Join us  

काय रडूबाई! फार पटकन रडू येतं म्हणून उदास होऊ नका; डॉक्टर सांगतात डोळ्यांत पाणी का येते..

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2021 7:53 PM

डोळ्यात सतत पाणी येतं, चटकन रडू येतं हा आजार नाही. पण म्हणून डोळ्यांच्या आजाराकडे दुर्लक्ष करू नका..

अनेक बायकांना रोजच्या जीवनात लहान सहान कारणांमुळे रडण्याची सवय असते. रडून रडून तब्येतीवर वाईट परिणाम होईल की काय असं वाटू शकतं. अनेकदा डार्क सर्कल्स रडण्यामुळे येतात असाही समज  होतो. पण रडण्याचे जसे तोटे आहेत तसे काही फायदेही आहेत. मन मोकळं होतं, ताण हलका होतो यापलिकडे काही फायदे आहेत जे रडल्यामुळे शरीराला मिळतात आणि डोळ्याचं आरोग्य चांगलं राहतं. डोळ्यांसाठी काही प्रमाणात लाभदायी असतात कारण डोळे ल्युब्रिकेटेड ठेवण्यासाठी आणि डोळ्यात गेलेले बाहेरील कण काढून टाकण्यासाठी ते उपयुक्त असतात. मुंबईतील डॉ. अग्रवाल आय हॉस्पिटलच्या क्लिनिकल सेवा विभाागाच्या प्रमुख डॉ. निता शाह यांनी डोळ्यातून पाणी येण्यामागचे विज्ञान विस्तृतपणे सांगितले. 

वैद्यकीय शास्त्रात रडण्याव्यतिरिक्त चेहऱ्यावर अश्रू येण्याला एपिफोरा असे म्हणतात. हे एका आजाराचे लक्षण आहे, ज्यात डोळ्यात अपुऱ्या टिअर फिल्म ड्रेनेज तयार होतात. या परिस्थितीत अश्रू नॅसोलाक्रिमल सिस्टिमच्या माध्यमातून जाण्याऐवजी चेहऱ्यावर ओघळतात.डॉ. निता शाह म्हणतात. “अश्रूंची प्रमाणापेक्षा अधिक निर्मिती आणि कोंडलेल्या वाहिन्या यामुळे डोळ्यातून पाणी येते. बाळांमध्ये, कोंडलेल्या वाहिन्या हे सर्वसाधारण आढळणारे कारण आहे. काही बालकांमध्ये जन्मजात अविकसित वाहिन्या असतात, काही आठवड्यांनी या पूर्ण विकसित झाल्यावर त्या रिकाम्या होतात. अश्रूवाहिनी निमुळती झाली असेल किंवा कोंडली असेल तर संसर्ग होण्याचा धोका असतो. परिणामी, अश्रूंच्या पिशवीत अश्रू साचून राहू शकतात. प्रौढांमध्ये आणि मोठ्या मुलांमध्ये अश्रूंची अतिनिर्मिती हे सामान्यपणे आढळणारे कारण असते.”

१. डोळ्यात काही गेले तर सामान्य तापमान असलेल्या स्वच्छ पाण्याने डोळे धुवावे आणि रुग्णाने डोळे चोळू नये. हे केल्यानंतरही डोळ्यात गेलेले बाहेरचे काही डोळ्यातच असल्याची जाणीव कायम असेल तर रुग्णाने नेत्रविकारतज्ञाचा सल्ला घ्यावा. २. ल्युब्रिकेशनसाठी कृत्रिम अश्रू, अँटिबायोटिक ड्रॉप्स वापरून ते कण बाहेर काढावेत. रासायनिक घटकांमुळे इजा झाली असेल तर भरपूर स्वच्छ पाणी घेऊन डोळा धुवावा आणि रुग्णाने नेत्रविकारतज्ञाची भेट ताबडतोब घ्या.डोळ्यातून पाणी येण्याच्या संबंधित काही सर्वसामान्यपणे आढळणाऱ्या समस्या-अॅलर्जिक कंजंक्टिव्हायटिस म्हणजेच डोळे येणे ही स्थिती एका ॲलर्जीमुळे उद्भवते जी शरीराच्या रोगप्रतिकारक यंत्रणेच्या प्रमाणापेक्षा अधिक दिल्या गेलेल्या प्रतिसादामुळे निर्माण होते. त्यामुळे डोळ्यातून पाणी येणे, डोळ्यात खाज येणे, डोळे लाल होणे, आणि पाहताना त्रास होणे हे परिणाम होतात. ३. संसर्गजन्य कंजन्क्टिव्हायटिसमध्ये डोळेलाल होणे, वेदना होणे, प्रकाशाकडे बघण्यास त्रास होणे, चिकटपणा जाणवणे, चिकट द्रव बाहेर येणे ही लक्षणे दिसू शकतात. हा संसर्ग कोणत्याही उपचाराविना एका आठवड्यात बरा होऊ शकतो. डोळ्यात शुष्कपणा येणे डोळ्यात शुष्कपणा येण्यासाठी अनेक घटक कारणीभूत असू शकतात. यात शरीराकडून अश्रूंची पुरेशी निर्मिती न होणे, अश्रू पटकन सुकणे, पाणी आणि म्यूकस यांचे योग्य संतुलन नसणे, वाहता वारा थेट डोळ्यात जाणे, वाढलेले वय आणि काही आजार (थायरॉईड आय आजार, गंभीर स्वरूपाचा सायनस, ऱ्ह्युमेटॉइड आर्थरायटिस, जॉग्रेन्स सिण्ड्रोम, एसएलई इत्यादी) यांचा समावेश आहे. या परिस्थितीमध्ये डोळे अधिक अश्रू निर्माण करून प्रतिसाद देतात.४. डोळ्यात पाणी येण्यासाठी पापण्यांच्या समस्याही कारणीभूत असू शकतात. यात पापण्यांच्या कडेचा भाग वळणे किंवा पापण्यांच्या कडा बाहेरच्या बाजूस वळणे किंवा पापण्या अपुऱ्या बंद होणे इत्यादींचा समावेश आहे. धूळ, रेती, कीटक, कॉन्टॅक्ट लेन्स यामुळे कॉर्नियाला (नेत्रपटल) चरा पडू शकतो. अशा परिस्थितीत संसर्ग वाढू नये यासाठी रुग्णाने नेत्रविकारतज्ञाची ताबडतोब भेट घ्यावी.५. पापण्यांच्या कडांजवळ असलेल्या ग्रंथी कोंडल्यास किंवा त्यांना संसर्ग झाल्यास ब्लेफरायटिस होऊ शकतो. अशा परिस्थितीत रुग्णांच्या डोळ्यातून पाणी येऊ शकते, डोळे लाल होऊ शकतात, डोळ्यांमध्ये खाज येऊ शकते आणि पापण्यांच्या वर कोंडा जमा होऊ शकतो. ब्लेफरायटिसशी संबंधित रांजणवाडी ही लाल रंगाची सुजलेली पुळी असते जी पापण्यांच्या कडेला तयार होते आणि बाहेरील पापण्यांच्या जवळ असते किंवा आत असते किंवा पापण्यांच्या खाली असते (अंतर्गत) आणि तैल ग्रंथींना सूज. 

टॅग्स :मानसिक आरोग्यआरोग्यहेल्थ टिप्स