Parenting Tips : घरातील मोठ्यांसह आजकाल लहान मुले देखील रात्री पुरेसे झोपत नाहीयेत. याचं एक महत्वाचं कारण अलिकडेच डॉक्टरांनी सांगितलं. डॉक्टरांनी सांगितलं की, आजकाल लहान मुलं रात्री झोपत नाहीत किंवा उशिरा झोपतात याला त्यांच्या पालकांचा स्ट्रेस कारणीभूत आहे. बरं लहान मुलांची झोप पूर्ण होत नसल्याने ते सकाळी लवकर उठत नाहीत आणि सोबतच त्यांची चिडचिडही वाढते. त्यामुळे त्यांचे पालकही पुन्हा चिंतेत राहतात. सामान्यपणे असं दिसतं की, नोकरी करणाऱ्या पालकांसाठी हे एक मोठं आव्हान आहे. अशात ही समस्या कशी दूर करता येईल याबाबत चाइल्ड स्पेशालिस्ट डॉ. इमरान पटेल यांनी एका व्हिडिओतून माहिती दिली आहे.
डॉ. इमरान पटेल यांनी सांगितलं की, जेव्हा आई-वडील सतत चिंतेत असतात, तणावात असतात याचा थेट प्रभाव त्यांच्या मुलांवर पडतो. लहान मुलांना हे कळत नाही की, आई-वडील चिंतेत का आहेत. पण पालकांचे हावभाव, त्यांचा आवाज, बॉडी लॅंग्वेज बघून त्यांच्या मुलांच्या वागण्यातही बदल होतो. डॉक्टर म्हणाले की, पालक स्ट्रेसमध्ये असल्यावर जसे त्यांचे कार्टिसोल हार्मोन्स वाढतात, तसे ते मुलांमध्येही वाढतात. त्यामुळे त्यांच्यात अस्वस्थता, राग, ओव्हरथिंकींग वाढते. पालकांमुळे लहान मुलांमध्ये अनेक बदल होतात.
डॉक्टर सांगतात की, नोकरी करणाऱ्या पालकांसाठी ही स्थिती मोठं आव्हान ठरत आहे. कारण मुलांसोबत घालवण्यासाठी त्यांना पुरेसा वेळ मिळत नाहीये. त्यांच्याशी पुरेसा संवाद साधता येत नाही. याच कारणांनी लहान मुलं रात्री झोपत नाही, उशिरा झोपतात, रात्री मधेच उठतात, सकाळी त्यांना थकवा जाणवतो आणि ते दिवसा चिडचिड करतात.
पालकांनी काय करावे?
लहान मुलांची झोप सुधारण्यासाठी पालकांनी काही छोट्या छोट्या सवयी लावून घेतल्या पाहिजेत. या सवयींच्या मदतीने हळूहळू त्यांचं मन शांत होईल आणि मुलांच्या झोपेतही सुधारणा होईल.
- जर पालकच मोबाइल, टीव्ही बघत असतील, रागात राहत असतील तर मुलंही तसंच करतील.
- झोपण्याच्या १ तास आधी घरात नो-नाॉइस एन्व्हायर्नमेंट ठेवा.
- लहान मुलांचा मेंदू पॅटर्नवर काम करतो, त्यामुळे त्यांच्या आहाराचा आणि झोपण्याचा पॅटर्न ठरवा.
- झोपण्याच्या एक तास मुलांचं स्क्रिन बघणं बंद करा.
- पालकांनी आधी आपला स्ट्रेस कंट्रोल करावा. कारण जेव्हा पालक शांत राहतील तेव्हा त्याचा प्रभाव मुलांवर पडतो.
- झोपण्याआधी त्यांच्याशी बोलून त्यांचं मन हलकं करा. याने त्यांची भीती दूर होईल आणि त्यांना चांगली झोप येईल.
