Join us

दिल्यानं वाढतं, अशा आनंदाचं लुटू वाण! यंदा अशी गोष्ट द्या, जी पुरेल आयुष्यभर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2025 16:21 IST

संक्रांत आणि संक्रमणाच्या या काळात आपणही आनंदानं एकमेकींना देऊ निरोगी आणि सुखकर जगण्याचं वाण!

ठळक मुद्देरोज थोडे थोडे काम करत राहिल्याने आपण बरेच काही साध्य करू शकतो, सातत्य ठेवायचं.

- अश्विनी बर्वे (मुक्त पत्रकार)आपल्याला सण-उत्सव मनापासून आवडतात, त्यातून निर्माण होणारा उत्साह, आनंद आपल्याला कितीतरी दिवस पुरतो. संक्रात आली की, आपल्यात एक प्रकारचा उत्साह संचारतो. बाजारही रंगीबेरंगी वस्तूंनी भरून जातो. त्या सगळ्या वस्तू हजारोंच्या संख्येने बाजारात बघायलाही मस्त वाटते. दरवर्षी नवीन वस्तू येतात आणि दरवर्षी आपण काहीतरी युनिक/विशेष/कोणीही कधीही बघितले नाही, दिले नाही अशी वस्तू शोधत असतो ती ही लुटण्यासाठी!

एकमेकांना काहीतरी द्यायला आपल्याला आवडते हे चांगल्या मनाचे लक्षण आहे. ‘दिल्याने वाढते’ असे आपण म्हणतोच. पण बाजारातल्या या वस्तू एवढ्या लहान लहान असतात की, त्यांचे घरी आल्यावर काय करावं, हाच प्रश्न पडतो. कारण आपण ज्या मैत्रिणींना आपल्या घरी हळदी-कुंकवाला बोलावणार असतो त्या स्त्रियाही कमी-अधिक प्रमाणात चांगल्या आर्थिक स्थितीतल्या असतात. आपल्या घरी जे जे आहे ते ते त्यांच्या घरी असणार, नसेल तर त्यांना त्याची गरज नसेल किंवा त्यांचे अग्रक्रम वेगळे असतील.

मग आपण दिलेल्या वस्तूंचे त्या काय करतील?हळूहळू त्या वस्तू मुलांच्या खेळण्यात येतात. कधी-कधी कुंडीत शोभेसाठी ठेवल्या जातात. एखादं भांडं असेल तर त्यात झाडं लावली जातात किंवा कुणाला तरी देऊन टाकल्या जातात. बऱ्याचवेळा या सर्व वस्तू प्लास्टिकच्या असतात, स्टीलच्या असल्या तरी त्यांची गुणवत्ता चांगली नसल्याने घरात रोज कोणी वापरू शकत नाही. म्हणजे या सगळ्या गोष्टींचा कचरा होतो किंवा पुरेसा वापर होत नाही. आपण पैसा खर्च करतो पण उपयोग फारसा नसतो.

घरी हळदी-कुंकू करताना आपण आपल्या मैत्रिणींना घरी बोलावतो. त्यासाठी आपल्याला हजारो प्रकारची छोटी-मोठी कामं करावी लागतात. घर आवरणे, काही पदार्थ करणे, स्त्रियांसाठी काहीतरी खायला करणे, डेकोरेशन करणे यात आपण दमून जातो आणि रात्री सगळं काही दुखायला लागतं. मग आपल्याला कोणीतरी घरातलं म्हणतं, ‘एवढं दमत असशील तर कशाला करायचं?’ यातून आपला राग वाढत जातो आणि वाटतं आपली कदरच नाही घरातल्यांना.प्रत्येक घरात असे होत असेल, असे नाही. पण आनंदानं हे सारं करावंसं वाटतं कारण मैत्रिणींबरोबर गप्पा मारायच्या असतात. त्यांना भेटायचं असतं. छान नटायचं असतं. खरंतर संक्रात म्हणजे संक्रमणाचा काळ, बदल घडण्याचा काळ. आपण आपल्यासह आपल्या मैत्रिणींसाठीही अजून काहीतरी छान करू. त्यातून आनंद वाढेल. आनंदाचे वाण लुटता येईल असं काही केलं तर?

