Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुलांना भीती न दाखवता कसं शिकवाल 'गुड टच - बॅड टच'? आईबाबा तुमची जबाबदारी - मुलांशी बोला मोकळेपणाने...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2026 14:21 IST

how to teach good touch bad touch to kids : how to explain good touch and bad touch to a child : गुड टच की बॅड टच? पालकांनी मुलांना कसं ओळखायला शिकवावं याच्या खास ८ टिप्स...

आजच्या काळात मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पालकांसाठी अत्यंत महत्वाचा झाला आहे, त्यामुळे पालकांनी त्यांना योग्य वयातच ‘गुड टच’ आणि ‘बॅड टच’ याबद्दल समजावून सांगणं अत्यंत आवश्यक ठरतं. ही गोष्ट केवळ माहिती देण्यापुरती नसून, मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणारी आणि त्यांना स्वतःचं संरक्षण कसं करायचं हे शिकवणारी आहे. आजच्या धावपळीच्या आणि असुरक्षित काळात, आपल्या मुलांच्या हातातील महागड्या गॅजेट्सपेक्षा त्यांना दिलेले 'सुरक्षेचे धडे' जास्त महत्त्वाचे आहेत(how to teach good touch bad touch to kids).

मुलं घराबाहेर पडली की पालकांच्या मनात एकच काळजी असते - 'माझं मूल सुरक्षित असेल का?' मुलांच्या सुरक्षिततेची ही जबाबदारी केवळ त्यांच्यावर लक्ष ठेवून संपत नाही, तर त्यांना स्वतःचं संरक्षण करायला शिकवण्यापासून सुरू होते. 'गुड टच आणि बॅड टच' (Good Touch & Bad Touch) यातील पुसटशी पण महत्त्वाची रेषा मुलांना कशी ओळखून द्यायची? पालक म्हणून या संवेदनशील विषयावर मुलांशी नेमका संवाद कसा साधावा, याबद्दलची विशेष माहिती पाहूयात. गुड टच आणि बॅड टच बद्दल मुलांना सांगताना त्यांच्या मनात भीती न घालता, त्यांचा स्वतःवरचा आणि तुमच्यावरचा विश्वास (child safety education good touch bad touch) कसा वाढेल, याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. योग्य शब्दांत, भीती न घालता आणि मुलांना समजेल अशा पद्धतीने हा विषय मांडला, तर मुलं कोणत्याही अयोग्य स्पर्शाबद्दल वेळेवर सांगू शकतात. पालकांनी मुलांना ‘गुड टच-बॅड टच’बद्दल कसं समजावून (how to explain good touch and bad touch to a child) सांगावं याबद्दल काही खास टिप्स पाहूयात. 

गुड टच आणि बॅड टच म्हणजे काय? (What is Good Touch and Bad Touch)

मुलांना यातील फरक सांगताना आपण त्यांना त्यांच्या भावना ओळखायला शिकवले पाहिजे. गुड टच म्हणजे असा स्पर्श ज्यामुळे मुलांना सुरक्षित, आनंदी आणि प्रेमाची जाणीव होते. असा स्पर्श मुलांना दिलासा देणारा आणि हवाहवासा वाटणारा असतो. जसे की, आई-बाबांनी प्रेमाने जवळ घेणे किंवा डोक्यावरून हात फिरवणे. आजी-आजोबांनी कौतुकाने दिलेली शाबासकी किंवा घेतलेला मुका. आई-वडिलांच्या उपस्थितीत डॉक्टरांनी आरोग्यासाठी शरीराला लावलेला हात. शिक्षकांची शाबासकी, पाठीवर कौतुकाची थाप मारणे. याउलट, बॅड टच म्हणजे असा स्पर्श ज्यामुळे मुलांच्या मनात भीती निर्माण होते, त्यांना अस्वस्थ वाटते किंवा राग येतो. असा स्पर्श ज्यामध्ये मुलांच्या 'प्रायव्हेट पार्ट्स'ला हात लावला जातो किंवा त्यांना कोणालाही न सांगण्यासाठी धमकावले जाते.

तुमच्या ९ सवयी ऑफिसमध्ये तुम्हाला करतात बदनाम! करिअर होण्यापूर्वीच संपेल-करा ‘हे’ बदल आजच...

मुलांना गुड टच आणि बॅड टच कसं शिकवाल? (How to Teach Good Touch & Bad Touch to Kids)

१. 'स्विमिंग सूट' नियम सांगा (The Swimming Suit Rule) :- मुलांना हा विषय समजावून सांगण्याचा हा सर्वात सोपा आणि परिणामकारक मार्ग आहे. मुलांना सांगा की, शरीराचे जे भाग आपण 'स्विमिंग सूट'ने (किंवा अंतर्वस्त्रांनी) झाकतो, त्या भागांना कोणालाही स्पर्श करण्याचा अधिकार नाही. जर कोणी तसा प्रयत्न केला, तर तो 'बॅड टच' आहे. हा नियम मुलांच्या पटकन लक्षात राहतो.

