lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Mental Health > झाडं आणि मानसिक आरोग्य यांचा काय संबंध? घरात झाडं लावून तर पहा, स्ट्रेस पळेल..

झाडं आणि मानसिक आरोग्य यांचा काय संबंध? घरात झाडं लावून तर पहा, स्ट्रेस पळेल..

मानसिक आरोग्याचा संबंध आपल्याला चांगलं वाटण्याशी असतो. घरातल्या झाडांवर निरपेक्ष प्रेम करण्यातली आणि देण्यातली सकारात्मक उर्जा आपल्याच जगण्याची गुणवत्ता वाढवणार असेल तर आपल्या सोबतीला घरात झाडं हवीच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 02:42 PM2021-06-05T14:42:49+5:302021-06-05T15:02:08+5:30

मानसिक आरोग्याचा संबंध आपल्याला चांगलं वाटण्याशी असतो. घरातल्या झाडांवर निरपेक्ष प्रेम करण्यातली आणि देण्यातली सकारात्मक उर्जा आपल्याच जगण्याची गुणवत्ता वाढवणार असेल तर आपल्या सोबतीला घरात झाडं हवीच!

Mental health will improve, so plant trees at home! Stress will be reduced and ... | झाडं आणि मानसिक आरोग्य यांचा काय संबंध? घरात झाडं लावून तर पहा, स्ट्रेस पळेल..

झाडं आणि मानसिक आरोग्य यांचा काय संबंध? घरात झाडं लावून तर पहा, स्ट्रेस पळेल..

Highlights मनातले विचार आणि भावना शांत करण्यात झाडांचा हिरवा रंग आणि त्यांच्या पानांची हालचाल खूप उपयोगी आहे.घरातली हवा शूद्ध करणं आणि हवेतली ऑक्सिजनची पातळी वाढवणं हे झाडांचं काम आहे, हे आपण सगळे जाणतोच. पण झाडं आणि फुलं मनावरचा ताण घालवायला आणि रात्रीची झोप शांत लागण्यासाठी मदत करणारी असतात.आपल्या मनाला कोणतीही भौतिक गोष्ट आनंद देऊ शकत नाही. ही ताकद फक्त निसर्गात आहे. म्हणूनच घरात झाडं हवीत.

 - डॉ. अंजली औटी

दिवसभरात अनेकवेळा आपण सगळेच वेगवेगळ्या मानसिक आणि भावनिक स्थित्यंतरातून जात असतो. दिवसाच्या सुरूवातीला जाणवत असलेला मानसिक उत्साह आणि उर्जेची पातळी दिवसाच्या शेवटी तशीच टिकून असेल,असं क्वचित होतं. दिवसभरात घडणाऱ्या प्रसंगांचा, व्यक्तींचा आणि त्यांच्या वागण्या-बोलण्याचा, प्रतिक्रि यांचा आपल्यावर परिणाम होत असतो. असं होतं कारण आपले विचार, भावना आणि वागणं या एकमेकांवर अवलंबून असलेल्या गोष्टी आहेत.
अचानक चिडणं,लहानशा कारणावरून टोकाचा राग येणं, पटकन मूड जाणं, कमालीचं अस्वस्थ वाटणं, डोकं , डोळे,मान दुखणं, मनावर आणि शरीरावर सतत कसला तरी ताण, ओझं आहे असं वाटणं यासारख्या वरवर किरकोळ वाटणाऱ्या तक्रारींनी आज लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकजण त्रस्त आहेत. तशी शारीरिक स्वस्थतेसाठी नियमित व्यायाम आणि योग्य आहार याबद्दलची जागरूकता अलिकडे अनेक लोकांमध्ये येत आहे. नैसर्गिक गोष्टींच्या वापराला उत्तेजन मिळत आहे. पर्यावरणपूरक गोष्टीच्या वापराबद्दल अनेक लोक आग्रही झाले आहेत. मात्र मानसिक आरोग्याचासुद्धा वेगळा विचार करायचा असतो, हे काही अजूनही अनेकांच्या लक्षात येत नाही.
चांगलं आयुष्य जगण्याचा रस्ता चांगल्या मानसिकतेनच शक्य आहे. पण त्यासाठी थोडे प्रयत्न हवेत आणि थोडा वेळही. मनाला अस्वस्थ करणारी आणि ती अस्वस्थता टिकवून ठेवणारी कोणतीही गोष्ट दुर्लक्ष करण्यासारखी नाही. विचार आणि भावनांचे नियमन करता येईल असे काही साधे आणि सहज शक्य उपाय केले तर वेळीच मानसिक आरोग्य सावरता आणि सुधारता येतं. यासाठी घरातली छोटी छोटी झाडं मोठी मदत करतात.
झाडं आणि मानसिक आरोग्य यांचा काय संबंध? असा प्रश्न अनेकांना पडेल. पण शास्त्र आणि आमच्या क्षेत्रातले अनुभव मात्र झाडं आणि मानसिकतेच्या घनिष्ठ संबंधावर भर देतात.


