लहान मुलं म्हणजे निरागसतेचं प्रतीक. पण त्यांच्या छोट्या छोट्या सवयींवरुनच त्यांच्या भविष्यातील स्वभाव, आरोग्य आणि वागणूक ठरते. काही सवयी अशा असतात की त्या सुरुवातीला साध्या वाटतात, पण वेळेच्या ओघात त्या मुलांच्या आयुष्यावर वाईट परिणाम करु शकतात. लहान मुलांची यात काही चूक नाही त्यांना तेवढी समज नसते. लहान मुले आजुबाजूला जे पाहतात त्यानुसार त्यांच्या सवय बदलतात. त्यामुळे पालकांनी फार काळजी घ्यायला हवी. मुलांना या सवयी पालकांमुळेच लागतात. पालकांनी वेळीच काळजी घेणे गरजेचे आहे.
१. डिजिटल युगात मुलांना उपकरणांपासून लांब ठेवणे शक्य नाही. पण समज येण्याआधीच मुलांना मोबाइल, टिव्ही आणि इतर उपकरणे आणून देणे तसेच दिवसभर वापरु देणे अजिबात चांगले नाही. मुलांसाठी ते अॅडिक्शन आहे. डोळ्यांवर मानसिकतेवर त्याचा भयंकर परिणाम होतो. त्यामुळे पालकांनी जरा कठोर राहणे गरजेचे आहे.
२. लहान मुलांना जंक फुडचे फार आकर्षण असते. आजकाल पाच रुपये किंवा दहाची नोट पुरत नाही. मुलांना मोठाल्या हॉटेल्समध्ये जायची इच्छा असते. मात्र ज्या वयात पैशाची किंमत कळत नाही त्या वयात भरमसाट खर्च करु दिला तर मुलांना पुढे जाऊन संतुलित जीवन जगणे कठीण जाते. त्यामुळे मुलांचे लाड पुरवा मात्र चोचले पुरवणे टाळा.
३. मॉडर्न पॅरेंटींगच्या नावाखाली मुलांना नाही बोलणे पालकांनी बंद केले आहे. ४ ते १४ वर्षाच्या मुलांना काही नवे दिसले ही हवेसे वाटते. पालकही किंमत , गरज काही न पाहता आणून देतात. मुलांना नाही ऐकायची सवयच लावत नाहीत. त्यामुळे मग पुढे मनासारखे न घडल्यास मुलांना नकार पचवता येत नाही. त्यातून मानसिक त्रास चुकीचे निर्णय यांना चालना मिळते. त्यामुळे मुलांना नाही बोला. सगळ्याच गोष्टी हातात आणून देऊ नका.
४. बरेचदा मुले मोठ्यांना उलटी उत्तरे देतात. पालकांना त्यांचे बोलणे गोड किंवा हजरजबाबी वाटते. मात्र मुलांच्या मनात उद्धटपणाने बोलणे चुकीचे नाही असा विचार निर्माण होतो. त्याला पालकांच्या कौतुकामुळे फूस लागते आणि नंतर मोठेपणीही मुले उद्धटपणा सोडत नाहीत. त्यामुळे मुलांना बोलायची पद्धत शिकवणे गरजेचे आहे.
५. आजकाल वेळेवर न झोपणे उशीरा उठणे अगदी सामान्य आहे. मध्यंतरी मुलांना लवकर उठावे लागू नये म्हणून सकाळच्या शाळा बंद करा दुपारी शाळा घ्या अशा मागण्याही सुरु होत्या. मुले या सवयींमुळे आळशी होतात. लहानपणीच वेळेवर उठण्याची आणि झोपण्याची सवय लागणे गरजेचे असते. त्यामुळे मुलांचे वेळापत्रक त्यानुसारच ठेवा.
