Join us  

मुलांचं अक्षर चांगलं नाही, लिहिण्याचा कंटाळा-स्पीड नाही? अशावेळी करायचं काय..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2024 5:16 PM

पालकांना फार चिंता असते की मुलं लिहित नाही, अक्षर चांगलं काढत नाही, पण उपाय काय

ठळक मुद्देअक्षर चांगलं काढणं आणि वेग वाढवणं या दोन गोष्टी वेगळ्या दिसत असल्या तरी प्रत्यक्षात त्या तशा नाहीत

डॉ. श्रुती पानसेमुलांचं अक्षर अजिबात चांगलं नाही आणि लिहिण्याचा तर स्पीडच नाही अशी तक्रार अनेक पालक करतात. शाळेत त्यांना शिक्षकही ओरडतात, चांगलं अक्षर काढ, भरभर लिही. पण अनेक मुलांना ते जमत नाही. अक्षर चांगलं हवं यात शंका काहीच नाही. पण त्यासाठी करायचं काय?

 

(Image :google)

अक्षर चांगलं, लिहिणं भरपूर, आवश्यक काय?

१. अक्षर चांगलं असेल, सुटसुटीत असेल, स्वच्छ असेल तर जे पेपरमध्ये लिहिलं आहे ते नीट आणि पटपट वाचता येतं. पण प्रत्येकाचं अक्षर असं सुबक असेलच असं नाही.२. आधी आपलं अक्षर नेमकं कसं आहे हे तपासा. आपल्या मित्र मैत्रिणींचं बघा. कोणाचं अक्षर सुबक आणि सुटसुटीत आहे याचं निरीक्षण कर. जे अक्षर चांगलं असेल त्याच्या सारखं आपलं अक्षर आलं पाहिजे असं ठरवायचं. चांगल्या अक्षरांची वळणं कशी काढली आहेत ते बारकाईने बघायचं. अ कसा काढला आहे, क कसा काढला आहे, वेलांटी देण्याची पद्धत कशी आहे, इंग्लीश अक्षरं असतील तर त्यांची वळणं बघायला हवं.३. आपल्या अक्षरात नेमक्या काय चुका होत आहेत, हे तपासणं ही पहिली पायरी आहे.उदाहरणार्थ, अक्षर फार लहान – अगदी मुंगीएवढं आहे का, की फारच मोठं आहे?

(Image :google)

४. अक्षराला गोल वळणं आहेत का, की फराटे मारल्यासारखं अक्षर आहे?काही अक्षरं वळणदार तर काही अक्षरं टोकदार येतात का?५. अक्षरं एकावर एक चढतात का? जर असं होत असेल तर मुळीच वाचता येत नाही.६. या पैकी नक्की काय चुका होत आहेत, हे सहज बघितलं तरी समजेल. एकदा चूक लक्षात आली की ती सुधारणं सोपं असतं. म्हणून आपल्या अक्षरातली नक्की चूक सर्वात आधी समजली पाहिजे.७. खूप लहान अक्षर असेल तर ते थोडं मोठं काढायला पाहिजे, तसंच मोठं अक्षर असेल तर ते लहान किंवा प्रमाणात असलं पाहिजे. म्हणजे शिक्षकांना नीट वाचता येतं. वाचता आलं नाही तर आपलेच मार्क जातात. कारण आपण जे लिहिलं आहे ते परीक्षकांना नीट वाचता आलेलं नसतं. मग एवढा अभ्यास करायचा आणि वाईट, प्रमाणात नसलेल्या अक्षरापायी घालवायचा. हे कशासाठी करायचं? त्यापेक्षा अक्षर सुधारणं हे जास्त सोपं आहे.

८. सुरुवातीला सराव करताना आपल्याला जसं हवं तसं काढता येणार नाही. पुन्हा पुन्हा आधी सारखंच अक्षर निघेल. पण लक्षात ठेवून अक्षरांमध्ये बदल करत राहा. याच पद्धतीने आपल्या चुका सुधारत हवं तशा पद्धतीने अक्षर काढता यायला हवं. अशा पद्धतीने अक्षर काढलं की सहजपणे ते सुंदर दिसायला लागतं. आणि तसा सराव केला की वेगही वाढेल.९. अक्षर चांगलं काढणं आणि वेग वाढवणं या दोन गोष्टी वेगळ्या दिसत असल्या तरी प्रत्यक्षात त्या तशा नाहीत. सुंदर, सुबक, सुटसुटीत अक्षर काढत वेगाने लिहिता येतच. त्यासाठी फक्त एकच करायचं आहे ते म्हणजे लक्षात ठेवून काही दिवस चांगल्या अक्षरांचा सराव करायचा.  (संचालक, अक्रोड)shruti.akrodcourses@gmail.com

टॅग्स :शिक्षणलहान मुलंपरीक्षापालकत्वशाळा