 

एकटेपणाचे सोबती


मूलबाळ नसलेल्या आणि आपल्या वयाची पन्नाशी पार केलेल्या एका जोडप्याचं उदाहरण मूद्दाम सांगते. आता या वयानंतर आपल्या आयुष्यात आणखी काही करण्यासारखं राहिलं नाही,आणि काही करायचं तर कोणासाठी? हा प्रश्न त्यांना पडला होता. अनेकांनी त्यांना अनेक सल्ले दिले. पण त्यांना आता नवीन जबाबदारी नको होती. एखादा प्राणी पाळावा तर हे दोघे राहात होते पाचव्या मजल्यावर. पण अस्वस्थता तर इतकी की त्यांनी मानसोपचाराची मदत घेतली आणि त्यांच्या या समस्येवर एक सुंदर पर्याय समोर आला. घरात वेगवेगळी झाडं लावण्याचा. किती आणि कोणती झाडं लावावीत आणि त्यांचा मानसिक आरोग्यावर काय परिणाम होतो याची शास्त्रीय माहिती त्यांनी घेतली. त्यांना सोबत हवी होती आणि विरंगुळाही. कमीतकमी देखभालीत जास्तीतजास्त जगणारी झाडं त्यांनी निवडली आणि घरात वेगवेगळ्या ठिकाणी ठेवली. या एका जाणीवपूर्वक केलेल्या कृतीनं त्यांना खूप मदत झाली. मूख्य म्हणजे आता त्यांना आहे ते आयुष्य जसंच्या तसं स्वीकारता आलं आणि पूर्वी छळणारा एकटेपणाही खूप प्रमाणात कमी झाला. त्यांच्या सोशल सर्कलमध्ये बोलण्यासाठी विषय मिळाला आणि आता दोघंही खुश आहेत.
हा फक्त या जोडप्याचा अनुभव नाही. घरातल्या झाडांचा मानसिक आरोग्यावर होणाऱ्या चांगल्या परिणामांचे दाखले जगभरातून मिळता आहेत. मी स्वत: माझ्या घरात अनेक छोटी रोपं आणली आहेत. या छोट्या छोट्या रोपांपासून मिळणारी सकारात्मक उर्जा मी रोज अनुभवते आहे. मी केवळ माझ्याकडे येणाऱ्या रूग्णांनाच नाही तर माझ्या वर्तुळातल्या अनेकांना घरात काही झाडं लावण्यासाठी मुद्दाम सूचवलंही.


 
हिरव्या पानांची जादू


आकाशाच्या निळाईशी जसे आपण लगेच जोडले जातो तसंच आपण झाडांच्या हिरव्या रंगाशीही जोडले जातो. हे रंग आवडतात कारण ते मनाला शांतता देणारे रंग आहेत. मनातले विचार आणि भावना शांत करण्यात झाडांचा हिरवा रंग आणि त्यांच्या पानांची हालचाल खूप उपयोगी आहे. तुम्ही घरात असा किंवा ऑफिसमध्ये खिडकीतून दिसणारा छोटासा आभाळाचा तुकडा किंवा एखाद्या झाडाचा हिरवा रंग,हलणारी पानं बघून तुम्हालाही हा अनूभव नक्कीच येईल. हिरव्या रंगात भावनांचं नियमन करण्याची नैसर्गिक शक्ती आहे. ऑफिसमध्ये असलेली इन्डोअर झाडं त्या ऑफिसमधील लोकांच्या कामाची गुणवत्ता वाढवू शकतात. हॉस्पिटल्समध्ये असलेली झाडं पेशण्टला लवकर बरं होण्यासाठी मदत करतात. म्हणून आपल्या घरात जर आपण काही झाडं जाणीवपूर्वक लावली आणि वाढवली तर त्यांचा आपल्या मानसिक आरोग्यासाठी नक्कीच सकारात्मक फायदा होऊ शकतो. केवळ सजावटीसाठी आणि दिखाऊपणासाठी घर किंवा ऑफिसमध्ये झाडं लावणारी मंडळी आहेत,पण या कारणांसाठी जरी लावली गेली तरीही त्याचा मानसिक आरोग्यावर अपेक्षित फायदा झालेला दिसून येतोच.
घरातली हवा शुद्ध करणं आणि हवेतली ऑक्सिजनची पातळी वाढवणं हे झाडांचं काम आहे, हे आपण सगळे जाणतोच. पण काही झाडं आणि फुलं मनावरचा ताण घालवायला आणि रात्रीची झोप शांत लागण्यासाठी मदत करणारी असतात. काही झाडं मनावरचा,डोळ्यांवरचा ताण,थकवा दूर करतात. मन शिथिल झालं की आपोआपच शरीराचे,चेहऱ्याचे ताणले गेलेले स्नायूही सैलावतात. मेंदूतील स्त्राव,हार्मोन्स स्थिरावतात. रक्तदाब आटोक्यात राहतो. मूड चांगला होतो. आपण कितीही थकून घरी आलो आणि दार उघडल्या उघडल्या लक्षात आलं की आपण लावलेल्या झाडाला आज एक नवीन कोवळं पान आलंय,तर आलेला थकवा कुठल्याकुठे पळून जातो. अगदीच काही नाही तर निदान घरातली झाडं बघून मनावरचा दिवसभराचा ताण निघून जायला मदत होते, चीडचीड कमी होते. पाळीव प्राण्यांचा जसा लळा लागतो तसाच या झाडांचाही.


