‘काय अभ्यास झाला का, परीक्षा जवळ आली ना, मोबाइल टीव्ही बंद करा..’ घरी आलेले पाहुणे असे सल्ले द्यायला लागले की मुलं वैतागतात. उलट उत्तर दिलं की आईबाबा रागवतात अशावेळी काय करावं? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच विद्यार्थ्यांशी चर्चा करताना या समस्येचं एकदम सभ्य पण हमखास असरदार सोल्युशन सांगितलं आहे. (Teach a lesson to your taunting and scolding relatives, PM Modi's special advice to students before exams!)ते उत्तर ऐकून मुलं खुश होतील नी आईबाबांना वाटेल की हे आपल्याला का सुचलं नाही? काय होतं ते उत्तर..
तर परीक्षेचं टेंशन न घेता उत्तम अभ्यास कसा करावा याविषयी विद्यार्थ्यांशी पंतप्रधान बोलत होते. एका मुलानं त्यांना प्रश्न विचारला की पाहूणे घरी आले की अभ्यास कसा करावा सांगतात, मार्क किती पडले विचारतात अशावेळी आम्ही काय करायचं?
पंतप्रधान म्हणाले सोपं आहे, तुम्हीच त्यांना सांगा की तुम्ही इतके यशस्वी आहात आयुष्यात, फार छान वाटलं भेटून. आता तुम्हीच सांगा तुम्हाला दहावीत किती मार्क होते, तुम्ही कसा अभ्यास करायचात? त्यांनी तुम्हाला काही विचारण्यापूर्वी तुम्हीच त्यांना प्रश्न विचारा की तुम्हाला शिक्षक रागवायचे का, राग यायचा का, तुम्ही काय करायचात? मग बघा कशी चर्चाच बदलून जाते. एकदम चर्चेचं टेबलच बदलून जाईल! (सोबतचा व्हिडिओ पाहा, पंतप्रधान हेच सांगत आहेत.)
पंतप्रधानांचा हा सल्ला मिश्किल असला तरी मुलांचं टेंशन कमी करणारा आहे. आणि मुख्य म्हणजे मोठ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे. मुलांना परीक्षाकाळात सल्ले देणं, कारण नसताना टोमणे मारणं, अती लेक्चर किंवा अती टेंशन देणं हे मोठ्यांनी टाळलं पाहिजे. चांगलं बोलावं, शुभेच्छा द्याव्या तर ते नाही, मुलांना धारेवर धरुन मोठेपणाचा फायदा घेणाऱ्या वडिलधाऱ्यांनीच आपलं काय चुकतंय हे समजून घ्यायला हवं.
ते समजून घेतलं नाही तर मग मुलांनी विचारलेल्या नेमक्या प्रश्नांची उत्तरं द्या, मुलं काय बोलतात चुरुचूर म्हणून रागवण्यात मग काही हशिल नाही.
परीक्षा जवळ येत आहेत अशावेळी मुलं म्हणजे पालकांच्या प्रतिष्ठेचे मेडल नाहीत हे जरी समजून घेतलं तरी घरोघरचं वातावरण बदलेल!
