मोबाईलमध्ये अडकलेली नवी पिढी हे विदारक चित्र आता घरोघरी दिसत आहे. अगदी १० ते १२ वर्षांच्या शाळकरी मुलांच्या हातातही सतत फोन दिसतो. एकतर यु ट्यूब किंवा इतर सोशल मीडिया साईट उघडून मुलं त्यावर काहीतरी बघत बसलेली असतात किंवा मग काही ना काही गेम खेळत असतात. हल्ली तर अशा प्रकारचे गेम आलेले आहेत की ते ऑनलाईन पद्धतीने खेळले जातात. ते गेम खेळताना आपल्यासोबत कोणीतरी अनोळखी व्यक्ती जोडली जाते. ती कधी आपली पार्टनर असते तर कधी आपल्या विरोधात ती खेळते. गेम खेळता खेळता त्यांच्यासोबत एकीकडे चॅटींगही सुरू असतं. ते चॅटींग कोणत्या भयानक टाेकाला जाऊ शकतं आणि ते कोणत्या प्रकरणात अडकले जाऊ शकतात, याची कल्पना मुलांनाही नसते. बऱ्याच पालकांना तर अशा पद्धतीने ऑनलाईन गेम खेळले जातात हे माहितीही नसते. त्यामुळे मुलांच्या विश्वात काय होतंय हे त्यांना समजतच नाही. ( October - Cyber Security Awareness Month.)
अक्षयकुमारच्या घरातही असाच एक किस्सा झाला. त्याची मुलगी काही महिन्यांपुर्वी ऑनलाईन गेम खेळत होती. गेम खेळता खेळता समोरच्या व्यक्तीशी तिचं चॅटींग सुरू होतं. खेळाच्या बाबतीत होणाऱ्या गप्पा हळूहळू थोड्या पुढे सरकल्या आणि वैयक्तिक पातळीवर आल्या. तु कुठे राहतेस असं समोरून विचारलं गेलं. नंतर तु स्त्री आहेस की पुरुष याविषयीची विचारणा झाली. त्यानंतर मग हळून तुझा न्यूड फोटो सेंड कर म्हणून तिला समोरून सांगण्यात आलं. ते पाहून ती सावध झाली आणि तिने तो गेम खेळणं झटकन बंद केलं. ही बाब लगेच तिच्या आईला जाऊन सांगितली. त्यामुळे ती वेळीच या प्रकरणापासून दूर झाली.
पण तिच्या वयाच्या बऱ्याच मुलांमध्ये ही समज नसते. तुमच्याही मुलांसोबत हे किस्से घडू शकतात. वेगवेगळ्या गोष्टींची प्रलोभनं त्यांना दाखवली जातात. त्यात ते अडकतात. हे प्रकरण त्यांना कोणत्या भयानक ठिकाणी घेऊन जाऊ शकतं याची त्यांना कल्पनाही नसते. यानंतर मग मुलांना ब्लॅकमेल करणं, त्यांच्याकडून पैसे मागणं, आणखी वेगवेगळ्या गोष्टींची त्यांच्याकडून मागणी करणं असं काय काय या प्रकारांमध्ये होऊ शकतं. त्यामुळे पालकांनी स्वत: ही बाब समजून घ्यावी आणि मुलांनाही वेळीच त्याबाबतीत सावध करावं. सध्याच्या सायबर जगात मुलांना सुरक्षित ठेवायचं असेल तर अशा काही गोष्टी त्यांना समजावून सांगणं खूप गरजेचं आहे.