Join us

जेवण करत नाही म्हणून लहान मुलांना फोन देता? वेळीच व्हा सावध, हृदयरोगाचा वाढतो धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 14:06 IST

Screen Time For Kids Harmful Effects: लहान मुलं जेवत नसतील तर त्यांच्या हाती मोबाइल देता आणि निवांत आपली कामं करता? एकदाचा मोबाइल द्यावा आणि डोक्याची किटकिट दूर करावी, असा विचार करता? थांबा, सावध व्हा...

Screen Time For Kids Harmful Effects:  अलिकडे जास्तीत जास्त पालकांची तक्रार असते की, लहान मुलं फोन बघितल्याशिवाय अजिबात घासालाही हात लावत नाही. अशात त्यांना मोबाइल किंवा टीव्ही दाखवत त्यांना जेवण भरवावं लागतं. आपणही असंच करता का? मुलं जेवत नसतील तर त्यांच्या हाती मोबाइल देता आणि निवांत आपली कामं करता? एकदाचा मोबाइल द्यावा आणि डोक्याची किटकिट दूर करावी, असा विचार करता? असं जर करत असाल तर आपल्या लहान मुलांना आपण आजारांच्या डोहात ढकलत आहात. 

अमेरिकन हार्ट असोसिएशनवर अलिकडेच एक संशोधन प्रकाशित करण्यात आलं. ज्यात सांगण्यात आलं की, जास्त स्क्रीन टाइममुळे लहान मुलांचं हृदय कमजोर होत आहे. डेन्मार्कमध्ये करण्यात आलेल्या या संशोधनात आढळून आलं की, स्क्रीन टाइम वाढत असल्यामुळे लहान मुलांमध्ये ब्लड प्रेशर, कोलेस्टेरॉल आणि इन्सुलिन रेजिस्टन्सच्या केसेस जास्त आढळून आल्या आहेत. ज्यामुळे पुढे जाऊन त्यांच्यात शुगर आणि हृदयरोगाचा धोका वाढतो.

जास्त फोन-टीव्ही बघणं घातक

संशोधकांना आढळून आलं की, स्क्रीन टाइममध्ये रोज एक तास अधिक वाढल्यास आजारांचा धोका इतरांच्या तुलनेत जास्त वाढतो. म्हणजे जर मुलांनी आपल्या मित्राच्या, भावाच्या किंवा बहिणीच्या तुलनेत 3 तास जास्त फोन बघितला तर त्यांना हार्ट आणि शुगरच्या आजारांचा धोका साधारण 50 टक्के अधिक वाढतो. मग असा विचार करा की, फोन किंवा टीव्हीवर घालवलेला प्रत्येक तास किती घातक आहे.

मोबाइलमुळे वाढली आत्महत्या प्रवृत्ती

जर्नल ऑफ अमेरिकन असोसिएशनच्या रिपोर्टने तर जगभरातील पालकांची चिंता वाढवली आहे. कारण रिपोर्ट नुसार, 11 वर्ष वयावरील प्रत्येक 3 पैकी 1 लहान मुलं-मुली मोबाइल अ‍ॅडिक्ट आहेत. यामुळे शारीरिक आरोग्य तर बिघडलंच, सोबतच मानसिक आरोग्यही धोक्यात आलं आहे.

भारतात अनेक मोठ्या शहरांमध्ये लहान मुलं 68 टक्के रोज सरासरी 4 तास स्क्रीनवर वेळ घालवतात. हे फारच घातक आहे. आपला म्हणजेच पालकांचा त्रास कमी करण्यासाठी लहान मुलांना फोन देणं किंवा टीव्ही लावून देणं फारच धोक्याच्या स्टेजवर आलं आहे. जर असंच पुढे चालू राहिलं तर कमी वयात मुलं हृदयरोगाचे शिकार होतील. अशात त्यांना हेल्दी सवयी लावा आणि निरोगी ठेवा.

टॅग्स :पालकत्वहेल्थ टिप्सहृदयरोग