घरात आई, आजी किंवा मोठी माणसं अनेक गोष्टी सहज बोलून जातात. त्या त्यांच्या अनुभवातून आलेल्या असतात, पण काही वाक्यं आणि संकल्पना अशा असतात ज्या लहान मुलांच्या मनावर खोल परिणाम करतात. महिलांच्या विरोधात जाणाऱ्या या संकल्पना जास्त करुन महिलांमार्फतच बोलल्या जातात. (parents, stop saying these 5 sentences in front of your children, parenting tips)लहानपणी ऐकलेल्या गोष्टीच मुलांच्या विचारांचा पाया असतात. त्यामुळे काही पारंपरिक वाक्यं नकळत चुकीचे समज, भेदभाव किंवा भीती निर्माण करू शकतात. आपणही लहानपणापासून हे ऐकत आले आहोत. पण या पुढच्या पिढ्यांना त्याचा त्रास होणार नाही यासाठी हे विषय टाळा.
१. मुलं रडत नाहीत
लहान मुलगा रडला की त्याला लगेच मुलीसारखं रडू नको असं सांगितलं जातं. त्यामुळे मुलांना भावना व्यक्त करणं चुकीचं वाटू लागतं. पुढे मोठं झाल्यावर ते मनातील ताण, दुःख किंवा भीती व्यक्त करू शकत नाहीत. भावना दाबून ठेवणं ही ताकद नसून मानसिक आरोग्यासाठी धोकादायक गोष्ट ठरू शकते. तसेच मुली रड्या आणि कमकुवत असतात असे त्यांना वाटते.
२. मुलींनी जास्त बोलू नये
अनेक मुलींना लहानपणापासून शांत राहायला, कमी बोलायला शिकवलं जातं. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो. सासरी कोण ऐकणार तुझी बडबड अशी वाक्य त्या मुलीचा आत्मविश्वास कमी करते. स्वतःचं मत मांडणं चुकीचं आहे असं त्यांना वाटू लागतं. पुढे आयुष्यात अन्याय होत असतानाही आवाज उठवण्याची भीती निर्माण होऊ लागते.
३. घरकाम हे फक्त महिलांचं काम आहे
आजही अनेक घरांमध्ये मुलींना स्वयंपाक, साफसफाई शिकवली जाते, पण मुलांना त्यापासून दूर ठेवलं जातं. त्यामुळे मुलांच्या मनात घरकाम ही कमीपणाची किंवा फक्त महिलांची जबाबदारी आहे असा गैरसमज तयार होतो. प्रत्यक्षात घर हे सगळ्यांचं असतं आणि जबाबदाऱ्या देखील सगळ्यांनी वाटून घ्यायला हव्यात.
४. मोठ्यांनी सांगितलेलं ऐकायचंच प्रश्न विचारायचे नाहीत
संस्कार शिकवताना मुलांना प्रश्न विचारण्यापासून थांबवलं जातं. पण प्रत्येक गोष्ट न विचारता स्वीकारण्याची सवय मुलांना चुकीच्या गोष्टीविरोधात बोलण्यापासून रोखू शकते. मुलांनी मोठ्यांचा आदर ठेवावाच, पण त्यांना विचार करण्याची आणि योग्य-अयोग्य समजून घेण्याची मोकळीकही मिळायला हवी.
५. लोक काय म्हणतील
हे वाक्य अनेक घरांमध्ये सतत ऐकायला मिळतं. त्यामुळे मुलं स्वतःच्या आवडी, स्वप्नं किंवा निर्णयांपेक्षा समाजाच्या मताला जास्त महत्त्व देऊ लागतात. सतत इतरांच्या मताची भीती बाळगल्याने आत्मविश्वास कमी होतो आणि स्वतःची ओळख हरवू शकते.
६. मुलगी म्हणजे परक्याचं धन
ही संकल्पना मुलींना लहानपणापासूनच स्वतःच्या घरात तात्पुरती असल्याची भावना देते. त्यामुळे त्यांच्यात असुरक्षितता निर्माण होते. शिवाय या वाक्यात मुलगी कोणाची तरी मालमत्ता असल्याचा भास होतो. त्यामुळे तिला कसंही वागवण्याची मुभा समाजाला मिळते. त्यामुळे अशी अनेक वर्ष वापरली जाणारी वाक्य पुढच्या पिढ्यांपर्यंत नकोच जायला.
Web Summary : Avoid phrases that instill fear, bias, and undermine confidence in children. Refrain from gendered expectations, suppressing emotions, or prioritizing societal opinions over their dreams. Promote open communication and equality.
Web Summary : बच्चों में डर, पूर्वाग्रह पैदा करने और आत्मविश्वास को कम करने वाले वाक्यांशों से बचें। लिंग आधारित अपेक्षाओं, भावनाओं को दबाने या उनके सपनों पर सामाजिक राय को प्राथमिकता देने से बचें। खुले संचार और समानता को बढ़ावा दें।