Join us

लहान मुलं दिसेल ती वस्तू तोंडात घालतात-चाटतात,असे का? डॉक्टर सांगतात ४ कारणं....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2023 18:31 IST

4 Mouthing Reasons In Children : वस्तू किंवा हात तोंडात घालण्यामागे नेमकी काय कारणं असतात याविषयी बालरोगतज्ज्ञ डॉ. पार्थ सोनी सांगतात..

घरात लहान मूल असेल तर आपल्याला सतत सावध राहावं लागतं. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे लहान बाळं रांगताना, अगदी चालायला लागल्यावरही हाताला लागेल ती प्रत्येक गोष्ट तोंडात घालतात. यामध्ये अनेकदा कागद, प्लास्टीक, कपडे अशा कोणत्याही गोष्टींचा समावेश असतो. इतकेच नाही तर मुलं कचरा, चपला किंवा स्टीलच्या टोचतील अशा वस्तू असे काहीच तोंडात घालायचे सोडत नाहीत. या वस्तू लहान आकाराच्या असतील तर त्या थेट घशात अडकण्याचे किंवा पोटात जाण्याची भिती असते. त्यामुळे लहान मुलांवर अतिशय बारकाईने लक्ष ठेवावे लागते (4 Mouthing Reasons In Children). 

मुलांनी खालचे काहीही उचलून तोंडात घातल्याने त्यांना सतत वेगवेगळ्या प्रकारची इन्फेक्शन्स होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे पालकांना मुलं काही तोंडात घालतात या गोष्टीची काळजी वाटते. पण मुलांनी असे काहीबाही तोंडात घालणे अजिबात गैर नाही. तर मुलांनी काही तोंडात घालणे ही त्यांच्या विकासातील एक महत्त्वाची पायरी आहे. त्यामुळे उलट मुलं तोंडात काही घालत नसतील तर खरा प्रश्न आहे. त्यामुळे मुलांना तोंडात काही घालण्यापासून रोखू नका. साधारणपणे ४ महिन्यापासून ही फेज सुरू होते. मात्र वस्तू किंवा हात तोंडात घालण्यामागे नेमकी काय कारणं असतात याविषयी बालरोगतज्ज्ञ डॉ. पार्थ सोनी यांनी ४ महत्त्वाची कारणं नुकतीच शेअर केली आहेत. ते नेमकं काय सांगतात पाहूया...

(Image : Google)

१. चांगलं फिल होतं

मुलांना काहीही तोंडात घातलं की अतिशय चांगलं वाटतं. काही तोंडात घातलं की मुलांच्या मेंदूत एन्डोर्फिनसारखे आनंदी हॉर्मोन्स तयार होतात. त्यामुळे मुलांचा ताण कमी व्हायला मदत होते. 

२. नवीन जग एक्सप्लोअर करणे 

आपल्या आजुबाजूला असणारं नवीन जग एक्सप्लोअर करायचं असल्याने मुलं अशाप्रकारे कोणतीही वस्तू तोंडात घालून पाहतात. मुलं जेव्हा काही तोंडात घालतात तेव्हा ओठ आणि तोंड यांच्या मदतीने ते त्याचा फिल घेतात. 

३. दात येत असतील तर 

मुलं जेव्हा तोंडात काहीतरी घालतात तेव्हा त्यांना कदाचित दात येत असतात. त्यामुळे त्यांच्या हिरड्या शिवशिवतात आणि त्यांना सतत काहीतरी चावावंसं वाटतं.

४. अँटीबॉडीज तयार होतात

मुलं जेव्हा तोंडात काहीतरी घालतात तेव्हा त्यांच्या शरीरात विषाणू जातात आणि त्याच्या पोटात विविध प्रकारच्या अँटीबॉडीज त्यांच्या शरीरात तयार होतात. यामुळे मुलांची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते आणि मुलं जास्त स्ट्राँग होत जातात.  

टॅग्स :पालकत्वलहान मुलंआरोग्य