Children Sleep Frequency: शरीर निरोगी ठेवण्यासाठी हेल्दी लाइफस्टाईल आणि आहार दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या असतात. त्यासोबत आणखी एक गोष्टी महत्वाची असते ती म्हणजे पुरेशी झोप. जर पुरेशी झोप घेत नसाल तर शारीरिक आणि मानसिक आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या होऊ शकतात. सगळ्याच वयाच्या लोकांसाठी झोप खूप महत्वाची आहे.
अनेक रिसर्चमधून समोर आलं आहे की, वयस्कांनी रोज रात्री ७ ते ८ तासांची झोप घेणं खूप महत्वाचं आहे. एक दिवसही जर झोप पूर्ण झाली नाही तर याचा नकारात्मक प्रभाव आरोग्यावर पडतो. वयस्कांसोबत लहान मुलांसाठी सुद्धा पुरेशी झोप गरजेची असते, कारण झोप त्यांच्या शारीरिक आणि मानसिक दोन्ही विकासात महत्वाची भूमिका बजावते. अशात कोणत्या वयाच्या लहान मुलांना किती झोप महत्वाची ठरते हे जाणून घेण महत्वाचं ठरतं.
हेल्थ एक्सपर्ट सांगतात की, पालकांनी या गोष्टीकडे लक्ष द्यावं की, त्यांच्या मुलांना पुरेशी झोप मिळत आहे की नाही. झोपेदरम्यान शरीर ग्रोथ हार्मोन्स रिलीज करतं, ज्याने हाडं, स्नायू आणि उंची वाढण्यास मदत मिळते. तसेच चांगली झोप झाल्यास मेंदूला दिवसभर शिकलेल्या गोष्टी समजण्यास आणि लक्षात ठेवण्यास मदत करते. काही रिसर्चमधून हेही सांगण्यात आलं आहे की, पुरेशी झोप घेणारी मुलं कमी चिडचिडे असतात आणि भावनांना चांगल्या प्रकारे हॅंडल करतात.
झोप पूर्ण न झाल्याचे दुष्परिणाम
ज्या लहान मुलांची झोप पूर्ण होत नाही, त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. जर झोप पूर्ण होत नसेल तर त्यांचा विकास देखील योग्यपणे होत नाही.
झोप जर पूर्ण होत नसेल तर भूक वाढवणारे हार्मोन्स सक्रिय होतात, ज्यामुळे लठ्ठपणा वाढतो. लठ्ठपणा वाढला की, डायबिटीस, हृदयरोग आणि सूज अशा समस्यांचा धोका असतो.
वयानुसार लहान मुलांसाठी किती तासांची झोप महत्वाची
0 ते 3 महिन्यांचं बाळ 14–17 तास
4 ते 11 महिन्यांचं बाळ 12–15 तास
1 ते 2 वर्षांची मुलं 11–14 तास
3 ते 5 वर्षांची मुलं 10–13 तास
6 ते 13 वर्षांची मुलं 9–11 तास
14 ते 17 वर्षांची मुलं 8–10 तास
कमी झोपेमुळे डायबिटीसचा धोका
अलिकडेच करण्यात आलेल्या एका रिसर्चमध्ये सांगण्यात आलं आहे की, ज्या लोकांची झोप पूर्ण होत नाही त्यांना डायबिटीस होण्याचा धोका अधिक असतो. जर्नल डायबिटीस केअरमध्ये प्रकाशित या रिपोर्टनुसार, झोप आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाची आहे. आठवडाभर विस्कळीत झालेल्या झोपेमुळे मध्यम वयाच्या आणि वृद्ध लोकांना टाइप 2 डायबिटीस होण्याचा धोका ३४ टक्क्यांनी वाढतो.