आजच्या काळात मोबाईल आपल्या प्रत्येकाच्याच जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. सध्याच्या या डिजिटल जगात मुल आणि मोबाईल यांचे नाते दिवसेंदिवस अधिक घट्ट होत चालले आहे. मुले आता आपल्या खेळण्यांपेक्षा किंवा मैदानी खेळांपेक्षा स्क्रीनच्या जगात जास्त वेळ घालवताना दिसतात. या परिस्थितीला बऱ्याच अंशी पालकांच्या सवयी देखील कारणीभूत असतात. फक्त पालकांचे सतत मोबाईलमध्ये व्यस्त राहणे मुलांच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम करू शकते. पण, जेव्हा एखादे लहान मूल आपल्या पालकांकडे प्रेमाने किंवा काहीतरी सांगण्याच्या आशेने पाहते आणि पालकांचे लक्ष मात्र मोबाईलच्या स्क्रीनमध्ये असते, तेव्हा त्या मुलाच्या मनावर काय परिणाम होत असेल, याचा आपण कधी विचार केला आहे का?(does parental mobile phone addiction increase anxiety in children).
अनेक संशोधनांतून असे समोर आले आहे की, 'पेरेंटल फोन स्नबिंग' (Parental Phubbing) अर्थात मुलांसमोर सतत मोबाईल वापरण्याच्या पालकांच्या सवयीमुळे मुलांमध्ये एन्झायटी (चिंता) आणि असुरक्षिततेची भावना झपाट्याने वाढत आहे. पालकांनी मुलांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून स्क्रीनला प्राधान्य दिल्यास मुलांच्या मनात 'मी महत्त्वाचा नाही का?' असा प्रश्न निर्माण होतो. हा भावनिक दुरावा मुलांच्या मानसिक विकासावर आणि वर्तणुकीवर गंभीर परिणाम करू शकतो. पालकांच्या सतत मोबाईल वापरामुळे मुलांच्या मनावर नेमके कोणते परिणाम होतात आणि हे 'डिजिटल अंतर' कमी करण्यासाठी आपण काय करू शकतो ते पाहूयात...
लहान मुलांपासून किशोरवयीन मुलांपर्यंत, मुलांमध्ये एंग्जायटी, असुरक्षिततेची भावना आणि तणाव वाढण्यामागे हे एक दुर्लक्षित पण प्रमुख कारण ठरू शकतं. Dr. Manisha Singhal, Consultant – Clinical Psychologist & Psychotherapist, यांच्याकडून जाणून घेऊया की, पालकांनी सतत मोबाईलमध्ये (parents excessive phone use and child anxiety) गुंतलेले राहण्याचा सवयीमुळे मुलांमध्ये एंग्जायटी नेमकी कशी वाढते.
पालकांचे सतत मोबाईलमध्ये व्यस्त असणे मुलांमध्ये एन्झायटी कशी वाढवते?
डॉ. मनीषा सिंघल यांच्या मते, मुलांच्या वाढीसाठी पालकांची उपस्थिती आणि त्यांचे लक्ष असणे अत्यंत आवश्यक असते. जेव्हा आई-वडील आपला जास्तीत जास्त वेळ मोबाईलवर घालवतात, तेव्हा मुलांना असे जाणवू लागते की त्यांच्याकडे भावनिक किंवा शारीरिकदृष्ट्या दुर्लक्ष केले जात आहे. लहान मुलांमध्ये ही भावना असुरक्षितता आणि चिंता निर्माण करू शकते. तर, मोठ्या मुलांमध्ये यामुळे एन्झायटी, एकाग्रतेचा अभाव आणि सामाजिक असुरक्षितता यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.
सध्या मोबाईल हे केवळ एक साधन उरलेले नसून, ते आता लक्ष विचलित करणारे एक मोठे माध्यम (Attention Distractor) बनले आहे. जेव्हा आई-वडील जेवताना, खेळताना किंवा मुलांच्या अभ्यासाच्या वेळीही फोनमध्ये व्यस्त असतात, तेव्हा मुलांना असे वाटू लागते की आपल्या पालकांच्या आयुष्यात आपले स्थान दुय्यम आहे किंवा आपल्याला कमी प्राधान्य दिले जात आहे. डॉ. मनीषा सिंघल सांगतात की, यामुळे मुलाला असा संदेश मिळण्यास सुरुवात होते की, "माझ्या पालकांसाठी माझे म्हणणे किंवा माझ्याकडे लक्ष देणे महत्त्वाचे नाही." हीच मानसिक स्थिती हळूहळू मुलाला एन्झायटी डिसऑर्डर (Anxiety Disorder) म्हणजेच गंभीर चिंतेच्या आजाराकडे ढकलू शकते.