२. शरीराच्या अवयवांची योग्य नावे सांगा (Use Correct Names) :- अनेकदा पालक मुलांच्या खाजगी भागांना (Private Parts) काहीतरी टोपणनावं देतात. मात्र, तसं न करता त्यांना योग्य वैज्ञानिक नावे (उदा. ब्रेस्ट, पेनिस, व्हजायना) सांगा. टोपणनावांमुळे मुलं या विषयाचं गांभीर्य समजू शकत नाहीत. त्यांना स्पष्टपणे सांगा की, त्यांच्या या भागांना कोणीही स्पर्श करणे किंवा तिथे पाहणे चुकीचे आहे.

ब्रेसियरमध्ये एकापुढे एक तीनच हुक का असतात? महिलांना माहीतच नसते खरे कारण... 

३. 'रोल प्ले'च्या माध्यमातून समजावून सांगा (Teaching Through Role Play) :- मुलांसोबत छोट्या नाटिका किंवा 'रोल प्ले' करा. त्यांना वेगवेगळ्या परिस्थिती सांगा, जसे की—"जर कोणी अनोळखी व्यक्ती तुला चॉकलेट देऊन जवळ घेण्याचा प्रयत्न केला तर तू काय करशील?" मुलांकडून अशा वेळी "मोठ्याने ओरडणे", "तिथून पळून जाणे" आणि "आई-बाबांना सांगणे" अशा कृतींचा सराव करून घ्या. खेळता-खेळता मुलं स्वसंरक्षण अधिक चांगल्या प्रकारे शिकतात.

४. 'नाही' म्हणायला शिकवा (Teach Them to Say 'NO') :- मुलांना हे ठामपणे सांगा की, जर कोणी त्यांना चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला, तर त्यांनी घाबरण्याऐवजी मोठ्याने "नाही" म्हटले पाहिजे आणि तिथून लगेच दूर पळाले पाहिजे. स्वतःच्या सुरक्षिततेसाठी आवाज उठवणे किंवा विरोध करणे ही चुकीची गोष्ट नाही, हे त्यांना समजावून सांगणे आवश्यक आहे.

५. विश्वासू व्यक्तींची ओळख (Identify Trusted Adults) :- मुलांना त्यांच्या आयुष्यातील अशा काही व्यक्तींची ओळख करून द्या, ज्यांच्यावर ते डोळे झाकून विश्वास ठेवू शकतात. त्यांना सांगा की, जर कधीही काही चुकीचे घडले किंवा त्यांना अस्वस्थ वाटले, तर त्यांनी लगेच आई-वडील, शिक्षक किंवा इतर कोणत्याही विश्वासू व्यक्तीला सांगावे.

६. 'सीक्रेट्स' बद्दल सावध करा (Beware of Bad Secrets) :- मुलांना सांगा की, कोणीही दिलेला "सीक्रेट टच" किंवा अशी कोणतीही गोष्ट जी लपवून ठेवायला सांगितली जाते, ती चुकीची असू शकते. 'चांगले सीक्रेट' (जसे की कोणाला सरप्राइज गिफ्ट देणे) आणि 'वाईट सीक्रेट' (ज्यामुळे मनात भीती वाटते) यातील फरक त्यांना स्पष्ट करून सांगा.

७. शरीरावर आपला अधिकार (Body Ownership) :- मुलांच्या मनात हे ठामपणे बिंबवा की, त्यांचे शरीर हे फक्त त्यांचे स्वतःचे आहे. त्यांच्या परवानगीशिवाय कोणालाही त्यांना स्पर्श करण्याचा अधिकार नाही, मग ती व्यक्ती कितीही ओळखीची का असेना. यामुळे मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो.

८. नियमित संवाद साधा (Keep the Conversation Going) :- हा विषय एकदा सांगून संपणारा नाही. मुलांशी वेळोवेळी या विषयावर गप्पा मारत राहा. संवादाचे दरवाजे कायम उघडे ठेवल्यामुळे मुलांना तुमच्याशी मोकळेपणाने बोलायची सवय लागेल आणि कोणत्याही संकटाच्या वेळी ते घाबरणार नाहीत.

English
हिंदी सारांश
Web Title : Teach Kids About Good Touch, Bad Touch Without Fear

Web Summary : Parents must educate children about safe and unsafe touches early. Use the 'swimsuit rule,' teach body part names, role-play scenarios, and empower kids to say 'no' and identify trusted adults. Regular talks build confidence.
टॅग्स :पालकत्वलहान मुलं