lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Parenting > तुमचीही मुलं ड्रग्जच्या विळख्यात सापडली तर? पार्टी करणाऱ्या मुलांकडे पालकांनी लक्ष ठेवायचं कसं?

तुमचीही मुलं ड्रग्जच्या विळख्यात सापडली तर? पार्टी करणाऱ्या मुलांकडे पालकांनी लक्ष ठेवायचं कसं?

ड्रग्ज रॅकेटसंदर्भात बातम्या वाचताना पालकांनी घाबरून जाणे उपयोगी नाही, आपली मुलं ड्रग्ज-पार्टी कल्चर यात अडकायला नको तर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2023 05:02 PM2023-11-01T17:02:28+5:302023-11-01T17:12:25+5:30

ड्रग्ज रॅकेटसंदर्भात बातम्या वाचताना पालकांनी घाबरून जाणे उपयोगी नाही, आपली मुलं ड्रग्ज-पार्टी कल्चर यात अडकायला नको तर...

What if your children are also involved in drugs? party culture? what is the role of family on youth addiction? | तुमचीही मुलं ड्रग्जच्या विळख्यात सापडली तर? पार्टी करणाऱ्या मुलांकडे पालकांनी लक्ष ठेवायचं कसं?

तुमचीही मुलं ड्रग्जच्या विळख्यात सापडली तर? पार्टी करणाऱ्या मुलांकडे पालकांनी लक्ष ठेवायचं कसं?

Highlightsलकही नवीन गोष्टी शिकतात, विविध प्रकारे आनंदी असतात हे मुलांना दिसायला हवं.

-सायली कुलकर्णी (मानसोपचारतज्ज्ञ)

‘लाइफ इज अ सेलिब्रेशन’च्या नावाखाली सध्या फिल्म इंडस्ट्रीसह सोशल मीडियातही पार्टी मूड दिसतो. सर्रास होणाऱ्या पार्ट्या नॉर्मलच मानल्या जातात. लोक सतत आणि भरपूर पार्ट्या करतात, मजा करतात या वातावरणाचा परिणाम प्री-टीन्स आणि टीनएजर्सवर अर्थात लहान आणि किशोरवयीन मुलांवर सर्वात लवकर होताना दिसतो. बर्थ डे पार्टी, विकेंड पार्टी, विविध डे सेलिब्रेशन्स यांची न संपणारी लांबलचक यादी आणि त्यामुळे न संपणारा ‘पार्टी मूड’ असं वातावरण चटकन तयार होतं. आनंद साजरा करणं वाईट नाही; पण पार्टी, सेलिब्रेशन आणि सोशलायझेशनच्या नावाखाली नेमकं काय होतं आहे आणि त्याचे परिणाम काय होतात याचाही विचार करायला हवा.
ब्रूक या सायकॉलॉजिस्टच्या मते, ज्या विद्यार्थ्यांचा विद्यार्थीदशेतील फोकल पॉईंट अर्थातच केंद्रबिंदू ‘पार्टी करणे’ हा असतो त्या विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य, शारीरिक आरोग्य, अभ्यासाची क्षमता आणि अकॅडमिक परफॉर्मन्स यावर नकारात्मक परिणाम झालेला दिसतो. याबाबतचा विविध सर्वेक्षणांमध्ये असेही लक्षात आले आहे की, पार्टीच्या आहारी गेलेल्या मुलांमध्ये अनेक दूरगामी नकारात्मक परिणाम दिसून येतात. पार्टी मधील ‘फन’ अर्थात मजा बहुतेकदा अल्कोहोल, स्मोकिंग, ड्रग्ज या गोष्टींशी जोडली जाते. मुलं समवयीन आणि मोठ्या मुलांच्या दबावाला बळी पडतात. ड्रग्जशी संबंधित अनेक बातम्या गेल्या काही दिवसांत आपण साऱ्यांनी वाचल्या. आपली मुलं त्यापासून लांब राहिली पाहिजेत. त्यासाठी काही गोष्टी पालकांनीही करायला हव्या.

(Image : google)

किशोरवयीन आणि तरुण होणारी मुलं पार्टी कल्चरकडे सर्वाधिक आकर्षित होतात असं का?

