Parenting Tips : लहान मुलांच्या चांगल्या वाढीसाठी त्यांचा आहार चांगला असणं खूप महत्वाचं असतं. त्यांच्या आहारात अनेक पौष्टिक गोष्टी असणं महत्वाचं असतं. अशात लहान मुलांच्या चांगल्या आरोग्यासाठी अनेक पालक त्यांच्या आहारात तूप टाकतात. पण असेही काही पालक आहेत ज्यांना प्रश्न पडतो की, बाळांना तूप कधी द्यावे आणि किती प्रमाणात द्यावे? याच प्रश्नाचं उत्तर प्रसिद्ध पेडियाट्रिशिअन डॉ. रवि मलिक यांनी दिले आहे.
बाळांना तूप कधी द्यावे?
साधारणपणे ६ महिन्यांपासून बाळांना तूप देता येतं. जेव्हा आपण बाळांना कॉम्प्लिमेंटरी फूड म्हणजेच दूधाव्यतिरिक्त पूरक आहार सुरू करतो, त्या वेळेपासून तूप देता येतं. मात्र तूप थेट देऊ नये. डाळ, खिचडी, मॅश्ड भाज्या यातून थोडेसे मिसळून द्यावे.
तूप देण्याचं योग्य प्रमाण (वयानुसार)
6 महिने ¼ ते ½ चमचा
9–12 महिने 1 चमचा
1–2 वर्षे 1–2 चमचे
बाळांसाठी तूपाचे फायदे
ऊर्जा मिळते
तूपामध्ये हेल्दी फॅट्स असतात. 1 ग्रॅम तूपात साधारण 9 कॅलरीज असतात, त्यामुळे बाळ दिवसभर सक्रिय राहतं.
मेंदूचा विकास
मेंदूचा मोठा भाग फॅटने बनलेला असतो. तूपातील ओमेगा-3 आणि ओमेगा-6 फॅटी ॲसिड्स मेंदूच्या वाढीसाठी आवश्यक असतात. अशात तूपामुळे बाळाची स्मरणशक्ती सुधारण्यात मदत मिळते.
वजन वाढवण्यात मदत
बाळ कमजोर असेल किंवा वजन कमी असेल तर तूपामुळे आहारातील कॅलरीज व पोषक घटक वाढतात. त्यामुळे हेल्दी वजन वाढण्यास मदत होते.
पचनासाठी फायदेशीर
तूप सहज पचणारे आहे. त्यामुळे याने पचन तंत्र सुधारते आणि बद्धकोष्ठतेची समस्याही कमी करण्यास मदत होते.
