Child Care Tips : घरात बाळाचा जन्म होणं ही सगळ्यांसाठीच आनंदाची बाब असते. बाळाला घेण्यासाठी आणि त्याचे लाड करण्यासाठी लाइन लागलेली असते. सगळेच बाळाची काळजी करू लागतात. इतकंच काय बाळाला दृष्ट लागू नये म्हणून बाळाच्या हातात, पायात आणि गळ्यात काळा धागा बांधला जातो. ही फार जुनी परंपरा आहे. पण ही परंपरा बाळाच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. अलिकडेच लहान मुलांचे डॉक्टर इमरान पटेल यांनी एका मुलाखतीत सांगितलं की, एका नवजात बाळाला काळा धागा बांधल्यामुळे गंभीर इन्फेक्शन झालं होतं.
पिंकव्हिला लाइफस्टाईलच्या मुलाखतीत डॉक्टर इमरान पटेल यांना विचारण्यात आलं की, लहान मुलांना काळा धागा बांधायला हवा का? यावर त्यांनी स्पष्टपणे अजिबात नाही असं उत्तर दिलं.
डॉ. पटेल पुढे म्हणाले की, 'जर लोकांनी माझं बोलणं ऐकलं तर मला वेड्यात काढलीत. पण माझ्याकडे एक अशी केस आली होती. काळा धागा बांधल्यामुळे बाळाला गंभीर इन्फेक्शन झालं होतं.
डॉक्टरांनी सांगितलं की, त्या केसमध्ये धाग्यामुळे बाळाची त्वचा कापली गेली होती आणि नंतर त्याला इन्फेक्शन झालं होतं. पालकांना त्या जखमेतून वास येऊ लागला होता. विश्वास ठेवा धाग्यामुळे बाळाच्या त्वचेवर जखम झाली होती.
डॉ. इमरान पटेल सांगतात की, बाळाला दृष्टी लागू नये म्हणून तुम्ही त्याना सॉफ्ट आणि सैल बांगड्या किंवा रिंग घालू शकता. तेही सैल असेल तरच घाला आणि दर आठवड्यातून ते बदला.
डॉक्टर असंही म्हणाले की, जर तुम्हाला बाळाला धागा बांधायचाच असेल तर त्यांच्या पायात बांधा. कंबर, हात आणि गळ्यात धागा बांधणं योग्य नाही. कारण लहान मुलं नेहमीच आपले हात तोंडात घालतात. ज्यामुळे इन्फेक्शनचा धोका वाढतो.
तसेच ते म्हणाले की, आंघोळ करताना या जागा चांगल्या साफ करणंही अवघड होतं. ज्यामुळे तिथे बॅक्टेरिया जमा होऊ शकतात. अशात बांधायचा असेलच तर पायात बांधू शकता. तसेच वेळोवेळी तो धागा बदलायला हवा.