Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Parenting > मुलांचं बोलणं-शिकणं बंद कुणी केलं? कुणी मुलांना तोडलं आपल्या समाजापासून-आनंदापासून..

मुलांचं बोलणं-शिकणं बंद कुणी केलं? कुणी मुलांना तोडलं आपल्या समाजापासून-आनंदापासून..

international mother language day 2026 : येत्या शनिवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन त्यानिमित्त चर्चा मातृभाषेतून शिक्षण का महत्त्वाचं!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2026 18:44 IST2026-02-17T18:06:38+5:302026-02-17T18:44:21+5:30

international mother language day 2026 : येत्या शनिवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन त्यानिमित्त चर्चा मातृभाषेतून शिक्षण का महत्त्वाचं!

International Mother Language Day 2026 : why mother language is important for education, impact of mother language education | मुलांचं बोलणं-शिकणं बंद कुणी केलं? कुणी मुलांना तोडलं आपल्या समाजापासून-आनंदापासून..

मुलांचं बोलणं-शिकणं बंद कुणी केलं? कुणी मुलांना तोडलं आपल्या समाजापासून-आनंदापासून..

-प्रसाद मणेरीकर (शिक्षणअभ्यासक)


मुलांच्या शिक्षणाची भाषा कोणती असं कोणी विचारलं तर “ कोपर्‍यावरची भाजीवाली ज्या भाषेत बोलते ती !” हे सहजसोपं आणि शास्त्रशुद्ध उत्तर आहे.
दुर्दैवाचा मुद्दा असा आहे की आज मातृभाषा हा अनेकांसाठी केवळ भावनिक मुद्दा राहिला आहे. आपली भाषा मुलांना आली पाहिजे इथेच आणि इतकाच तो मर्यादित राहतो. निवडणुकीसारख्या वातावरणात मातृभाषेची भावनिक साद उपयोगी पडते आणि तिथेच ती संपते. (नाही तर मराठी माध्यमाच्या शाळांचं रूप बदललं असतं!) आणि त्यामुळे भाषेचा मोडका तोडका व्यावहारिक वापरच काय तो उरतो; पण भाषा समृद्ध करणारा ज्ञान निर्मितीसाठीचा आणि शिक्षणासाठीचा वापर मात्र बाजूला पडतो.
‘मातृ हस्ते भोजनम्’ या श्लोकाला विनोबा भावे यांनी पुढे जोड देऊन ‘मातृ मुखेन् शिक्षणम्’ अशी पूर्तता केली आहे. विनोबांचं हे द्रष्टेपण आज विज्ञानाच्या कसोटीवरही तितकंच योग्य ठरलं आहे. मातृभाषा ही माणसाच्या भावनांशी, विचाराशी आणि संस्कृतीशी जोडलेली असते.
मूल जन्मल्यापासून आई-वडील, नातेवाईक, शेजारी-पाजारी यांच्याकडून जी भाषा ऐकते आणि बोलते, तीच त्याची मातृभाषा असते. त्या भाषेतूनच ते जग समजून घेण्यास सुरुवात करतं. त्यामुळे शिक्षण जर मातृभाषेत मिळालं तर विद्यार्थी विषय अधिक सहजपणे आणि आत्मीयतेने समजून घेतात. विषय समजणं म्हणजे त्यातील विविध संकल्पना समजणं आणि त्या संकल्पना प्रत्यक्ष व्यवहारातूनच समजतात; पण परकीय भाषेत जेव्हा एखादी संकल्पना समजून दिली जाते तेव्हा मुळात ती भाषा समजून घ्यायलाच मुलांना कष्ट पडतात तर त्यापुढे जाऊन संकल्पना कशा समजून घेणार ? मग 'मुलांना शिकवलेलं कळत नाही' असं म्हणायला आणि दोष मुलांच्या माथी मारायला आपण मोकळे असतो!
मातृभाषेत शिक्षण घेतल्यामुळे विद्यार्थ्यांचा बोलण्यातला आत्मविश्वास वाढतो. ते वर्गात मोकळेपणाने प्रश्न विचारू शकतात आणि आपले विचार स्पष्टपणे मांडू शकतात; पण परकीय भाषेत शिक्षण घेताना अनेक विद्यार्थी संकोचतात, कारण त्यांना भाषेची भीती वाटते. आपल्याला जे म्हणायचं आहे ते नीट दुसऱ्याला समजेल असं मांडता येईल का यातच ते अडकून पडतात. परिणामी, नवं शिकण्याची मुळात असणारी त्यांची जिज्ञासाच कमी होते.
आणि मग आपल्याच तक्रारी सुरू होतात की, 'मुलं बोलतच नाहीत!' कशी बोलतील ती? आपणच त्यांचं बोलणं बंद करून टाकतो!
मातृभाषेत शिक्षण देणं हे केवळ सांस्कृतिक किंवा भावनिक दृष्टीने महत्त्वाचं नसून आधुनिक विज्ञानातील संशोधनाचाही याला भक्कम आधार आहे.