म्हणजे फार मोठं काही करायचं असं नाही तर...१. आपल्या रोजच्या आयुष्यात थोडेसे बदल करायचे ज्याचा परिणाम आयुष्यभर आपल्यासोबत राहील असे काही. हे सण साजरे करण्यामागे आपला हेतू काय आहे तर आनंद घेणे आणि देणे. पण तो आनंद घेण्यासाठी आपले शरीर, मन निरोगी असणे गरजेचे आहे. म्हणून रोज व्यायाम करायला सुरुवात केली पाहिजे. मैत्रिणीबरोबर चालायला (फिरायला नाही) जाऊन बघा, आपला आनंद असा लुटून बघायला पाहिजे.२. ज्या प्रकारचा व्यायाम आवडत असेल तो करून बघायला पाहिजे, नाही जमला तर दुसरं काही करण्याचा प्रयत्न करता येतो. काहीजणी कथ्थक शिकतात, काही चित्रं काढून बघतात, नवीन भाषा शिकतात. असेही काही शिकायला पाहिजे जे आपलं राहून गेलं आहे. अनेकींनी एकत्र येऊन केलं तर आनंदही वाढेल.३. आपण कशाप्रकारचे अन्न खातो हे स्वतः बघायला पाहिजे. कितीतरी वेळा घरात शिळे उरलेले पदार्थ बायका स्वत: खातात आणि त्यांचं आरोग्य बिघडतं. आपण निरोगी राहण्याचं वाण स्वत:च स्वत:ला दिलं तर किती छान.

४. आपल्याला सर्वांनाच आनंदी व्हायचं असतं. आनंद आपल्याला भरभरून हवा असतो. पण त्यासाठी नक्की काय करावं लागतं? हे मात्र माहीत नाही. अचानक एखादी गोष्ट घडल्याने, मिळाल्याने आपण आनंदी होतो. पण मग तीच गोष्ट का? याचा मात्र विचार करत नाही. आनंदाकडे असेच लाइटली बघत असतो. आजच्या भाषेत त्याला हलक्यात घेतो. आपला आनंद कृतीत असेल तर जशी भावना हवी तशी कृती आपण केली तरच ती भावना सापडेल.५. सहज गंमत म्हणून आनंद या विषयाचा अभ्यास करताना मी काही गोष्टींची यादी केली होती. यातील प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला लागू होईल, असे नाही. पण स्वतःत बदल करण्यासाठी त्यातल्या काही गोष्टींवर आपल्याला काम करता येऊ शकते आणि खऱ्या अर्थाने आपण वर्षभर सण साजरा करू शकू. त्या यादीमधील काही गोष्टी म्हणजे स्वतःच्या वृत्तीप्रमाणे वागायचं. अट्टाहास करायचा नाही. जे काम करतो ते आनंदानं करायचं. जे करायलाच हवं आहे ते करून मोकळं व्हायचं. मदत मागण्यात गैर नाही, ती मागायचीच. रोज थोडे थोडे काम करत राहिल्याने आपण बरेच काही साध्य करू शकतो, सातत्य ठेवायचं. अशी बरीच मोठी यादी आहे.

६. आपण दर महिन्याला काही गोष्टी ठरवून केल्या तरी वर्षभरात आपण काही साध्य करू शकतो. मैत्रिणींनी मिळून एक एक गोष्ट केली तरी त्याचा परिणाम मोठा दिसू शकतो. स्वतःसाठी वेळ काढणं, स्वतःच्या शरीराची आणि मनाची काळजी घेणं याचं वाण आजच्या आधुनिक काळात लुटता यायलाच हवं.

ashwinibarve2001@gmail.com

टॅग्स :महिलामकर संक्रांतीआरोग्यफिटनेस टिप्समानसिक आरोग्य