Join us
Daily Top 2Weekly Top 5

दिवसरात्र डोक्यात विचार सुरुच? डोक्यात कलकलाट-मन सतत सैरभैर ‘हा’असेल त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2026 18:32 IST

Are you constantly thinking day and night? Is there a constant buzz in your head? see what to do : मानसिक आरोग्यासाठी अतिविचार चांगला नाही. पाहा कसा थांबवावा.

"सारखं कसलं तरी टेन्शन घेत राहता?" हे वाक्य आपण अनेकदा ऐकतो किंवा स्वतःलाच म्हणतो. बाहेरुन पाहीलं तर आयुष्य सुरळीत चाललेलं असतं, पण डोक्यात मात्र सतत विचारांचा घोळ सुरु असतो. एक विचार संपतो न संपतो तोच दुसरा उगवतो. (Are you constantly thinking day and night? Is there a constant buzz in your head?  see what to do)भविष्याची चिंता, भूतकाळाची खंत आणि वर्तमानातला ताण यामध्ये मन अडकून पडतं. हा सततचा मानसिक गोंधळ केवळ स्वभावाचा भाग नसून त्यामागे काही ठराविक कारणं असतात.

डोक्यात सतत विचारांचा कल्लोळ होण्यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे मानसिक ताणतणाव. कामाचा दबाव, आर्थिक चिंता, नातेसंबंधांमधील तणाव किंवा अपेक्षांचं ओझं यामुळे मेंदू कायम अलर्ट मोडमध्ये राहतो. मनाला विश्रांती मिळत नाही आणि त्यामुळे विचार थांबत नाहीत. काही लोकांचा स्वभावच असा असतो की ते प्रत्येक गोष्टीचा फार खोल विचार करतात. छोट्या गोष्टीही डोक्यात मोठ्या करुन पाहील्या जातात आणि त्यातून टेन्शन वाढत जातं.

आजच्या डिजिटल जीवनशैलीमुळेही हा घोळ अधिक वाढतो. सतत मोबाइल, सोशल मीडिया, बातम्या आणि तुलना यामुळे मेंदूवर प्रचंड माहितीचा मारा होत असतो. मेंदूला प्रक्रिया करण्यासाठी वेळच मिळत नाही. झोप अपुरी झाली की हा विचारांचा गोंधळ आणखी तीव्र होतो. नीट झोप न मिळाल्याने मेंदू थकतो आणि नकारात्मक विचार जास्त सक्रिय होतात.

प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या मते, सतत टेन्शन घेणं म्हणजे मेंदूच्या विचार नियंत्रण यंत्रणेचा थकवा होय. ते सांगतात की, "जेव्हा माणसाला मनाला विश्रांती देण्याची सवय नसते, तेव्हा मेंदू सतत समस्या शोधत राहतो, जरी प्रत्यक्षात त्या क्षणी काही गंभीर अडचण नसली तरी." त्यांच्या मते, अनेकदा लोक चिंता आणि जबाबदारी यांच्यात गल्लत करतात. जबाबदारी आवश्यक असते, पण सतत चिंता करणं मेंदूसाठी घातक ठरतं.

डोक्यातील घोळ वाढण्यामागे दडपलेल्या भावना हेही एक महत्त्वाचं कारण आहे. राग, दुःख, भीती किंवा निराशा व्यक्त न करता आत साठवली गेली तर ती विचारांच्या स्वरुपात बाहेर येते. "हे असं का झालं?", "मी असं का केलं?", "उद्या काय होईल?" अशा प्रश्नांची साखळी सुरु होते आणि मन थांबतच नाही. यालाच ओव्हरथिंकिंग असं म्हणतात.

हा विचारांचा गुंता कमी करण्यासाठी सर्वात आधी स्वतःला थांबवणं गरजेचं असतं. प्रत्येक विचाराला तितकंच महत्त्व द्यायची गरज नसते, हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. शरीर आणि मन यांचा थेट संबंध असल्यामुळे चालणं, हलका व्यायाम, श्वसनावर लक्ष केंद्रित करणं किंवा शांतपणे बसून थोडा वेळ स्वत:शी संवाद साधणं उपयोगी ठरतं. झोपेची वेळ ठरवणं आणि स्क्रीनपासून थोडा ब्रेक घेणं मेंदूला आराम देतं.  प्रत्येक गोष्टीचा अतिविचार करणं म्हणजे स्वतःला त्रास देणंच आहे. त्यामुळे त्यावर उपाय करणं तज्ज्ञांशी बोलणं गरजेचं आहे.  

English
हिंदी सारांश
Web Title : Overthinking: Constant Thoughts? Reasons and Solutions for Mental Clutter

Web Summary : Constant overthinking stems from stress, digital overload, and suppressed emotions. It leads to mental fatigue. Experts advise relaxation, exercise, managing sleep, and seeking help to break the cycle and find peace.
टॅग्स :मानसिक आरोग्यमहिलासोशल व्हायरलआरोग्यहेल्थ टिप्स