हल्लीची मुलं ऐकतच नाहीत असं कित्येक पालकांचं म्हणणं असतं. मुलं खूप हट्टी झाली आहेत, कोणत्याच बाबतीत त्यांना काहीच ऐकून घ्यायचं नसतं. त्यांची इच्छा असते तेच त्यांना करायचं असतं अशा पद्धतीची तक्रार जवळपास सगळेच आईवडील करत असतात. मुलांना योग्य वळण लागण्यासाठी त्यांना थोडी शिस्त लावणं तर खूप गरजेचं असतं. पण नेमका बऱ्याच पालकांना असा अनुभव येतो की मुलांना शिस्तीत ठेवण्याचा प्रयत्न केला तर ते जरा जास्तच बेशिस्त होतात. यामागचं कारण म्हणजे शिस्त लावण्याची चुकीची पद्धत. आता मुलांना शिस्तीत ठेवण्यासाठी पालकांनी नेमकं काय करावं आणि काय टाळावं ते पाहा...
मुलांना शिस्त लावण्याची योग्य पद्धत कोणती?
१. मुलांना शिस्त लावायची म्हणजे मग त्यांना एखादी गोष्ट जोरात बोलून, ओरडून, चिडून समजावून सांगायची असं नाही. काही पालक मुलांशी रागात जोराने बोलतात, त्यांना मारतातही. पण यामुळे मुलंही चिडतात आणि कित्येकदा तर पालकांना उलट उत्तरंही देतात. त्यामुळे मुलांना शांतपणे बाेलून समजावून सांगा.
२. शिस्त लावायची म्हणजे मुलांसाठी एखादी गोष्ट पुर्णपणे बंद करून टाकायची असं करू नका. यामुळे त्यांच्या रागाचा उद्रेक होऊ शकतो किंवा ते आतल्या आत कुढत बसू शकतात. कोणतीही गोष्ट पुर्णपणे बंद करण्याऐवजी त्याची मर्यादा ठरवून द्या.
३. मुलं ऐकतच नाहीत हे पाहून काही पालक मुलांशी बोलणंच बंद करतात. यामुळे मुलांमधलं आणि पालकांमधलं अंतर वाढत जातं. त्याचा काहीच चांगला परिणाम होत नहाी. त्यामुळे मुलांना शिस्त लावायची असेल तर सगळ्यात आधी पालकांना संयमी राहता आलं पाहिजे. मुलांना एकदम शिस्त लागणारच नाही. त्यासाठी थोडा काळ नक्कीच जाऊ द्यावा लागेल.
