Join us  

Selfie day 2021 : आपलं जगणं बसल्या जागी ‘हॅपनिंग’ करणारं व्यसन!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2021 11:53 AM

Selfie day 2021: भारतीय नागरिक दिवसाला सरासरी ७ तास स्मार्ट फोन वापरतात. वापर ७५ टक्के वाढला आहे तर ८४ टक्के लोक म्हणतात की, झोपेतून उठल्यावर पहिली १५ मिनिटं आम्ही मोबाइलच पाहतो. हे स्क्रीनचं व्यसन आपल्याला कुठं नेणार?

आपल्या घरातल्या लोकांना आपण उठता बसता गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड नाईट वगैरे म्हणतो का?पण सोशल मीडीयात सतत गुडमॉर्निंग, गुडनाईटवाले फॉरवर्ड्स लोक एकमेकांना पाठवतात, कारण ते आयते मिळतात, आले की ढकल पुढे. एरवी कधीही सेलिब्रेट न केलेल्या सणांचे, दिवसांचे देखील शुभेच्छा मेसेज वाट्टेल तसे फॉरवर्ड होतात. त्यात फॉरवर्ड्समध्ये आलेली सर्व माहिती आपण खरी मानायला लागतो. त्यातल्या तमाम थिअरीजवर विश्वास ठेवू लागतो आणि त्यात कमालीचे गुरफटत जातो, हे ही अनेकदा लक्षातही येत नाही.

इंटरनेट, सोशल मीडिया, ओटीटी प्लॅटफॉर्म्स. खऱ्या खोट्या, अर्थसत्य, अर्धवट, आपल्या कोणत्याही विचारांना सोयीस्कर अशा माहितीचं इतकं प्रचंड मोठं जाळं आपल्याभोवती आहे की सतत नवीन काहीतरी त्यात बघायला, वाचायला मिळेल असं आपल्याला वाटतं. जगातली सोशल मीडियावर फिरणारी सगळी माहिती जणू आपल्याला शोषून घ्यायची आहे. दणादण व्हाट्स ॲप स्टेट्स अपलोड करायचे आहेत. फिरायला जाण्यापेक्षा वेगवगळ्या ठिकाणी जाऊन स्वतःचेच आणि आपल्या ग्रुप्सचे फॅशनेबल फोटोज काढून घ्यायचे आहेत. सेल्फीच्या आपण इतके आहारी गेलो आहोत की जीवाची पर्वा देखील न करता वेगवेगळ्या जीवघेण्या स्पॉट्सवर ऍडव्हेंचर करत आपल्याला सेल्फी काढत सुटायचे आहेत! रेसिपी खाण्यासाठी करायच्या आहेत की फोटो काढून फ्लॉण्ट करण्यासाठी याचा विचार करण्याइतकीफुरसतही उरलेली नाही असं चित्र आहे.

सकाळी उठल्यावर आधी आपल्या मोबाईलमध्ये डोकावणं ही आपली सवय झालेली आहे. जणू जगातले सगळ्यांत महत्वाचे असे मेसेजेस आपल्यालाच दररोज येत असतात. ते वाचले नाहीत, पाहिले नाहीत, त्यांना रिस्पॉन्स दिला नाही, तर फार मोठ्ठं आकाश कोसळणार आहे. बसल्या बसल्या काहीही न करता आपलं जगणं हॅपनिंग आहे असा फील जो तो स्वत:ला देत सुटला आहे.

कोरोना काळात तर लॉकडाऊनशिवाय आपण जगणंच जणू विसरलो.

शाळा, कॉलेज ऑनलाइन, वर्क फ्रॉम होमही आलंच. पण खरा विचार केला तर अशी किती काळ असते ऑनलाइन शिक्षणाची वेळ. तो वेळ सोडून घरोघर हीच ओरड आहे की, पोरं फोनच्या बाहेर यायलाच तयार नाहीत. रिकाम्या हातांना काही काम नाही ही हतबलता मान्य करता एका लिमीटपर्यंत हे सर्व गरजेचं आणि ठीकच आहे असंही म्हणावं लागतंच. पण दिवसातला किती वेळ आपण इलेक्ट्रॉनिक स्क्रीन्सला चिकटलो आहोत, ह्याचं भान खूपच आवश्यक आहे.

प्रत्येकाला वाटत असतं की मी तर फक्त गरजेपुरतंच नेट-फोन- सोशल मीडिया वापरतो. माहिती मिळवत आहोत, कामासाठी वापरत आहोत, पण ते खरंच तसं आहे का, हा प्रश्न स्वतःला प्रत्येकानं विचारायला हवा. बसल्याजागी सतत नेट सर्फ करत बसणं, सोशल मीडियावर, कॉल्सवर तासंतास वेळ घालवणं हे आपल्या हाताच्या स्नायूंना, शरीराच्या पोश्चरला, मेंदूला, मनाला, डोळ्यांना आणि कानालाही अपायकारक ठरू शकतं, ह्याचं भान आपण बाळगतो का, हे ही विचारूच घेऊ स्वतःला!

या व्यसनाचं काय?

अनियंत्रित दारू पिणं, सिगरेटचं व्यसन असणं, ही व्यसनं सहज कळून येतात. त्याबद्दल आपल्या आजूबाजूचे चार लोक जागरूक असतात. त्यांच्या आहारी आपण जाऊ नाही, म्हणून खबरदारी घेत असतात. पण, स्मार्ट फोनचं, स्क्रीन्सचं देखील कमालीचं व्यसन आपल्याला लागत चाललेलं आहे, ह्याचं भान मात्र आपल्याला राहत नाही. ह्यात गंमत अशी आहे की त्याची जाणीव करून देऊ शकणारे बहुतांश लोक देखील त्याच सर्व स्क्रीन्सच्या जाळ्यात अडकले आहेत. कोणी कोणाला सांगायचं, हाच मुळात प्रश्न आहे!

प्राची पाठक

( प्राची मानसशास्त्रासह पर्यावरण आणि सूक्ष्मजीवशास्त्राची अभ्यासक आहे.)prachi333@hotmail.com

टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्यसेल्फीमानसिक आरोग्य