तू आळशीच आहेस, काम वेळेवर करता येत नाही, झोपा काढतेस अशी वाक्य तुम्हालाही ऐकावी लागतात का? एखाद्याबद्दल असे मत पटकन तयार होते. अर्थात जगात आळशी लोकं आहेतच नाही असे नाही. मात्र अनेकदा थकलेल्या जीवालाही आळशी समजले जाते. आळस आणि थकवा हे समानच वाटले तरी त्यामागची कारणे आणि परिणाम वेगवेगळे असतात. आळस कमी करायलाच हवा, मात्र जर व्यक्ती थकलेली असेल तर तिला आरामाची गरज असते. (Avoiding work means you're tired or just lazy? See the difference and a cool trick to increase energy)आळस आणि थकवा यातील फरक समजून घेणे फार महत्वाचे असते. शारीरासाठीही आणि मानसिक आरोग्यासाठीही. काम असूनही सतत टाळाटाळ करणे, पुढे ढकलणे किंवा निष्क्रिय राहणे हे आळसाचे लक्षण आहे. यात शारीरिक थकवा नसतो, पण मानसिक अनुत्साहामुळे कामाची गती मंदावते. थकवा मात्र शरीराशी निगडित असतो. दीर्घकाळ शारीरिक किंवा मानसिक श्रमांमुळे ऊर्जा कमी होणे, अंग जड वाटणे, लक्ष केंद्रित न होणे ही थकव्याची लक्षणे आहेत. थकव्यामुळे शरीराला विश्रांतीची गरज भासते, तर आळसामुळे कार्यक्षमता असूनही प्रयत्न करायला व्यक्ती पुढे सरकत नाही.
फरक ओळखताना स्वतःकडे प्रामाणिकपणे पाहणे आवश्यक आहे. एखाद्या कामापूर्वी जर शरीरात दमल्यासारखे वाटत असेल, डोळे जड झाले असतील, झोप पूर्ण नसेल तर ते थकव्याचे लक्षण असते. पण वेळ असूनही सोशल मीडियावर ऑनलाइन राहण्याला तुम्ही महत्व देत असाल तर तो आळसच आहे. 'आत्ता नको नंतर करते' अशी सततची सबब शोधणे हे आळसच दर्शवते. थकवा हा विश्रांतीनंतर कमी होतो, तर आळसाला प्रेरणा आणि शिस्तीची गरज असते.
उपाय म्हणून थकव्याला योग्य झोप, पौष्टिक आहार आणि नियमित व्यायाम हेच औषध आहे. ताणामुळे कष्टामुळे शरीर थकल्यावर त्याला योग्य विश्रांतीची गरज असते, ती मिळायलाच हवी. शरीराला विश्रांती दिली तर उर्जेचा साठा पुन्हा पुर्ववत होतो. आळसावर मात करण्यासाठी लहान लहान पावले उचला. कामं वेळेवर पूर्ण करण्याची सवय लावा. मनात येणाऱ्या टाळाटाळीला आवर घालण्यासाठी कामाचे वेळापत्रक आखावे आणि स्वतःला थोडे बक्षीस द्यावे. प्रेरणादायी वाचन, सकारात्मक संगत आणि आत्मशिस्त हेच आळसावरचे खरे उपाय आहेत.