 

थोडं द्या आणि भरपूर मिळवा


 घरातल्या झाडांना काही फार देखभाल लागते असंही नाही, हवेशीर जागा,थोडा सूर्यप्रकाश, काहींना नूसता भरपूर उजेड, काहींना तर खूप कमी उजेडदेखील पूरतो. फक्त काही मिनिटं रोज आपण त्यांना दिली तर आपल्याला देण्यासाठी त्यांच्याकडे खूप काही असतं.

घरात झाडं असावीत पण किती असाही प्रश्न पडतो.


तर आपल्या नजरेच्या टप्प्यातल्या दिशेला एक किंवा दोन झाडं असावीत. हळूहळू त्यांच्या जागा आणि त्या जागेवर त्यांना ठेवण्याचे फायदे आपल्या लक्षात येत जातात. त्यांच्याकडे लक्ष देण्यातून आपला तो वेळ आपण मातीशी, निसर्गाशी जोडले जाऊन सत्कारणी लावतो. त्यांना पाणी घालण्याच्या साध्या कृतीतून देखील मनावरचा ताण विरघळतो. देखभाल करण्यातून मिळणारं मानसिक समाधानसुद्धा खूप काही देऊन जातं.
मानसिक आरोग्याचा संबंध आपल्याला चांगलं वाटण्याशी असतो. या चांगलं वाटण्यात जे जे घटक मदत करतात त्यांचा मानसिक आरोग्य सुधारण्यात सहभाग असतो. मानसिक आरोग्य चांगलं असणारी व्यक्तीच आपल्या संपूर्ण क्षमता वापरून आपलं आणि इतरांचं आयुष्य सुखी करण्याचा प्रयत्न करू शकते.
घरातल्या झाडांवर निरपेक्ष प्रेम करण्यातली आणि देण्यातली सकारात्मक उर्जा आपल्याच जगण्याची गुणवत्ता वाढवणार असेल तर आपल्या सोबतीला घरात झाडं हवीच!
( लेखिका समुपदेशक आहेत)
mindmatteraa@gmail.com




हिरव्या-निळ्या आणि काळ्या रंगाची ताकद
आपल्या मनाला कोणतीही भौतिक गोष्ट आनंद देऊ शकत नाही. ही ताकद फक्त निसर्गात आहे. निसर्गातला मातीचा काळा-तांबडा-तपकिरी रंग, आकाशाचा निळा रंग आणि गवताचा, झाडांचा हिरवा रंग या तीनच गोष्टी माणसाच्या मनाला आनंदी करू शकतात.
आपलं शरीर म्हणजे विविध अवयवांनी, हाडा मासांनी, आताड्या-पेशींनी बनलेला एक ऑकेस्ट्रा आहे. या ऑकेस्ट्रातून आनंदी सूर तेव्हाच मिळेल जेव्हा आपलं मन आनंदी असेल. आणि हा आनंद फक्त निसर्ग देऊ शकतो. पण निसर्ग म्हणजे फक्त घराबाहेरचं जग नाही. तर हा निसर्ग घरातही निर्माण होऊ शकतो. किंबहुना या निसर्गाची आवश्यकता आपण घरात असतांनाही असतेच. आपल्याला घरात राहाताना श्वास घेण्यासाठी शूध्द ताजी हवा हवी असते. डोळ्यांना सुंदर दृश्य बघावंसं वाटतं. मग त्याची सोय घरात झाडं लावून करता येते. फक्त तुम्ही कधी आदिवासींच्या जगण्याचं बारकाईनं निरिक्षण केलं आहे का? नसेल तर एकदा कराच. आणि बघा ही लोकं किती आनंदी असतात. त्यांच्या छोट्याशा घरात खूप काही नसतं पण चेहेऱ्यावर समाधान दिसतं. असं का? कारण ही लोकं झाडा वेलींच्या सान्निध्यात जगतात. आपल्याभोवती चहूबाजूंनी झाडं हे सुख शहरात राहणाऱ्यांना नसलं तरी किमान ते सूख आपण आपल्या घरात निर्माण करू शकतो. झाडांच्या पानाचा स्पर्श, झाडांचा, फुलांचा रंग हा मनमूराद अनुभवू शकतो. हे रंग आणि स्पर्श माणसाच्या मनाला आनंदाची आणि समाधानाची अनुभूती देऊ शकतात.
-डॉ. हरिश शेट्टी
( प्रसिध्द मानसोपचारतज्ज्ञ)