आई - वडील मोबाईलमध्ये व्यस्त असताना मुलांवर होणारे परिणाम...
जेव्हा पालक स्क्रीनमध्ये इतके व्यस्त असतात की, ते मुलांच्या प्रश्नांकडे किंवा त्यांच्या भावनांकडे अजिबात लक्ष देत नाहीत, तेव्हा मुलांमध्ये अनेक मानसिक लक्षणे दिसू शकतात. डॉ. मनीषा सिंघल यांच्या मते, यामध्ये खालील गोष्टींचा समावेश असू शकतो -
१. सतत चिंता वाटणे :- मुले विनाकारण घाबरलेली किंवा काळजीत दिसतात.
२. एकटे राहायला आवडणे :- मुले इतरांमध्ये मिसळण्याऐवजी स्वतःमध्येच किंवा एकांतात राहणे पसंत करू लागतात.
३. झोपेच्या समस्या :- रात्री वेळेवर झोप न येणे किंवा झोपेतून वारंवार जाग येणे.
४. सोशल एन्झायटी :- सामाजिक भीती निर्माण होणे किंवा मित्र-मैत्रिणींशी संवाद साधताना संकोच वाटणे.
५. एकाग्रतेचा अभाव :- नवीन गोष्टी शिकण्यात आणि कोणत्याही कामावर लक्ष केंद्रित करण्यात अडचण येणे.
मुले अनेकदा त्यांच्या मनातील ही असुरक्षिततेची भावना आतल्या आत दाबून ठेवतात, ज्यामुळे हळूहळू त्यांच्या संपूर्ण मानसिक स्थितीवर नकारात्मक परिणाम होतो.
मुलांना प्रेमानं विचारा ६ प्रश्न, कळेल त्यांच्या मनात काय चाललंय-त्यांनाही वाटेल आईबाबांचा आदर...
मग यावर उपाय नेमका काय करायचा ?
मुलांमधील एन्झायटी कमी करण्यासाठी पालकांनी स्वतःच्या डिजिटल सवयींकडे किंवा मोबाईल वापराकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. डॉ. मनीषा सिंघल यावर खालील उपाय सुचवतात.
१. मोबाईल फ्री वेळ :- दिवसातील किमान १ ते २ तास मोबाईल पूर्णपणे बाजूला ठेवा आणि मुलांसोबत 'क्वालिटी टाईम' घालवा.
२. मुलांचे ऐकून घ्या :- मुलांचे बोलणे शांतपणे ऐका, त्यांच्या प्रश्नांना उत्तरे द्या आणि त्यांच्या भावनांना महत्त्व द्या.
३. नो फोन झोन :- जेवताना, अभ्यासाच्या वेळी आणि खेळताना मोबाईलचा वापर टाळा, किंवा शक्यतो मुलं समोर असताना हातात मोबाईलच घेऊ नका.
४. नियमित संवाद :- मुलांशी त्यांच्यासोबत दिवसभरातील घडलेल्या घटना आणि त्यांच्या भावनांविषयी नियमितपणे चर्चा करा.
पालकांचे सतत मोबाईलवर असणे ही केवळ त्यांची वैयक्तिक सवय नसून, ती मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी एक मोठा धोका बनू शकते. मुलांना सुरक्षित आणि प्रेमळ वातावरण देणे, त्यांच्या भावना समजून घेणे आणि त्यांच्यासोबत 'क्वालिटी टाईम' घालवणे अत्यंत आवश्यक आहे. शेवटी, मुलांसाठी मोबाईलवरील 'लाईक्स' पेक्षा तुमच्या डोळ्यांतील 'प्रेम' आणि 'लक्ष' जास्त महत्त्वाचे असते. डिजिटल युगात तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक असला, तरी तो आपल्या नात्यांच्या आड येणार नाही याची काळजी घेणे हीच आजच्या काळाची गरज आहे.
Web Summary : Parents' constant mobile use causes anxiety and insecurity in children. Prioritizing screens over kids creates emotional distance, affecting their mental health. Limit mobile use, listen actively, and prioritize quality time to bridge the digital gap.
Web Summary : माता-पिता द्वारा लगातार मोबाइल का उपयोग बच्चों में चिंता और असुरक्षा पैदा करता है। बच्चों के ऊपर स्क्रीन को प्राथमिकता देने से भावनात्मक दूरी बढ़ती है, जो उनके मानसिक स्वास्थ्य को प्रभावित करती है। डिजिटल विभाजन को पाटने के लिए मोबाइल का उपयोग सीमित करें, सक्रिय रूप से सुनें और गुणवत्ता समय को प्राथमिकता दें।