Eatng Chweing While Studying : केवळ भारतातच नाही तर जगभरातील तरूण-तरूणींमध्ये च्युइंग गम खाण्याचा ट्रेंड वाढला आहे. शाळेची बस असो, कॉलेज, मेट्रो किंवा प्रवास सर्व ठिकाणी ते च्युइंग गम चघळताना पाहायला मिळतात. च्युइंग गम खाण्याबाबत अनेक रिपोर्टही समोर येत असतात. आई-वडिलही मुलांना च्युइंग गम खाण्यास मनाई करत असतात. पण आपल्याला माहीत नसेल की, च्युइंग गम खाऊन अभ्यास केल्यास अभ्यासात सुधारणा होते. हा दावा आमचा नाही तर एका संशोधनातून करण्यात आला आहे.
च्युइंग गम खाण्याची सवय
आपण पाहतो की, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना च्युइंग गम चघळण्याची आवड असते. अनेक क्रिकेट खेळाडू आणि सिनेमातील कलाकार देखील च्युइंग गम खाताना दिसतात. अनेकांना प्रवासात किंवा मोकळ्या वेळेत गम चघळायला आवडते. पण याचे अभ्यासातही फायदे होऊ शकतात याचा कुणी विचारही केला नसेल. एका संशोधनानुसार, च्युइंग गम खाऊन अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचा अभ्यासात परफॉर्मन्स अधिक चांगला दिसून आला आहे.
संशोधनात काय समोर आले?
सेंट लॉरेन्स विद्यापीठातील सायकॉलॉजी विभागाचे सहाय्यक प्राध्यापक सर्ज ओनीपर यांनी एक संशोधन केले. या संशोधनात असे दिसून आले की परीक्षेपूर्वी पाच मिनिटं गम चघळणाऱ्या विद्यार्थ्यांनी, गम न चघळणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत परीक्षेत चांगले गुण मिळवले. संशोधनानुसार, च्युइंग गम चघळल्यानं मेंदूमध्ये रक्तप्रवाह वाढतो आणि मेंदू ‘वॉर्म-अप’ होतो. हा परिणाम अंदाजे केवळ २० मिनिटे टिकतो. त्यापेक्षा जास्त वेळ नाही.
आरोग्यासाठी च्युइंग गमचे फायदे
वेबएमडीच्या एका माहितीनुसार, जर च्युइंग गममध्ये साखर असेल तर दातांचं नुकसान होऊ शकतं. पण शुगर-फ्री गम चघळल्यानं तोंड कोरडं पडण्याची समस्या कमी होऊ शकते. याशिवाय च्युइंग गम चघळल्याने थोड्या प्रमाणात कॅलरी बर्न होतात, ज्यामुळे वजन नियंत्रित ठेवण्यास मदत मिळते.
मेंदूपर्यंत रक्तप्रवाह वाढल्याने स्मरणशक्ती सुधारते आणि स्ट्रेस कमी होतो. थकवा जाणवत असल्यास गम चघळल्याने अलर्ट आणि सक्रिय राहण्यास मदत मिळते.
एक्सपर्ट्सच्या मते, च्युइंग गम चघळणं फक्त ट्रेंड नाही, तर शरीर आणि मेंदूसाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकतं.