Join us
Daily Top 2Weekly Top 5

ॲपल खातोस की बटाट्याची पिवळी भाजी? मुलांवर परभाषा लादण्याचे पाहा बालवयात मेंदूवर काय परिणाम होतात..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2026 08:20 IST

Marathi Rajbhasha Gaurav Din 2026, importance of cognitive development in children : मराठी राजभाषा गौरव दिन २०२६: मातृभाषेत मुलांचं शिक्षण का आवश्यक, आणि पालकांचं नेमकं काय चुकतंय

कालच ऐकलेल्या एका गाण्याची चालही दुसर्‍या दिवशी आपल्याला आठवत नाही. पण वयाच्या ५व्या वर्षी शिकलेली कविता अजही तोंडपाठ कशी? बडबडगीते, आजीसोबत शिकलेले श्लोक, मंदिरात ऐकलेले अभंग, जुन्या मालिकांची शिर्षकगीते आजही तोंडपाठ आहेत ना? त्याचे कारण म्हणजे ही गाणी आणि कविता आपण आपल्या अशा वयात शिकलेले असतो ज्यावेळी आपला मेंदू सगळ्यात जास्त क्रियाशील असतो. शाळेत आपण मराठी, हिंदी , इंग्रजी तिन्ही भाषा एकाच वेळी व्यवस्थित शकतो. कारण ते वयच तेवढे खास असते. शास्त्रीय भाषेत त्याला Critical Period Hypothesis असे म्हटले जाते. त्यातील आणखी एक खास गोष्ट म्हणजे मातृभाषेत शिकलेल्या गोष्टी जास्त स्पष्ट आणि चांगल्या आठवतात. कारण जेव्हा तुम्ही लहानपणापासून शिकत आलेल्या आणि आजूबाजूला ऐकलेल्या भाषेत ज्ञान मिळवता तेव्हा ते डोक्यात अगदी छान बसते. 

आजकाल मात्र अनेकदा मुलांना इंग्रजीची गोडी लावण्यासाठी पालक त्यांना बळजबरी इंग्रजीत संवाद करण्यास भाग पाडतात. घरोघरी मला भूक लागली आहे ची जागा आता I an hungry ने घेतली आहे. शहरांमध्ये तर आमच्या मुलाला मराठी बोलता येत नाही असे सांगणारेही अनेक मराठी भाषिक आहेत. मुद्दा फक्त मातृभाषा जपण्याचा नसून त्या मुलांच्या आकलनशक्तीवर होणाऱ्या परिणामाचा आहे. मातृभाषेत शिक्षण आणि संवाद अधिक प्रभावी ठरते, तसेच लहान मुलांशी त्यांच्या मातृभाषेत बोलणे बौद्धिक आणि भावनिक विकासासाठी महत्त्वाचे असते, असे सांगणारे अनेक भाषाशास्त्रीय व शैक्षणिक अभ्यास आहेत.

यामध्ये विशेष उल्लेख केला जातो तो Mother Tongue-Based Multilingual Education (MTB-MLE) या संकल्पनेचा. या दृष्टिकोनानुसार, मुलांना सुरुवातीचे शिक्षण त्यांच्या मातृभाषेत दिल्यास त्यांची संकल्पना समजण्याची क्षमता अधिक चांगली विकसित होते. मातृभाषेतून शिकलेले ज्ञान भक्कम पाया तयार करते आणि नंतर इतर भाषा शिकणेही सोपे जाते. पालकांनी मुलांशी मातृभाषेत संवाद साधणे हे भाषाविकास, संज्ञानात्मक (cognitive) वाढ आणि सामाजिक-भावनिक समजुतीच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. 

भाषा आत्मसात करण्याच्या प्रक्रियेत लहानपणी मेंदूची न्यूरोप्लास्टिसिटी (neuroplasticity) उच्च पातळीवर असते. Critical Period Hypothesis नुसार बालवयात मेंदू अधिक परिणामकारकपणे प्रक्रिया करतो. त्यामुळे जर ज्ञान मुलांच्या नैसर्गिक, परिचित मातृभाषेत असेल, तर ध्वनिवैशिष्ट्ये (phonology), शब्दसंग्रह (lexicon) आणि व्याकरणरचना (syntax) अधिक सुलभतेने आत्मसात होतात. आपल्या आजी -आजोबांच्या पिढीकडे पाहिले तर वयाच्या ८०व्या वर्षीही त्यांना अनेक गोष्टी तोंडपाठ आहेत कारण त्यांनी मातृभाषेचा वापर जास्त केला. एकंदरीत मुलांच्या योग्य विकासासाठी मातृभाषेचे ज्ञान आणि त्याचा घरी वापर फार महत्त्वाचा आहे. इंग्रजी यायलाच हवी मात्र फक्त इंग्रजी आले की आमचं बाळ हुशार हा समज अत्यंत चुकीचा ठरतो. 

English
हिंदी सारांश
Web Title : Mother tongue shapes children's brains; avoid forcing foreign languages.

Web Summary : Early learning in the mother tongue enhances cognitive development. Prioritizing it strengthens understanding and later language acquisition. Neuroplasticity facilitates easier learning of phonology, vocabulary, and grammar in a familiar language. Focus on mother tongue for child's development.
टॅग्स :पालकत्वसोशल मीडियासोशल व्हायरलमराठीमराठी भाषा दिन