अक्षयकुमार (Akshay Kumar) आणि ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) हे बॉलीवूडचं एक लाडकं जोडपं. अक्षय चित्रपटांमध्ये पुढे पुढे जात आहे तर ट्विंकलने तिचे वेगळे मार्ग निवडले आहेत. वाचन, गार्डनिंग, लेखन हे तिचे छंद ती पुरेपूर पुर्ण करते. एवढंच नाही तर तिने नुकतीच लंडन येथून डाॅक्टरेटही मिळवली आहे. आपापल्या कार्यात दोघांनाही स्वत:ला एवढं अडकवून घेतलं आहे की बॉलीवूडच्या पार्ट्या, गॉसिप्स या सगळ्यांपासून ते कोसो दूर आहेत. चमकोगिरी, भपकेबाजी दोघांच्याही स्वभावात नाही. त्यांची मुलंही बॉलीवूडच्या चमचमत्या दुनियेपासून दूर आहेत. आज इतर स्टारकिड्स प्रचंड फेममध्ये असताना अक्षय आणि ट्विंकलचे मुलं मात्र या झगमगाटापासून दूर आहेत. अक्षयचा मुलगा आरव याच्या साधेपणाविषयी तर कित्येक गोष्टी नेहमीच ऐकायला येतात..
क्रिकेटर शिखर धवन याच्या एका टॉक शोमध्ये पॅरेटिंग विषयी प्रश्न विचारला असता अक्षय कुमारने सांगितलं होतं की त्याचा मुलगा आरव याला घरातूनच अभिनयाचं बाळकडू मिळालेलं आहे. पण तरीही अभिनय क्षेत्रात येण्याचा त्याचा कोणताही मानस नाही. त्याने त्याची वेगळी वाट निवडलेली असून त्याला फॅशन डिझायनिंगमध्ये आवड आहे. आणि त्याच विषयातलं उच्च शिक्षण घेण्यासाठी तो लंडनला असतो. अक्षय आणि ट्विंकल या दाम्पत्याकडे प्रचंड पैसा आहे. त्यामुळे त्यांच्या मुलाला लंडन येथेही अतिशय अलिशान आयुष्य जगता आलं असतं. पण त्या दोघांनीही मुलांना लहानपणापासूनच पैशांचा योग्य वापर, स्वावलंबन अशा शिस्तीत ठेवलेलं आहे. त्यामुळेच तर इतर सर्वसामान्य भारतीय मुलं लंडनमध्ये जाऊन ज्याप्रकारे राहतात आणि त्यांचं शिक्षण पुर्ण करतात अगदी तसंच आरवही राहातो.
लंडन येथे स्ट्रीट शॉपिंग करून कपडे खरेदी करताे, त्याचप्रमाणे स्वत:चे कपडे धुणं, भांडी धुणं अशी कामंही स्वत:च करतो.. आरवच्या या साधेपणामागे त्याच्या आई- वडिलांची शिस्त असली तरी त्याचा मुळातच स्वभाव खूप साधा, शांत अणि विचारी आहे. झगमगत्या ग्लॅमरस जगापेक्षा तो त्याच्या साध्या आयुष्यातच जास्त रमतो, असं अक्षयने त्या मुलाखतीत सांगितलं होतं. सध्या अर्ध्या हळकुंडात पिवळं होण्याचा जमाना असूनही अक्षयचा लेक एवढा वेगळा, साधा आहे, हे खरोखरच नवल..