People Pleaser : कुणाला मदत करणं ही एक चांगली माणुसकीची बाब आहे. पण अनेकदा असंही होतं की, काही लोक आपल्या दिलदारपणाचा गैरफायदा घेतात. हे आपल्या लक्षातही येतं, पण त्यांना पुन्हा मदत करण्यासाठी किंवा त्यांचं एखादं काम करण्यासाठी नाही म्हणता येत नाही. जर असं केलं तर त्याचा गिल्टही आपल्या मनात राहतो. एखाद्या कामासाठी तुम्हाला नकार द्यायचा असतो, पण समोरच्याचं मन राखण्यासाठी किंवा संकोचामुळे तुम्ही होकार देता? जर इच्छा नसतानाही तुम्ही इतरांच्या प्रत्येक गोष्टीला हो म्हणत असाल, तर त्याला 'पीपल प्लीजिंग' म्हणतात. आधी तर प्रत्येक गोष्टीला हो म्हणणं चांगलं वाटू शकतं, पण हळूहळू ते मानसिक थकवा, ताण आणि वेळेची नासाडी याचं कारण बनू शकतं. चला जाणून घेऊया अशा 5 प्रभावी टिप्स, ज्या तुम्हाला “नाही” म्हणायला शिकवतील.
स्वतःच्या प्रायोरीटी ओळखा
इतरांना मदत करणं चांगलं आहे, पण स्वतःचं नुकसान करून नाही. कोणी काही मागितलं तर आधी स्वतःच्या कामांची यादी पाहा. स्वतःला विचारा माझ्याकडे वेळ आहे का? यामुळे माझ्या कामात अडथळा येईल का? त्यानंतरच काय तो निर्णय घ्या.
लगेच उत्तर देऊ नका
अनेकदा आपण दबावाखाली लगेच होकार देतो. ही सवय बदलण्यासाठी थोडा वेळ घ्या. उदा. “मी विचार करून सांगतो” किंवा “माझं जमतं की नाही ते पाहून सांगतो.”
नाही म्हणण्याची पद्धत बदला
नाही म्हणणं म्हणजे उद्धटपणा नाही. तुम्ही नम्रपणेही नकार देऊ शकता. लांबलचक कारणं देण्याची गरज नाही. साधं आणि स्पष्ट बोला. जर समोरची व्यक्ती समजदार असेल तर नक्कीच त्याना आपलं म्हणणं समजेल.
अपराधीपणातून बाहेर पडा
अनेकांना वाटतं की नाही म्हटलं तर आपण वाईट व्यक्ती ठरू. पण प्रत्येकाला प्रत्येक वेळी खूश ठेवणं शक्य नाही. वेळेनुसार लोक तुमच्या वेळेचा आणि मर्यादांचा आदर करू लागतात.
छोट्या गोष्टींपासून सुरुवात करा
मोठ्या गोष्टींना नकार देणं अवघड वाटत असेल, तर छोट्या गोष्टींनी सुरुवात करा. उदा. मित्राने न आवडणारा सिनेमा पाहायला बोलावलं तर नम्रपणे नाही म्हणा.