lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Mental Health > टेनीस सुपरस्टार नाओमी ओसाका म्हणाली; माझं मन आजारी, नाही खेळणार! मनाच्या आजाराची धाडसी गोष्ट

टेनीस सुपरस्टार नाओमी ओसाका म्हणाली; माझं मन आजारी, नाही खेळणार! मनाच्या आजाराची धाडसी गोष्ट

naomi osaka: आधी दीपिका पडूकोण , आता नाओमी ओसाका, यशाच्या शिखरावर ज्यांचं करिअर त्यांनी जगजाहीर सांगितलं की, आमच्या मनाला बरं नाही? खोट्या प्रतिष्ठेपोटी मनाचे आजार न लपवता त्या बोलल्या, त्यांना जे जमलं ते आपल्याला का जमू नये?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2021 02:09 PM2021-06-08T14:09:26+5:302021-07-12T18:02:13+5:30

naomi osaka: आधी दीपिका पडूकोण , आता नाओमी ओसाका, यशाच्या शिखरावर ज्यांचं करिअर त्यांनी जगजाहीर सांगितलं की, आमच्या मनाला बरं नाही? खोट्या प्रतिष्ठेपोटी मनाचे आजार न लपवता त्या बोलल्या, त्यांना जे जमलं ते आपल्याला का जमू नये?

naomi osaka mental health risk, tennis play and depression and deepika padukone, prioritizing mental health and wellness | टेनीस सुपरस्टार नाओमी ओसाका म्हणाली; माझं मन आजारी, नाही खेळणार! मनाच्या आजाराची धाडसी गोष्ट

टेनीस सुपरस्टार नाओमी ओसाका म्हणाली; माझं मन आजारी, नाही खेळणार! मनाच्या आजाराची धाडसी गोष्ट

Highlightsआहे मन आजारी; त्यात चूक काय?

प्राची पाठक

नाओमी ओसाका. अवघी बावीस-तेवीस वर्षांची टेनिसपटू. (naomi osaka) चारवेळा ग्रँड स्लॅम पदक जिंकलेली मुलगी. यशाच्या शिखरावर असलेलं करिअर. त्यासोबत येणारी प्रसिद्धी, पैसा. ती जिंकत जाणाऱ्या मॅचेस. जगभरातून होणारं कौतुक. असं सगळं असूनही अलीकडेच तिने जगप्रसिद्ध अशा फ्रेंच ओपन स्पर्धेतून माघार जाहीर केली. खेळसंपल्यानंतर ज्या प्रेस कॉन्फरन्सेस करायच्या असतात, त्यालाही तिने नकार दिला. त्यासाठी हजारो डॉलर दंड भरला. का तर तिचं म्हणणं आहे, ती मनाने हे सगळं करण्यासाठी तयार नाही. ती डिप्रेशनमध्ये आहे आणि तिला सध्या तरी खेळापेक्षा इतर गोष्टींवर जो फोकस असतो, त्यात पडणं शक्य नाही. यावर जगभर चर्चा झाली. तिच्यावर भरपूर टीकाही झाली. अनेकांनी कौतुकही केलं. तर काहींनी तिने जिंकलेल्या गेम्समध्ये सुद्धा तिची खूप खिल्ली उडवली.

 


तरीही नाओमीनं (naomi osaka) तेच केलं जे तिला योग्य वाटलं. खरंतर यशाच्या शिखरावर असताना जगजाहीर आपल्या मनाच्या आरोग्याशी संबंधित गोष्टी जाहीर करून, काही गोष्टींसाठी दंड भरून नकार द्यायचा, हे काही सोपं काम नाही.

खेळांच्या क्षेत्रात मैदानातच किंवा इतरत्रदेखील शरीराला काही इजा झाली, तर अगदी मैदानातच धावत येणारे स्पोर्ट फिजिओथेरपिस्ट आपण बघत असतो. ते तत्काळ काही गोष्टी करून खेळाडूला बरं वाटेल आणि तो खेळायला पुन्हा उभा होईल, यात तरबेज असतात. इजा गंभीर असेल, तर इतरही अनेक सुविधा खेळाडूंना तत्काळ पुरवल्या जातात. त्याबद्दल जाहीर लिहून आलं, तरी कोणी त्या माणसाच्या अस्तित्वावर प्रश्न निर्माण करत नाहीत की त्याच्या गुणांवर शंका घेत नाहीत. शरीराला इजा होऊ शकते, हे आपण स्वीकारलं आहे.
पण हेच मनाच्या बाबत घडलं तर?तर मात्र गजहब होतो. मनाचा आजार, म्हणजे मनस्थिती बरी नाही म्हणजे असं म्हणून चर्चा सुरू होतात. सामान्य माणसं, बायका तर अशावेळी नाओमीसारखी जागतिक दर्जावर स्वतःला सिद्ध केलेली खेळाडू काही स्टॅन्ड घेत असेल, तर जगभर टीकेचा, चर्चेचा विषय होतोच.

