Blue Mind Therapy : कितीतरी सिनेमांमध्ये आपण बघतो की, त्यातील कॅरेक्टर जर मानसिक तणावात असेल तर ते एखाद्या डोंगरावर जाऊन विचार करत बसतात किंवा समुद्र किनारी खवळत्या लाटांमध्ये शांतता शोधण्याचा प्रयत्न करताना दिसतात. कारण काय तर समुद्र हा केवळ निसर्गाचा एक सुंदर नजारा नाही तर मनाला शांत करणारा अनुभवही देतो. बरेच लोक समुद्र किनारी जाऊन शांतपणे बसतात. मनाला मोकळी वाट करून देतात. याला विज्ञानाच्या भाषेत Blue Mind Therapy असं म्हणतात. म्हणजे जेव्हा आपण पाण्याच्या जवळ असतो जसे समुद्र, नदी, तलाव किंवा फक्त पावसाच्या सरी तेव्हा मेंदू आपोआप रिलॅक्स मोडमध्ये जातो. आपणही अनेकदा हे अनुभवलं असेल पण त्याचा कधी खोलवर विचार केला नसेल.
संधी मिळाली तर पाण्याचा प्रवाह शांतपणे पाहा, त्याचा आवाज ऐका. हलक्या पावसात फेरफटका मारणे किंवा खिडकीतून पावसाच्या थेंबांकडे पाहणे हे छोटे क्षणही मनाला रीसेट करतात. बाहेर जाणे शक्य नसेल तर घरात छोटा फाउंटन किंवा एक्वेरियम ठेवले तरी तसाच शांततेचा अनुभव मिळू शकतो.
ब्लू माइंड म्हणजे मेंदूची अशी अवस्था जिथे शांतता आणि लक्ष केंद्रीत करण्याची क्षमता वाढते. या अवस्थेत मेंदूमध्ये रिलॅक्सेशनशी संबंधित Alpha Waves सक्रिय होतात आणि सेराटोनिन व डोपामाइन सारखे ‘फील-गुड’ केमिकल्स वाढतात. त्यामुळे पाण्याजवळ राहण्याचा अनुभव हा नैसर्गिक ध्यानासारखा परिणाम देऊ शकतो.
रेड माइंड
ब्लू माइंडच्या उलट अवस्था म्हणजे रेड माइंड, ज्यामध्ये ताण, घाई आणि जास्त विचार करणं वाढतं. सतत स्क्रीन, आवाज आणि धावपळ यामुळे मेंदू या मोडमध्ये राहतो. परिणामी चिडचिड, थकवा आणि लक्ष कमी होणे अशा गोष्टी जाणवतात.
म्हणजेच ‘ब्लू माइंड’ आपल्याला तणावपूर्ण ‘रेड माइंड’मधून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवतो. जेव्हा मेंदू ब्लू मोडमध्ये जातो तेव्हा केवळ मूडच नव्हे तर शरीरातही बदल होतात. हृदयाची धडधड सामान्य राहते, ब्लड प्रेशर संतुलित राहतं, झोप अधिक गाढ लागते आणि विचार अधिक स्पष्ट होतात. कारण पाण्याजवळ असताना माणूस वर्तमान क्षण अनुभवायला शिकतो.
हे विशेष महत्त्वाचे आहे कारण भारतात तरुणांमध्ये ताणतणावाचं प्रमाण वयोवृद्धांच्या तुलनेत जवळपास तीन पट जास्त असल्याचं आढळतं. विज्ञानानुसार मेंदूचे पूर्ण विकास साधारण ३० वर्षांपर्यंत सुरू राहू शकते. त्यामुळे या काळात शांतता आणि चांगले अनुभव मेंदूला अधिक मजबूत बनवू शकतात. म्हणून वेळ मिळाला तर समुद्रकिनारी जा. आणि जर समुद्र जवळ नसेल, तर लाटांचा आवाज तरी ऐका. कारण कधी कधी सर्वात मोठी थेरपी म्हणजे फक्त एक लाट असते.
ब्लू माइंड थेरपीचे फायदे
मानसिक शांतता आणि तणाव कमी होणे
समुद्र, तलाव किंवा नदीकडे पाहताना मेंदू 'हायपर-अलर्ट' अवस्थेतून शांत अवस्थेत जातो. याला Soft Fascination म्हणतात, जे मानसिक थकवा कमी करते आणि कोर्टिसोल चे प्रमाण कमी करण्यास मदत करते.
सर्जनशीलता वाढते
सतत स्क्रीन आणि आवाजामुळे विचार करण्याची क्षमता कमी होऊ शकते. पाण्याजवळ गेल्यावर मेंदू डिफॉल्ट मोट नेटवर्कमध्ये सक्रिय होतो, ज्यामुळे नवीन कल्पना आणि सर्जनशीलता वाढते.
चांगली झोप आणि शारीरिक आरोग्य
लाटांचा आवाज हा एक प्रकारचा व्हाईट नॉइस तयार करतो, जो मन शांत करून गाढ झोप येण्यास मदत करतो. तसेच पाण्याजवळील हवेत असलेले Negative Ions ऑक्सीजन शोषण्याची क्षमता वाढवून मूड सुधारण्यास मदत करतात.
माइंडफुलनेस वाढते
पाण्याची हालचाल आणि त्याचा आवाज आपल्याला वर्तमान क्षणात राहायला मदत करतो. त्यामुळे अतिरिक्त प्रयत्न न करता नैसर्गिक पद्धतीने मेडिटेशनसारखी अवस्था निर्माण होते.
