Join us

कोणतेही पदार्थ करा, मुलं जेवतच नाहीत!- घरोघरी आईची तक्रार-खरंच मुलांना भूक लागत नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2024 08:00 IST

मुलं जेवतच नाही, एकेक तास त्यांच्या मागे ताट घेवून फिरावं लागतं, असं का होतं?

ठळक मुद्देटी.व्ही. पाहात किंवा मोबाइल पाहात जेवण करणं टाळायला हवं.

बहुतांश घरात आयांची एक तक्रार असते की मुलं जेवतच नाही. काहीही करा, खातच नाहीत. एकेक तास जेवण भरवावं लागतं तेव्हा कुठं खातात. अतिशय त्रास देतात जेवायला. पदार्थ बदलले तरी तक्रार तीच मुलं जेवत नाही. खरंच मुलांना भूक लागत नाही का? आणि लागत नसेल तर मग भूक का लागत नाही हे शोधून त्यावर उपाय करायला हवे. आणि हे देखील पहायला हवं की मुलांचं पोट भरलेलं असताना तर आई बळजबरी त्याला जेवू घालत नाही ना? कारण भूक लागली आणि खाल्लंच नाही असं मुलं करत नाहीत.

भूक गायब का होते?१. लहान मुलांमध्ये अतीगोड खाणं किंवा कृमी यामुळे भूक न लागण्याची प्रवृत्ती दिसते. अति दूध पिण्याची सवय असल्यास अन्य पदार्थ न खाण्याकडे कल असतो.२. हल्ली दर दोन तासांनी खा असं सांगितलं जातं. त्याचा परिणाम म्हणूनही भूक लागत नाही.३.  पाव-बिस्किटांचा अतिरेकी वापर, चॉकलेट थंड पदार्थ अन थंड पेय सतत खाण्याची सवय, भेळ फरसाण, वेफर्स यासारख्या पदार्थाचा वापर आणि मैद्याचे पदार्थ यामुळे पोट साफ होत नाही अन भूक लागत नाही.

(Image :google)

भूक वाढवण्याचे हे काही सोपे उपाय१. लंघन म्हणजे काही काळ खायला न दिल्यास आपोआप भूक वाढते. २. पोट साफ राहण्यासाठी एरंडेल तेलासारख्या औषधांचा वापर करावा.३. काळ्या मनुका, सुकी अंजीरं यासारखे पदार्थ नियमित सेवन केल्यास पोट साफ राहातं आणि भूक लागते.४. भुकेचा प्रश्न लहान मुलांमध्ये असल्यास मनुका, अंजीर भिजत टाकून त्याचा काढा करुन वा मिक्सरवर ज्युस काढूृनही देता येतो.५. घरात असणारे सुंठ, मिरी, दालचिनी, पिंपळी यासारखे अनेक पदार्थ हे भूक वाढवणारे आहेत. या पदार्थाचे चूर्ण करुन मधाबरोबर चाटवल्यास भरपूर भूक लागते.

६. हिंग तूपात तळून खायला दिल्यास भूक वाढते अन पोट साफ राहतं.७. हिंगापासून बनवलेलं हिंगाष्टक चूर्ण नावाचं औषध बाजारात सहज उपलब्ध आहे. गरम पाण्याबरोबर, ताकामध्ये घालून किंवा भाताच्या पहिल्या घासाबरोबर तूप+हिंगाष्टक चूर्ण दिल्यास चांगली भूक लागून पचनही चांगलं होतं.८. तीळाची चटणी, पुदिन्याची चटणी, भोपळ्याच्या सालीची चटणी, कढीपत्त्याची चटणी यासारखे पदार्थ तोंडाला चव आणणारे, पाचक आणि कृमीनाशक आहेत. हे खाण्याची सवय लहान मुलांना सुरूवातीपासून लावायला हवी.

(Image :google)

९. जेवणामध्ये साजूक तूप आणि जेवणानंतर ताक या पदार्थाचा वापर असायला हवा. हे दोन्ही पदार्थ भूक वाढवणारे आहेत.१०.   वयानं मोठी असणारी मुलं जर नीट जेवत नसतील तर त्यांना नियमित व्यायामाची सवय लावायला हवी. किमान रोज १२ सूर्यनमस्कार घालण्याची सवय मुलांना लावायला हवी. किमान एक तास मैदानी खेळ, भरपूर धावणं, खो खो, फूटबॉल, कबड्डी इ. खेळांची आवश्यकता आहे.

११. रात्री उशिरा जेवणाची सवय मोडून सायंकाळी लवकर जेवणाची सवय लावणं आवश्यक आहे. शास्त्रनुसार सूर्यास्ताला जेवण करणं आवश्यक आहे.१२. टी.व्ही. पाहात किंवा मोबाइल पाहात जेवण करणं टाळायला हवं.

टॅग्स :आरोग्यलहान मुलंअन्नपालकत्व