Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुलींना मेकअप करायला कोण शिकवतं? कोण सांगतं की मेकअप कर तरच सुंदर दिसशील..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2026 12:37 IST

Who teaches girls to wear makeup: Impact of beauty advertisements on young girls: मुलामुलींनाच ‘ग्राहक’ करणारी एक मोठी बाजारपेठ, मुलांचं बालपण संपवतेय आणि त्याला जबाबदारी पालकही!

ठळक मुद्देलहान मुलींना मेकअप का करावासा वाटतो? त्यांच्या मनात या भावना कुठून येतात? अशावेळी पालकांनी काय करावं- काय सांगावं?

माधुरी पेठकर

किड्स व्हेकेशन आऊटफिट्स, बिच व्हेकेशन आऊटफिट्स, माऊण्टन व्हेकेशन आऊटफिट्स.. असे शब्द असलेल्या जाहिराती उन्हाळा सुरू झाला तशा दिसू लागल्या. लहान मुला-मुलींसाठी केवळ कपडे नाही तर त्याला साजेशे बुट-चपला आणि कानातले, गळ्यातले, टोप्या, बेल्ट, चष्मे म्हणजेच ॲक्सेसरीजही दिसू लागतात. नेहमीचे कपडे मुलांना न घालता सहलीसाठी खास शाॅपिंगही केले जाते. त्यातच मुलींसाठी किड्स मेकअप किटही घेतले जातात. या मेकअपच्या वस्तू असा दावा करतात की, ते सारे वयानुरूप अर्थात ‘एज अप्रोप्रिएट’ असते, त्यामुळे ते मुलांच्या त्वचेसाठी सुरक्षित असते.त्याचवेळी याचदरम्यान आपल्याकडे लग्नसराई असते. हल्ली पालक आणि मुलांच्या कपड्यांचं ट्विनिंग केलं जातं त्यामुळे मुलीचे कपडे आईसारखे, मुलांचे बाबासारखे शिवले जातात. मेकअपही जोरदार केला जातो. मेकअपचे थरच्या थर लहान मुलींच्या चेहऱ्यावर दिसतात आणि व्हेकेशन कपड्यांच्या नावाखाली मोठ्यांच्या कपड्यांसारखे अपिलिंग कपडे मुलंही घालतात. मुलांसाठी एक वेगळी स्वतंत्र बाजारपेठच उभी राहते आहे.

कुणी चांगलं म्हणावं-कौतुक करावं म्हणून सतत दुसऱ्यावर अवलंबून राहता? ५ गोष्टी-व्हा इमोशनली इंडिपेंडट

आता कुणाला प्रश्न पडेलही की यात आक्षेप घेण्यासारखं काय आहे, ज्या पालकांकडे पैसा आहे, हौस आहे ते करतात मुलांसाठी खरेदी मग त्यात इतरांना आक्षेप असण्याचं काय कारण?प्रश्न आहे मुलांच्या बॉडी इमेजचा. तसंही इन्स्टाग्रामस्नेही काळात मुलंमुली आपण दिसतो कसे याचा विचार वयात येण्यापासूनच करतात.मेकअप केल्याशिवाय आपण छान दिसणारच नाही, असं मुलींना वाटू लागलं, ते कशानं?लहान वयातच मुलींचं मेकअप करणं हा एकाच वेळी कौतुकाचा आणि टीकेचा विषय होतो आहे. खेळण्या बागडण्याच्या टप्प्यात मुलं आणि त्यातही विशेषत: मुली आपल्या दिसण्याचं टेन्शन घेतात, अभ्यास, छंद यावर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा काय केलं म्हणजे मी छान दिसेल यावर फोकस करतात, आपली स्किन टॅन होईल या भीतीने मित्र मैत्रिणींसोबत बाहेर जाऊन खेळत नाही तेव्हा हा 'किडस मेकअप' हा विषय केवळ टीका-टिप्पण्यांचा उरत नाही. तर मुलींच्या आरोग्याचाही होतो.

लहान मुलींना मेकअप का करावासा वाटतो?