१. शरीर आणि मनाची विकसनशिल अवस्था असते.
२. सिनेमे, सोशल मीडिया यांचा अत्याधिक प्रभाव आहे.
३. सातत्याने आणि मोठ्या प्रमाणात असलेले पियर प्रेशर
४. फाेमो म्हणजेच फियर ऑफ मिसिंग आऊट ही भावना
५. शॉर्ट टर्म रिवॉर्डची असलेली सततची भूक
६. तीव्र भावनिक आंदोलने
७. सेलिब्रेशन, आनंद साजरा करणं, तो इतरांना दाखवणं, सोशल मीडियात हॅपनिंग फोटो / रील्स टाकणं या साऱ्या संकल्पना बदलल्या आहेत.


(Image : google)
 

नकार सेलिब्रेशनला नाहीच पण...

पण मग तुम्ही म्हणाल पार्टी करायची नाही, आनंद साजरा करायचाच नाही का?
आनंद साजरा करायला हवा; पण तो कसा, किती प्रमाणात, त्यात नशेला आणि उधळपट्टीला किती स्थान आहे? थोडक्यात आणि स्पष्ट सांगायचे झाल्यास तरुण मुलांच्या, वयात येणाऱ्या मुलांच्या आयुष्यात फक्त पार्टी करणं हा फोकल पॉईंट असताकामा नये. कारण ही वयाच्या मुलांची डेव्हलपिंग अवस्था असते. या काळात नवनवीन गोष्टी शिकण्याची, छंद जोपासण्याची, सृजनात्मक प्रयोग करण्याची, करिअर घडवण्याच्या दृष्टीने पावलं उचलण्याची गरज असते. मजा, नशा, व्यसनं हे टप्पे कधी सरतात हे मुलांच्या लक्षातही येत नाही. त्यातून अनेक मुलांचं भविष्य अंधारमय होऊन जातं.

(Image : google)

काय करता येईल?


१. मुलांनी पार्टी करताना फन- बॅलन्स- सेफ्टी या तीन गोष्टी लक्षात ठेवाव्या, म्हणून पालकांनी खबरदारी घ्यायला हवी, मुलांशी मोकळेपणानं बोलायला हवं.
२. मुलं पार्टी करणार म्हणजे काय करणार, कुठं करणार हे पालकांना माहिती हवं. हस्तक्षेप किंवा ढवळाढवळ न करता लक्ष ठेवता यायला हवं.
३. आपली टीनएजर मुलं कितीवेळा पार्टी करतात, त्यात काय खातात- पितात- त्यावर किती पैसा खर्च होतो, याकडे पालकांचं लक्ष हवं. मुलांना त्यासंदर्भात प्रेमानं सांगायला हवं.
४. मुलांवर पिअर प्रेशर असतंच; पण ते कसं टाळता येईल? मुलांना त्यांचं म्हणणं कसं ठामपणे मांडता येईल हे सांगायला हवं. मुलं आपल्यालाही ठाम नकार देतील तेव्हा ते स्वीकारायला हवेत.
५. प्री टीनेजर्स, टीनेज हे वाढीचं वय असल्यामुळे याच काळात एकत्र मिळून शिस्त नियम ठरवायला हवेत. आणि पालक आणि मुले या दोघांसाठी ते सारखेच असतील, दोघे पालक करतील हे पाहायला हवे.
६. पार्टीज, त्याच्याशी संबंधित धोके याबाबत पालक आणि मुलांचा मोकळेपणाने संवाद हवा.
७. मुलांना आपल्या भावना व्यक्त करता यायला हव्या, ते शिकवायला हवे.
८. मुलांना छंद, खेळ, नावीन्यपूर्ण गोष्टी, वाचन इत्यादींमधून आनंद मिळायला हवा. ॲडव्हेंचर त्यांनाही विविध गोष्टीत वाटले पाहिजे.
९. पालक मुलांसमोर रोल मॉडेल म्हणून समोर असावे. त्यासाठी पालकांचं वर्तन तसं हवं.
१०. मुलांना विविध संधी उपलब्ध करून द्या, ते करताना पालकही नवीन गोष्टी शिकतात, विविध प्रकारे आनंदी असतात हे मुलांना दिसायला हवं.

(लेखिका मानसोपचारतज्ज्ञ आहेत.)

Web Title: What if your children are also involved in drugs? party culture? what is the role of family on youth addiction?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.