Join us

सतत खेळणाऱ्या मुलांना तुम्हीही रागावता? तज्ज्ञ सांगतात, मुलांना मुक्त खेळू देण्याचे फायदे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2022 17:29 IST

मुलांनी घराबाहेर खेळायला जाणं हा फक्त टाईमपास नाही, कारण त्यातून त्यांचा बराच विकास होत असतो हे पालकांनी लक्षात घ्यायला हवे.

ठळक मुद्देखेळणे हा केवळ टाइमपास नाही तर ती मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगली राहण्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट आहे. मुलं मैदानात गेली तर बऱ्याचशा समस्या आपोआप दूर होणार आहेत हे लक्षात घ्यायला हवे. 

मागील २ वर्षांपासून कोरोनामुळे बंद असलेले शाळा क्लास अचानक सुरू झाले आणि आरामाची किंवा ऑनलाईन अभ्यास करण्याची सवय लागलेल्या शालेय विद्यार्थ्यांचे रुटीन पुन्हा एकदा सुरू झाले. अनेकांना इतक्या मोठ्या गॅपनंतर पुन्हा शाळा, वेगवेगळ्या विषयांचे तास, गृहपाठ यां गोष्टींशी जुळवून घेणे अवघड जाऊ लागले. कधी नाही ते तासनतास घरात बसायची लागलेली सवय मोडताना मुलांना मानसिकरित्या हे सगळे अवघड गेले. आता सगळे पूर्वीप्रमाणे अनलॉक होत असताना मुलांना शाळेत जाणे कदाचित आवडू लागले असेल, पण आधीच्या रुटीनशी त्यांना जुळवून घेताना नक्कीच थोडा वेळ जावा लागेल. आता कुठे सगळे सुरळीत सुरू झाले आणि मुले पूर्वीप्रमाणे खेळण्यासाठी किंवा मित्रमंडळींसोबत वेळ घालवण्यासाठी घराबाहेर पडू लागली असतील तर त्यांना मनसोक्त खेळू द्यायला हवे. मुलांनी वाढीच्या वयात दिवसातील काही वेळ मैदानावर घालवायलाच हवा याबाबत प्रसिद्ध मेंदूअभअयास तज्ज्ञ डॉ. श्रुती पानसे यांनी महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत. 

(Image : Google)

त्या म्हणतात, मुलांना मैदानावर, मोकळ्या ठिकाणी खेळायला पाठवायलाच हवे. ते स्वत:हून मैदानावर खेळायला जात असतील आणि त्याठिकाणी रमत असतील तर त्यांना रागवू नका. लॉकडाऊनमध्ये एका जागेवर, एकाच परीघात असलेली मुले आता या सगळ्या वातावरणाला कंटाळलेली असू शकतात. यामध्ये शाळेत जाणारा सगळाच वयोगट येतो. या सगळ्या मुलांनी आता जास्तीत जास्त मोकळ्या ठिकाणी जाणे गरजेचे आहे. वेगवेगळ्या लोकांमध्ये त्यांनी वावरणे आता गरजेचे आहे. घराच्या जवळ असणारे एखादे ग्राऊंड जॉईन करुन द्या किंवा मुलांना जो खेळ खेळायला आवडतो त्यासाठी त्यांना मैदानात जाऊ द्या. गेले काही महिने वर्ष आपण सगळेच लॉकडाऊनमुळे लॉक झालेलो होतो. पण आता आपल्या डोक्यापासून ते पायापर्यंतच्या सगळ्या स्नायूंना मोकळेपणा मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे स्नायूंच्या हालचाली तर होतीलच पण शरीरातील ऊर्जा बाहेर पडण्यास मदत होईल. 

मेंदूची चांगली वाढ होणे अपेक्षित असेल तर त्यासाठी शरीराची हालचाल, स्नायूंचा व्यायाम, मेंदूला ऑक्सिजन मिळणे आवश्यक आहे. यामुळे मुले एकप्रकारे मोकळी होऊ शकतील आणि त्यानंतर त्यांना अभ्यास करावासा वाटणे, त्यामध्ये त्यांचे लक्ष लागणे, चांगली भूक लागणे, पुरेशी झोप होणे अशा सर्वच गोष्टी सुरळीत होतील. मुलांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगले राहायचे असेल तर त्यांनी मोकळेपणाने मैदानात दिवसातील काही तास आवर्जून घालवायला हवेत. पालकांनीही त्यासाठी त्यांना प्रोत्साहन द्यायला हवे. खेळणे हा केवळ टाइमपास नाही तर ती मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगली राहण्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट आहे. मुलं मैदानात गेली तर बऱ्याचशा समस्या आपोआप दूर होणार आहेत हे लक्षात घ्यायला हवे. 

 

टॅग्स :पालकत्वलहान मुलंमानसिक आरोग्य