माधुरी पेठकर
नववीत शिकणारा ध्रुव तसा अभ्यासात जेमतेम. पण खेळ, कला, छंद यात कायम पुढे. पण ध्रुवचे आई बाबा त्याचा अभ्यास सोडून इतर काही पाहायलाच तयार नाही., त्यात पुढच्या वर्षी त्याची दहावी. नववीचं वर्ष सुरु झाल्यापासूनच आई बाबांच्या अपेक्षांच रुपांतर एकदम टार्गेटमध्ये झालेलं. पहिल्या घटक चाचणीत इतके हवे, सहामाही परीक्षेत इतके. तिसऱ्या चौथ्या घटक चाचणीला अमूक तमूकच हवे असं आई बाबांनी ध्रुवला सांगून टाकलं. ध्रुव त्याचे आई बाबा देतील ते टार्गेट कसेबसे पूर्ण करत होता. ध्रुव दिलेले टार्गेट पूर्ण करतो आहे हे लक्षात आल्यावर ध्रुवसमोर अव्वाच्या सव्वा टार्गेट यायला लागलीत. सहामहीत ध्रुवने 70 टक्के पाडले. म्हणून वार्षिक परीक्षेत त्याला थेट 90 टक्क्यांच्या पुढचं टार्गेट दिलं गेलं. आपले आई बाबा आता फारच करतात हे बघून ध्रुवचा तर मूडच गेला.
आई बाबांच्या अपेक्षांमुळे नव्हे टार्गेटमुळे ध्रुवचय स्वभावात, त्याच्या सवयींमध्ये फरक पडला. ज्या गोष्टी तो आवडीने करत होता त्या तो करेनाश झाला. अभ्यासाला बसलं की त्याच्या डोळ्यासमोर आई बाबांनी दिलेली टार्गेटसच नाचू लागायची. यामुळे अभ्यासात काही केल्या त्याचं लक्ष लागेनासं झालं. आपले आई बाबा आपल्याला समजू घेत नाही असं वाटून ध्रुव त्यांचा राग करु लागला. एरवी छान हसत खेळत असणारा मुलगा छोट्या छोट्या गोष्टींवरही चिडचिड करु लागला. आई बाबांशी बोलेनासा झाला. ध्रुवला नेमकं काय झालं हेच आई बाबांना कळत नव्हतं. आणि 'तुम्हाला माझ्याकडून जे हवं ते मला पेलवत नाही' हे ध्रुवला आई बाबांना सांगताही येत नव्हतं. तुमच्या घरात टार्गेटच्या ओझ्याखाली दबून गेलेला ध्रुव नाही ना? याची खात्री अवश्य करुन घ्या!
अवाजवी-अवास्तव टार्गेटचे परिणाम काय?
1. अपेक्षा आणि टार्गेट यात फरक असतो. आई बाबांनी मुलांकडून अपेक्षा ठेवणं रास्तच. त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मुलांनी प्रयत्न करणं अपेक्षितच. पण टार्गेट हे जर अवाजवी असतील, मुलांच्या आवाक्याबाहेरची असतील तर मुलांना त्याचा ताण येतो.
2. आई वडिलांनी मुलांना समजून उमजून न घेता त्यांच्यावर थोपवलेल्या टार्गेटसमुळे मुलं दुखावतात. आई बाबा आपल्याला समजून घेत नाही याचं त्यांना वाईट वाटतं. या अपेक्षा पूर्ण होत नसतील तर खावी लागणारी बोलणी, टोमणे यामुळे मुलांना स्वत:बद्दल न्यूनगंड वाटायला लागतो. आपल्या पालकांबद्दल राग निर्माण होवून नात्यात दुरावा निर्माण होतो.
3. पेलत नसलेल्या टार्गेटसमुळे मनात अवाजवी भीती निर्माण होते. त्याचा परिणाम मुलांच्या शारीरिक मानसिक आरोग्यावर होतो. एकूणच त्यांच्या व्यक्तिमत्व घडणीवर आई बाबांच्या अवास्तव अपेक्षांचा वाईट परिणाम होतो.