१. आपली मुलगी छान दिसायला हवी असा अनेक आयांचा आग्रह असतो. त्यासाठी त्या मुलींचाही मेकअप करतात. मेकअप केला की आपण सुंदर दिसतो हे हळूहळू त्यांच्या मनावर बिंबवलं जातं, किंवा बिंबतंच.२. स्वप्रतिमा (सेल्फ एस्टीम) तयार करण्यासाठी मेकअप महत्त्वाचा वाटू लागतो. आपण वेगळं दिसावं, आपली स्वतंत्र ओळख निर्माण व्हावी असं वाटणं, त्यासाठी मेकअप करुन मुली सुंदर दिसण्याचा प्रयत्न करतात.३. आपण जसे आहोत तसे न आवडणं, आपण दिसायला छान नाही असं वाटणं आणि मग हे दिसणं दुरुस्त करण्यासाठी मेकअपचा आधार वाटू लागतो. रंगावरून लहान वयातच मुलींना टोमणे मारणारेही अनेकदा अवतीभोवती असतात.५. वयात येताना चेहऱ्यावर मुरुम, पुटकुळ्या येतात, अंगावरचे केस वाढतात. पायावरचे केस वाढलेले असतात. स्कर्ट वगैरे घातल्यावर ते दिसतात. पण त्यामुळे अनेक मुलींना संकोचल्यासारखं होतं आणि त्यामुळेही अगदी सातवी-आठवीतल्या मुलीही पार्लरमध्ये जाऊन आयब्रोज, वॅक्सिंग यासारख्या ट्रीटमेंट घेतात.धोका काय?१. छान दिसायला हवं असं 'प्रेशर' मुलींना त्यांचे पालक देत असतील किंवा मुली त्या स्वत:हून घेत असतील आणि त्या प्रेशरखाली जाऊन मेकअप करत असतील तर मुलींचं बालपण हरवण्याचा धोका असतो. मेकअपच्या आकर्षणातून अनेक लहान मुलींना लवकर मोठं होण्याची इच्छा होते.२. लहान वयात मेकअप करण्याची आवड/ सवय यामुळे दिसण्यालाच मुली अवाजवी महत्त्व देतात. आपण जसे आहोत तसे स्वीकारत नाही. त्यामुळे आपण आहोत तसे छान दिसत नाही, असं वाटतं. छान दिसण्यासाठी मेकअपच करावा लागेल हा विचार त्यांच्या मनात दृढ होतो. आणि हा विचार जसजसा पक्का होतो तसा स्वत:चा स्वीकारही कमी होत जातो.३. अभ्यास, खेळ, छंद या आवश्यक गोष्टींवरचा फोकस कमी होतो. मेकअप करून फोटो काढणं, आपण फोटोत कसं दिसतो हे सतत बघणं, सोशल मीडियावर टाकलेल्या आपल्या फोटोंना किती लाइक्स-कमेण्टस आल्यात, आपल्या मैत्रिणींचे फोटो कसे, त्यांना लाइक्स किती, कमेंट्स काय, असे तुलनात्मक आणि अनावश्यक विचार सुरू होतात. त्यामुळे एकूणच त्यांच्या शारीरिक, मानसिक विकासावर वाईट परिणाम होतो.४. मोठ्यांचे मेकअप प्रॉडक्ट्स वापरल्याने चेहेऱ्यावर मुरुम पुटकुळ्या येणं, त्वचेवर रॅशेस येणं यासारखे धोके असतात.

पालकांनी काय करावं- काय सांगावं?

१. मुलं लहान असताना त्यांच्या दिसण्याबाबत फार चर्चा करू नये. दिसण्यापेक्षा आरोग्य निरोगी असणं, भरपूर खेळणं महत्त्वाचं हे त्यांच्यावर बिंबवावं.२. इतर मुलांना दिसण्यावरून नावं ठेवू नयेत, किंवा अतिरेकी कौतुकही करू नये. दिसतात कसे यावर मुलांचे लाडकोड न करता, सर्व मुलांशी एकसमान वागावं.३. रंग, रुप, उंची, जाडी यातलं काहीच मुलांच्या हातात नसतं. ते आनुवंशिक असतं. हे मुलांना सांगून आपण जसे आहोत तसे सुंदर आहोत हे मुलांना सांगावं, तसं वागावं. तरच मुलं स्वप्रतिमेचा आदर करायला शिकतील.

सुंदर मी होणार..!

मग कधीच मेकअप करायचा नाही का? मुलींना आवडतं नटायला असं अनेक जण विचारतील. तर त्याचं उत्तर हेच की कधीतरी क्वचित मेकअप केला तर काही बिघडत नाही. पण सतत वारंवार करणं चूक, आणि मेकअप केल्यावरच आपण सुंदर दिसतो, हे मुलांना सांगणं चूक.मुलांची त्वचा सुदृढ राहण्यासाठी सूर्यप्रकाशाची गरज असते. मेकअप प्रॉडक्ट्स सतत वापरल्याने त्यात अडथळा येतो. त्यामुळे मेकअप केला तर काही वेळातच तो स्वच्छ काढला पाहिजे.मुख्य लहान मुलांच्या मेकअपसाठी मोठ्यांचे मेकअप साहित्य न वापरता लहान मुलांसाठीचे प्रॉडक्ट्स वापरावे. पण ते ही क्वचित. नेहमी नाही. 

English
हिंदी सारांश
Web Title : Who teaches girls makeup? Why this pressure to look beautiful?

Web Summary : Early makeup use impacts girls' self-esteem, focusing on appearance over health. It fosters unhealthy comparisons, risks physical and mental well-being. Parents should emphasize health, inner beauty, and acceptance.
टॅग्स :पालकत्वलहान मुलंब्यूटी टिप्स