रं वाचा आणि लिहा. आज पाच सूत्रं लक्षात राहिली की, दुसऱ्या दिवशी पुढची पाच करायला घ्या.५. आदल्या दिवशीची पाच आठवा. लक्षात आहेत का ते तपासा. मगच पुढची पाच करा. असं रोज केलं तर काही दिवसांत सर्व सूत्रं आठवतील. आदल्या दिवशीचं एखादं सूत्र आठवलं नाही तर पुन्हा अभ्यास करायला.या पद्धतीने अभ्यास करायची सवय नसेल तर हळूहळू सुरुवात करा. या सर्व पद्धती सोप्या आहेत. नक्की जमतील, अशाच आहेत.

(संचालक, अक्रोड)ishruti2@gmail.com

टॅग्स :शिक्षणपालकत्वविद्यार्थीलहान मुलंपरीक्षा