झाडं मुलांना शिकवतात...

  •  लहान मुलाांनादेखील घरातल्या झाडांमुळे सुरक्षित आणि शांत वाटतं. त्यांच्या मनावरचा ताण हलका होऊन अभ्यासात एकाग्रतेसाठी झाडांची मदत होते, असाही अनुभव एका केसच्या निमित्तानं आला. मुलांना आपल्या भावनांचं नियमन करणं सोपं होतं.
  •  घरातल्या सदस्यांमध्ये सह-संवेदना वाढायला मदत होते. आपण केलेल्या मस्तीमुळे झाडाचं एखादं पान तूटलं किंवा त्याला इजा झाली तर मुलांना न रागावता आपली चूक समजते. मूलांमध्ये (एम्पथी)सह-अनुभूतीची भावना वाढते.
  •  मुलांची भावनिक बुद्धिमत्ता वाढण्यासाठी घरातली आणि अंगणातली झाडं, प्राणी, पक्षी,निसर्ग आणि परिसर यांचा मोठा वाटा असतो.
  • सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या आजूबाजूला असलेल्या वेगळेपणाचा स्वीकार करायला हवा आणि भिन्नतेचा आदर करायला हवा हे मूल्य मूलांना आपोआप शिकता येतं. एकेकटे असणाऱ्या मुलांना इतरांशी जुळवून घेणं जमतं. ही मूल्यं मोठ्यानांही शिकायला मिळतात.

झाडांचं औषध
इंग्लडमधील मँचेस्टरमधले एक डॉक्टर. त्यांच्याकडे मानसिक आजारांनी ग्रस्त रूग्ण येतात. हल्ली ते आपल्या रूग्णाच्या समस्या ऐकल्यानंतर त्यांना प्रिस्क्रिप्शन लिहून देतात. पण ते औषधांचं नसतं तर ते असतं झाडाचं. हे डॉक्टर त्या त्या आजाराप्रमाणे रूग्णाला झाडाचं नाव लिहून देतात. ते झाड रूग्णाला आणून घरी लावायला लावतात. त्याची काळजी घ्यायला लावतात. काही काळानं रूग्णाला ते झाडं तिथल्या मेडिकल ऑफिसमध्ये जमा करावं लागतं. पुढे हे झाड सार्वजनिक बागेसाठी रवाना केलं जातं.
डॉक्टरांच्या या प्रयोगाची चर्चा सर्वत्र होत आहे.
मात्र ही प्लाण्ट प्रिस्क्रिप्शनची योजना हल्म शहरातल्या ‘कॉर्न बूक मेडिकल प्रॅक्टिस’ या संस्थेनं सुरू केली. या कॉर्नबूक संस्थेचे सचिव ऑगस्टा वॉर्ड म्हणतात की, ‘एखादी गोष्ट आपल्याला वाढवायची आहे, त्याची काळजी घ्यायची आहे ही गोष्ट खूप फायदा देणारी ठरते. विशेषत: अशा लोकांसाठी ज्यांच्या आजूबाजूला बागा नसतात. झाडं नसतात.’
कॉर्नबूक संस्थेच्या या योजनेची अंमलबजावणी करायला काही डॉक्टरांनी सुरूवात केली आहे. मानसिक आजारावर हे डॉक्टर प्लाण्ट प्रिस्क्रिप्शन लिहून देत आहे.
आपल्याकडे अजून झाडांच औषध प्रत्यक्ष कागदावर लिहून द्यायला सुरूवात झाली नसली तरी मानसशास्त्रज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ रूग्णांना त्यांची मानसिकता सुधारण्यासाठी, आनंद मिळवण्यासाठी घरात झाड लावण्याचा उपाय सूचवत आहे.
 

Web Title: Mental health will improve, so plant trees at home! Stress will be reduced and ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.