 

मेंदू विज्ञान आणि भाषाशास्त्रीय संशोधन

आधुनिक मेंदू विज्ञान (Neuroscience) सांगते की मुलांचा मेंदू सुरुवातीच्या वर्षांत अत्यंत लवचिक असतो. या काळात जे शिक्षण मुलांच्या परिसरातील भाषेत म्हणजे मातृभाषेत दिले जाते, ते मेंदूत पेशी -जाळे अधिक चांगल्या प्रकारे निर्माण करते. याचाच अर्थ मुलांना शिकवलेलं अधिक चांगलं समजतं आणि ते मेंदूमध्ये टिकतं. मातृभाषेतून शिकताना भाषा परिचयाची असल्याने मुलांना संकल्पना समजून घेणं सोपं जातं; पण जेव्हा शिक्षण परभाषेत असतं तेव्हा ही शिकण्याची मुळात गुंतागुंतीची असलेली प्रक्रिया, प्रथम त्या भाषेचे स्वत:च्या भाषेत भाषांतर, मग ( झाला तर ) अर्थबोध आणि नंतर संकल्पना समजणे, अशी अनेक पायऱ्यांची अवघड प्रक्रिया घडते. यामुळे आकलनाचा ताण वाढतो. मुलांना कंटाळा येतो. ती शिकण्यापासून दूर जातात.
अलीकडे अनेक विद्यापीठांतून झालेल्या संशोधनातून असंही दिसून आलं आहे की, मातृभाषेत शिक्षण मिळालेल्या विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती, प्रश्न ( समस्या ) सोडवण्याची क्षमता आणि विश्लेषणशक्ती अधिक चांगली असते. कारण त्यांच्या मेंदूतील भाषिक आणि विचारप्रक्रिया एकमेकांशी थेट जोडलेल्या असतात. परभाषेत शिक्षण घेताना मेंदूला अतिरिक्त कष्ट करावे लागतात, ज्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये कंटाळा, न्यूनगंड आणि अपयशाची भीती निर्माण होऊ शकते.
दुसरं म्हणजे भाषाशास्त्रानुसार भाषा ही केवळ संवादाचं साधन नसून ती विचारांची रचना घडवत असते. आपण विचार भाषेचा माध्यमातून करतो. परभाषेतून विचार करताना या विचार प्रक्रियेत शब्दांचा अडसर आला तर त्यातून विचार प्रक्रियाच मंदावते किंवा थांबते आणि म्हणूनच मातृभाषेत शिक्षण घेतल्यास विद्यार्थ्यांची विचारप्रक्रिया अधिक सुसंगत आणि सखोल होण्यास मदत होते.
पहिल्या भाषेत मुलं जर प्रवीण असतील तर दुसरी (परकीय) भाषा शिकणं अधिक सोपं जातं; हे आता भाषा शास्त्रज्ञांनी सिद्ध केलं आहे. याउलट, पहिली भाषा नीट आत्मसात न झाल्यास इतरही भाषा कमकुवत राहू शकतात. हे चित्र आपण आपल्या भोवताली पाहतो आहोत.
मुळात मातृभाषेचं वैशिष्ट्य हे की, ती संस्कृतीची वाहक असते. भाषा, साहित्य, लोककथा, म्हणी परंपरा यामधून हे सारंग संचित पुढील पिढीकडे पोहोचत असतं. जर शिक्षण मातृभाषेत असेल, तर विद्यार्थ्यांना आपल्या संस्कृतीची जाणीव होते आणि ती जपण्याची प्रेरणा मिळते; पण मुळात मातृभाषाच परकी असेल तर ज्ञानेश्वर – तुकाराम अधिक परके होतात आणि भाषेला तितक्याच समृद्ध करणाऱ्या ओव्या –अभंग – लोककथा – कविता- लोकसाहित्य आणि पर्यायाने भोवतालचा समाज अधिकच परका होतो.
याचा अर्थ, इंग्रजीला विरोध आहे का? तर अजिबात नाही. मुलांनी फक्त इंग्रजीच का, आणखीही वेगवेगळ्या दहा भाषा शिकाव्यात. त्यांची ती क्षमता आहेच. उलट एका भाषेपायी आपण त्यांची ती क्षमता मारून टाकतो आहोत हा मुद्दा आहे.
थोडक्यात, मातृभाषेत शिक्षण देणं हा केवळ भावनिक किंवा सांस्कृतिक मुद्दा नसून ते वैज्ञानिकदृष्ट्याही योग्य आहे. मातृभाषा ही ज्ञानाची पहिली पायरी आहे; तिच्यावरच पुढील सर्व शिक्षणाची इमारत उभी राहते. म्हणूनच प्राथमिक आणि मूलभूत शिक्षण मातृभाषेत देणं अत्यावश्यक आहे, मगच इतर भाषांचं ज्ञान पूरक म्हणून आत्मसात करणं अधिक योग्य ठरेल.

