Join us

आई-बाबांनी आपल्या लेकीला सांगायलाच हव्यात ५ गोष्टी; यशस्वी होईल-आत्मविश्वास वाढेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 09:55 IST

5 Things Parents Must Tell Daughter : मुलीला हे शिकवा की तिचं मत, तिचे विचार खूप महत्त्वाचे आहेत.

प्रत्येक घरातील मुली या आपल्या आई-वडीलांच्या काळजाचा तुकडा असतात. मुली जसजशा मोठ्या होत जातात तसतसं त्यांच्या आयुष्यात बदल होतात. हसत खेळत राहणाऱ्या मुली उदास राहू लागतात. आयुष्यात इतके बदल होतात की मुलींचा आत्मविश्वास कमी होऊ लागतो त्यांना डिमोटिव्हेट झाल्यासारखं वाटू लागतं आणि मन नाराज राहतं. (5 Things Parents Must Tell Daughter To Boost Her Confidence)

अशा स्थितीत पालकांनी लहान वयातच मुलांना काही गोष्टी शिकवल्या तर मुलींमध्ये आत्मविश्वास वाढेल मुली सशक्त आणि मजबूत होतील. रिद्धी देवरीया ज्या पेरेंटीग कोच आहे त्यांनी इंस्टाग्रामवर काही पेरेंटीग टिप्स शेअर केल्या आहेत. रिद्धी यांनी ५ गोष्टींबाबत उल्लेख केला आहे. जे पालकांनी आपल्या मुलीला सांगितलेच पाहिजे.

१) तुझ्या मताला महत्त्व आहे

मुलीला हे शिकवा की तिचं मत, तिचे विचार खूप महत्त्वाचे आहेत. तिला हे सांगा की तिने स्वतःसाठी आणि इतरांसाठीही बोललं पाहिजे. तिला आपलं म्हणणं ठामपणे मांडायला शिकवा. तिचे विचार फक्त तिच्यासाठीच नाही, तर तिच्या आजूबाजूच्या लोकांसाठीही महत्त्वाचे आहेत, हे तिला पटवून द्या.

२) ‘नाही’ म्हणायला शिकवा

आपल्या मुलीला 'नाही' म्हणण्याचं महत्त्व सांगा. तिला हे समजवा की तिचा आनंद सर्वात महत्त्वाचा आहे. जर एखादी गोष्ट तिला आवडत नसेल किंवा ती तिच्या आनंदासाठी योग्य नसेल, तर तिने त्या गोष्टीसाठी 'नाही' म्हणायला हवं. दुसऱ्यांना खुश करण्यासाठी प्रत्येक वेळी 'हो' म्हणण्याची गरज नाही.

३) चांगली वागणूक असणे म्हणजे कमकुवत असणं नाही

अनेकदा लोकांच्या चांगुलपणाला त्यांची कमजोरी समजलं जातं. तुमच्या मुलीला हे समजावून सांगा की दयाळू असणं ही तिची ताकद आहे, कमजोरी नाही. तिला दयाळूपणासोबतच कणखर राहायला शिकवा. दुसऱ्यांचा आदर करत स्वतःच्या मर्यादा कशा ठरवायच्या, हे तिला शिकवणं खूप गरजेचं आहे.

४) चुकांमुळे तुमची ओळख ठरत नाही

तुमच्या मुलीला हे शिकवा की तिच्या चुकांमुळे तिची ओळख ठरत नाही. चूक होणं ही एक सामान्य गोष्ट आहे आणि ते ठीक आहे. पण त्या चुकीबद्दल सतत पश्चात्ताप करत बसणं योग्य नाही. झालेल्या चुकांमधून शिकून पुढे जाणं महत्त्वाचं आहे, हे तिला सांगा.

५) तू जशी आहेस, तशीच परफेक्ट आहेस

तुमच्या मुलीला सांगा की ती जशी आहे, तशीच ती पूर्ण आणि परिपूर्ण आहे. तिचं दिसणं, तिला मिळालेले मार्क किंवा तिने मिळवलेली यशं यामुळे ती पूर्ण होत नाही. ती मुळातच परिपूर्ण आहे आणि हे तिने कायम लक्षात ठेवलं पाहिजे. तिला स्वतःच्या अस्तित्वावर प्रेम करायला शिकवा.

टॅग्स :पालकत्वलहान मुलं