डॉ. संजय जानवळे (बालरोगतज्ज्ञ)
बहुतेकदा व्हायरल इन्फेक्शनमध्ये अंगावर पुरळ आली की ताप उतरतो. पण गोवरमध्ये पुरळ आली की तापाची तीव्रता वाढत जाते.(Measles in children) सोबत डोळ्यातून पाणी येणे, नाक वाहणे, त्रासदायक खोकला अशी लक्षणे आढळतात. तापाच्या तिसऱ्या दिवशी चेहऱ्यावर पुरळ येते.(Measles precautions) नंतर ती अंगावर व पायावर फैलावतो. जेव्हा पुरळ सर्व अंगावर येते, त्याक्षणी ताप उतरतो.(Measles symptoms)
गोवर हा आजार कोणत्याही वयात होत असला तरी, लहान मुलांत त्याचे प्रमाण अधिक असते. व्हायरल इन्फेक्शन झाल्याने होणारा हा आजार तसा आपोआप बरा होतो; पण सेकंडरी इन्फेक्शन आणि त्यातून उद्भवणाऱ्या गुंतागुंतीमुळे त्या बालकांना प्राण गमवावे लागतात. अशा कॉप्लिकेशन्समध्ये न्यूमोनिया, एन्सेफेलायटीस ( मेंदूचा दाह ), अतिसार, कन्जक्टिव्हायटिस यांचा समावेश होतो. बालकाचे कुपोषण होते. वजन घटते. शरीरातल्या ‘अ’ जीवनसत्त्वाचा साठा झपाट्याने कमी होतो. आधीच कुपोषित असलेल्या बालकांच्या बाबतीत तर हे हमखास घडते.
उपचार
१. गोवर हा आपोआप बरा होणारा आजार असून, त्यावरचे हे उपचार त्याच्या लक्षणाप्रमाणे असतात. उदा. तापेसाठी औषध, सर्दीसाठी नाकात टाकायचे सलाइन ड्रॉप इत्यादी.
अ- जीवनसत्त्वाचा एक डोस देण्यात येतो.
२. एकदा गोवर झाल्यानंतर तो पुन्हा होण्याची शक्यता जवळजवळ नसते.
३. पण एक महत्त्वाचे काम पालकांना करायचे आहे, ते म्हणजे बालकांचे कुपोषण होऊ नये याची काळजी घेणं.
४. बाळाला गोवर होऊ नये म्हणून गोवर प्रतिबंधक लस द्या. ही लस अत्यंत सुरक्षित आणि परिणामकारक आहे. मूल नऊ महिन्यांचे होताच त्याला गोवर प्रतिबंधक लस देण्यात येते. मूल पंधरा महिन्याने झाल्यानंतरच त्याला एमएमआर (मम्स मिझल्स, रुबेला) ही लस देण्यात येते. या लसीमुळे शरीरातील प्रतिकारशक्ती वाढते व एक प्रकारचे सुरक्षा कवच निर्माण होते.
