- प्रियांका निर्गुण.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) परदेशी दौऱ्यावर असून अमेरिकेत त्यांनी जगप्रसिद्ध श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क (Elon Musk) यांची भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एलॉन मस्क यांची भेट गुरुवारी १३ फेब्रुवारी रोजी ब्लेअर हाऊसमध्ये झाली. या भेटीसाठी एलॉन मस्क यांच्यासोबत त्यांची प्रेयसी शिवोन जिलिस आणि तीन मुलं देखील होती. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी एलन मस्क यांच्या मुलांसाठी खास भेटवस्तु देखील दिल्या. नरेंद्र मोदी यांनी एलॉन मस्क यांच्या मुलांना दिलेल्या अनोख्या भेटवस्तूंची सध्या फारच चर्चा आणि कौतुक होताना दिसत आहे(PM Modi gifts Panchatantra and Malgudi Days to Elon Musk’s kids).
एखाद्या व्यक्तीला भेटवस्तू देताना आपण अनेकवेळा विचार करुन योग्य आणि साजेशी अशीच भेटवस्तू देतो. शक्यतो आपण अशी भेटवस्तू देतो जी त्या व्यक्तीच्या कायम लक्षात राहील किंवा त्याच्या उपयोगी येईल. यातही लहान मुलांना भेटवस्तू देताना त्यांना नेमकं काय द्यावं असा प्रश्न आपल्याला बरेचदा पडतो. लहान मुलांना आवडेल, त्यांना खेळता येईल किंवा ( From Tagore to Panchatantra: Top classics among PM's gifts to Elon Musk's children) अशी वस्तू जी त्यांच्या विकासाला मदत करेल अशाच वस्तूची आपण निवड करतो. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एलॉन मस्क यांच्या मुलांना भेटवस्तू म्हणून गोष्टींची पुस्तके दिली आहेत, ही पुस्तके नेमकी कोणती आणि मुलांना अशी गोष्टीची पुस्तके वाचायला लावण्याचे किंवा वाचून दाखवण्याचे महत्व नेमकं काय ते पाहूयात.
नरेंद्र मोदी यांनी भेटवस्तू म्हणून दिली गोष्टींची पुस्तके...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एलॉन मस्क यांच्या मुलांना तीन पुस्तकं भेट म्हणून दिली आहेत. या पुस्तकांमध्ये नोबेल पुरस्कार विजेते रवींद्रनाथ टागोर यांचे द क्रिसेंट मून, द ग्रेट आरके नारायण कलेक्शन आणि पंडित विष्णु शर्मा यांचं पंचतंत्र ही पुस्तकं दिली आहेत. पंतप्रधान मोदी यांनी या भेटीचे फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत. यात मुलं पुस्तकं वाचताना दिसत आहेत. ते पोस्टमध्ये म्हणतात, एलॉन मस्कच्या कुटुंबाला भेटणं आणि अनेक विषयांवर चर्चा करुन खूप छान वाटलं.
आराध्याची उंची छान वाढावी म्हणून आई ऐश्वर्या राय घेतेय तिच्या डाएटची काळजी, देते ५ पदार्थ...
फिटनेस ट्रेनर अंशुका परवानी सांगते परीक्षेचं टेंशन कमी करण्याचा उपाय-५-४-३-२-१, व्हा रिलॅक्स...
लहान मुलांना गोष्टी सांगितल्याने किंवा वाचून दाखवल्याने नेमकं काय होत?
आपल्याकडे ‘गोष्टी सांगण्याची’ फार मोठी परंपरा आहे. पिढ्यानपिढ्या सांगितल्या जात असलेल्या कथांनी मनोरंजनाबरोबर समाजशिक्षणाचंही काम केलं आहे. मुलांना गोष्टी ऐकायला आवडतात,त्यात त्यांना मजा वाटते.गोष्टी मुलांचे निखळ मनोरंजन करतात.केवळ या एकाच उद्देशासाठी मुलांना गोष्टी सांगितल्या पाहिजेत. गोष्टी त्यांना स्वतःचे एक सुंदर जग निर्माण करण्याची सर्जनशीलता देतात. यामुळेच कथा मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्वाच्या मानल्या जातात. गोष्टी ऐकल्यामुळे मुलांच्या ऐकण्याच्या क्षमतेचा विकास होतो. मुलं गोष्टी ऐकण्यासाठी बराच काळ एका जागी स्थिर बसून राहतात. यामुळे मुलांच्यात एका जागी स्थिर होऊन बसण्याची व ऐकण्याची सवय लागून त्यांची एकाग्रता वाढते. मुख्य म्हणजे ऐकून समजून घेण्याच्या क्षमतेचा विकास होतो.
गोष्ट सांगण्याने एका निर्णायक काळात धीराने ऐकण्याची सवय मुलांना लागते.पुढे हीच सवय त्यांच्या जीवनाचा एक भाग बनून जाते. कथा मुलांना कल्पक बनवतात. कथांनी मुले सर्जनशील होतात. कथांमध्ये हरवून ते त्या पात्रांची कल्पना करतात, त्या वातावरणाची कल्पना करतात. ते अशा परिस्थितीत स्वतःला अनुभवतात आणि अशा प्रकारे ते समस्या सोडवण्यास देखील शिकतात. कथा सांगणे आणि मुलांमधील भावनिक विकास यांचाही खोल संबंध असतो. मुलांच्या भावनिक बुद्धिमत्तेचा विकास करण्यासाठी गोष्टींचा उपयोग होऊ शकतो. मुलांच्या भावनिक विकासासाठी त्यांना नियमित कथा ऐकवल्या पाहिजेत. मुले गोष्टीतील पात्रांच्या भावभावना समजून घेण्याचा प्रयत्न करतात. स्वत:ला त्या पात्रांच्या ठिकाणी कल्पून विचार करतात. इतरांच्या भावभावना समजून घ्यायला शिकतात. गोष्टीतून मुलांना वेगवेगळया मानसिक प्रक्रियांचा अनुभव मिळतो.
जेव्हा आपण मुलांसमोर गोष्टीची पुस्तके वाचतो किंवा मुलांना कथा सांगतो तेव्हा त्यांची भाषा अधिक समृद्ध होते. ते त्यांच्या भावना चांगल्या प्रकारे व्यक्त करायला शिकू लागतात. त्यांची वाक्यरचना, शब्दांची निवड यांसारख्या गोष्टींचे आकलन वाढते. अशा प्रकारे, कथाकथनाच्या मदतीने त्यांचे संवाद कौशल्य वाढते, म्हणून त्यांच्यासाठी दररोज आवर्जून एक गोष्ट वाचा.
खरंतर, लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत,अगदी जगभरातील सर्वांनाच गोष्टी ऐकायला,वाचायला,सांगायला आवडतात. काळ कितीही बदलला तरीही मुलांना गोष्ट सांगणे हे त्यांच्या व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहे. गोष्टी ऐकल्याने आपले मुलं व्यावहारिक बनते आणि त्यांचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलतो. जर आपले मुलं पुढे जाऊन चांगली व्यक्ती म्हणून ओळखली जावी, अशी आपली इच्छा असेल तर त्यांना गोष्टी सांगणं खूप गरजेचं आहे.