>>ज्योत्स्ना गाडगीळ पंचमुखी
९ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन(Raksha Bandhan 2025) आहे, त्यादिवशी प्रत्येक बहीण आपल्या भावाला ओवाळते. मग तो सख्खा असो नाहीतर नात्यातला किंवा मानलेला! पण आजतागायत नात्यातला हा ओलावा शाबूत आहे. मात्र येणारा काळ अर्थात Gen Z ची मुले पाहिली की भविष्यात रक्षाबंधन हा सण साजरा केला जाईल का? याची अनिश्चितता वाटते. ही अनामिक भीती म्हणता येईल, पण त्यामागे कारणेही तशीच आहेत.
काही दिवसांपूर्वी बस प्रवासात हे छोटेसे बहीण भाऊ पुढच्या सीटवर बसलेले. बराच वेळ मोबाईल गेम खेळणं सुरू होतं. खाणं-पिणं झालं, तसे दोघेही सुस्तावले. वाऱ्याची झुळूक येताच चिमणीने दादाच्या मांडीवर डोकं टेकवलं आणि दादाही मान मागे टाकून झोपी गेला. त्यावेळी तिला थोपटणारा त्याचा हात आणि कुशीत शिरलेली चिमणी हे चित्र अतिशय विलोभनीय होतं. म्हणून न राहवून फोटो काढला!
भावंडांची जोडी पाहून खरं तर बरं वाटलं! आज अनेक घरात एकुलती एक मुलं आहेत. त्यांना सर्व सुखसोयी देण्याचा पालकांचा प्रयत्न आहे, पण भावंडांच्या रूपाने असणारा हक्काचा वाटाड्या न मिळाल्याने ती एकलकोंडी होत आहेत, याचं वाईट वाटतं. मोठेपणी जिवलग मित्र-मैत्रिणी भेटतीलही, मात्र बालपणी भावंडांबरोबर केलेली मस्ती, खोड्या, भांडणं, पराक्रम, कुरघोडी, टोपण नावं ठेवणं, टर उडवणं, पालकांशी खोटं बोलून भावंडांची वकिली करणं, प्रसंगी पाठीशी उभं राहणं, कान धरणं, मार्गदर्शन करणं या भावंडांच्या प्रेमापासून, सुखापासून मुलं वंचित राहत आहेत.
बालपणीच्या आठवणी या आयुष्यभराचा अनमोल ठेवा असतात. आजही आपण आपल्या पालकांना आत्या, मावशी, काका, मामा यांच्याकडे ओढीने जाताना पाहतो, आपणही जातो. मात्र, पुढच्या पिढीला नात्यातल्या भावंडांबद्दल तेवढी आपुलकी वाटेल का?
अलीकडचे पालक मुलांच्या बाबतीत एकच किंवा नकोच यावर शिक्कामोर्तब होत आहे. वाढती महागाई, आरोग्याच्या तक्रारी, लग्नाचं वाढतं वय, विभक्त कुटुंब, नियमांचं काटेकोर पालन करत जगणाऱ्या पापभिरू मध्यम वर्गीयांसाठी दुसऱ्या पाल्याचा विचार अवघड, याची कल्पना आहे. तरीही या सगळ्या निर्णयप्रक्रियेत एकट्या मुलांच्या भावविश्वाचा, मानसिक कुचंबणेचा, आधाराचा विचार कोणी करत असेल का, हा प्रश्न कधी कधी उगीचच अस्वस्थ करतो...!