मातृभाषेत शिक्षण न घेतल्यामुळे येणाऱ्या अडचणी

१. अर्थबोध होत नाही – परभाषेत शिकताना लक्ष भाषेतील शब्दांवर अडकते, त्यामुळे विषय समजत नाही.
२. आत्मविश्वास कमी होणे – वर्गात प्रश्न विचारण्यास किंवा मत मांडण्यास भीती वाटते.
३. स्मरणशक्तीवर ताण – परक्या भाषांतराची प्रक्रिया मेंदूवर अतिरिक्त ताण निर्माण करते. त्यातून शिक्षणाविषयी नाराजी निर्माण होते.
४. शैक्षणिक गळती – विशेषतः ग्रामीण आणि वंचित वर्गामध्ये परकीयभाषेमुळे शिक्षण कठीण वाटतं आणि विद्यार्थी शिक्षण सोडून देतात.
५. सांस्कृतिक दुरावा – आपल्या परंपरा, साहित्य आणि परिसरातील परंपरागत ज्ञान यांपासून विद्यार्थी दूर जातात.

pmanerikar@gmail.com

Web Title : बच्चों का बोलना, सीखना किसने रोका? समाज से दूर किसने किया?

Web Summary : मातृभाषा में शिक्षा आत्मविश्वास, समझ और सांस्कृतिक जुड़ाव को बढ़ावा देती है। विदेशी भाषाएँ सीखने में बाधा डालती हैं, तनाव और अलगाव का कारण बनती हैं। मातृभाषा को प्राथमिकता देना बच्चों को सशक्त बनाता है।

Web Title : Who stopped children from speaking, learning? Cut off from society?

Web Summary : Mother tongue education fosters confidence, understanding, and cultural connection. Foreign languages hinder learning, causing stress and alienation. Prioritizing mother tongue empowers children.