 

"मला आता या क्षणी अतिशय लो वाटत आहे, मी जगाला फेस करू शकत नाही,
मला माझा वेळ हवाय"
"गेले काही महिने मी औदासिन्याशी लढत आहे, मला त्यातून बाहेर पडता आलेलं नाहीये अजून", हे यशाच्या शिखरावर करिअर असताना जगभर जाहीर करणं अजिबात सोपं नाही.
मागे अभिनेत्री दीपिका पदुकोणने सुद्धा भारतात अगदी करिअरच्या सर्वोच्च फेजमध्ये आपण डिप्रेशनमध्ये आहोत, हे जाहीर केलं होतं. आपलं करिअर त्यामुळे संपुष्टात येईल का, आपली खिल्ली उडवली जाईल का, आपल्याला पुढे कामं मिळतील का, आपण स्पर्धेत टिकून राहू शकू का? असे प्रश्न तिलाही पडले असणारच. तरीही जेव्हा कोणी अशा उंचीवरून मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी आपली माघार नोंदवतो, तेव्हा अशा लोकांना कोणाची सहानुभूती नको असते. त्यांनी त्यांचे मनाचे बिनसणे, त्याचे आजारी असणे पूर्ण मान्य केलेले असते. आपण जेव्हा एखादी गोष्ट किमान मान्य करतो, तेव्हाच तर तिच्यावर उपाय शोधायचे मार्ग खुले होतात. या सगळ्या टप्प्यातून ते गेलेले असतात. स्व-संवादाचा मार्गदेखील त्यांनी त्यांच्यापुरता अतिशय बळकट केलेला असतो. स्वसंवाद ही सुद्धा एक उत्तम थेरपी असते आणि मानसिक आरोग्यासाठी ती वापरता येते.

 

काय काय शिकू शकतो आपण नाओमीच्या (naomi osaka) धाडसातून?

१. मनाच्या आरोग्याशी लढणाऱ्या कोणाचीही "आता कशी संधी मिळाली", म्हणत किमान खिल्ली तरी उडवू नका, हे समाज म्हणून आपल्याला शिकायचं आहे.
२. मानसिक आरोग्याबद्दल टर उडवणं खूप सोपं असतं. मानसिक आरोग्याशी लढा देणारी माणसं ज्या फेजमधून जात असतात, त्यावेळी ते या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करत मनाची उभारी घ्यायला शिकतदेखील असतात. पण, एक समाज म्हणून आणि त्याहीपेक्षा एक माणूस म्हणून आपण किती संवेदनशील आहोत, हा आपल्याला उघडं टाकणारा प्रश्न असतो.

 

३. आपणही कधीतरी अगदी जवळच्या लोकांना दूर ठेवून एकट्यानेच ह्या समस्यांना सामोरे गेलेलो असतो. एकटेच मनातच रडलेलो असतो. त्याबद्दलदेखील आपण या प्रसिद्ध मंडळींकडून उभारी घेऊ शकतो की मी एकटा / एकटी नाही.
४. मनाचं बिनसणं हे माझ्या हातात असेलच असं नाही. समजा काही त्रास झालाच, तर तो मी आधी स्वतः मान्य करणार. त्यावर बोलणार. त्यात लपवून ठेवण्यासारखं काहीच नाही. लोक काय म्हणतील, हा आपला प्रश्न नसून लोकांची पातळी ते स्वतःच दाखवून देत असतात, असा प्रश्न आहे, हे स्वतःला पक्कं सांगायचं.
५. एका अर्थी तुम्ही आजारी मनाशी जुळवून घेत असताना, उपचार करत असतानादेखील मनाने अतिशय खंबीर असता हे लक्षात घ्यायचं. म्हणूनच तर तुम्ही मनाची दुखणी खुपणी लपवून न ठेवता त्याबद्दल जाहीर व्यक्त होऊ शकत आहात. हे मनात कोणतीही शंका न घेता पक्कं करून टाकायचं.
आणि बायकांनी तर नक्कीच, त्यांच्या मनाची दुखणी त्यांनी स्वत:च नाओमीसारखी गांभीर्याने घ्यायला हवीत, बोला-उपचार घ्या, लपवू नकाच.

(लेखिका मानसशास्त्राच्या अभ्यासक आहेत.)
prachi333@hotmail.com

Web Title: naomi osaka mental health risk, tennis play and depression and deepika padukone, prioritizing mental health and wellness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.