Anger Side Effects On Body : राग येणं किंवा चिडचिड होणं स्वाभाविक आहे. एखाद्याने आपलं काही ऐकलं नाही, जर आपल्या मनासारखं काही झालं नाही, समोरच्या व्यक्तीने काही चूक केली असेल किंवा मग आपल्याकडून एखादं काम बरोबर होत नसेल तर राग येणं किंवा चिडचिड होणं काही नवीन नाही. काहींना कधी-कधीच राग येतो, तर काही लोकांचा स्वभावच चिडका असतो. ते छोट्या छोट्या गोष्टींवर चिडत राहतात. ही अशी एक मानवी भावना आहे ज्यावर नियंत्रण मिळवणं सगळ्यांनाच शक्य असतं असं नाही. बरं प्रत्येकाची राग व्यक्त करण्याची पद्धतही वेगळी असते. कुणी ओरडून राग व्यक्त करतात तर कुणी मनातल्या मनात बडबड करून राग व्यक्त करतात. पण बऱ्याच लोकांना हे माहीत नसतं की, काही क्षणांचा हा राग आपल्या शरीराचं किती नुकसान करतो. राग हा केवळ मनासाठीच नाही तर शरीरासाठीही खूप घातक असतो. तो कसा हे समजून घेऊया.
रागाने नाती बिघडतात हे तर आपल्याला माहीत असेलच, पण सोबतच हार्मोन, हृदय, पचन आणि मेंदूवरही नकारात्मक प्रभाव पडतो. हल्लीच्या लाइफस्टाईलमुळेही रागाचं प्रमाण वाढलं आहे. कामाचा वाढता ताण, झोपेची कमतरता आणि चिडचिड यामुळे राग येतो. भलेही राग येणं ही एक भावना असली तरी, यावर कंट्रोल करणंही तेवढंच महत्वाचं आहे. अशात आज आपण रागावर नियंत्रण कसे मिळवाल याचे काही उपाय सांगणार आहोत, सोबतच हेही जाणून घेऊया की याचा शरीरावर काय प्रभाव पडतो.
जास्त रागाने काय होतं?
जेव्हा आपल्याला राग येतो, तेव्हा शरीरात वेगाने हार्मोन असंतुलित होतात. तणाव वाढवणारे एड्रेनालिन आणि कार्टिसोल हार्मोन अधिक वाढतात. सोबतच हृदयाचे ठोकेही वेगाने वाढतात. तणावामुळे रक्तवाहिन्यांवर दबाव पडतो आणि पचनक्रिया स्लो होते. आपण अनुभवलं असेल की, रागाच्या भरात अनेक लोक ताटावरून उठून जातात. याचं कारण पचनक्रिया स्लो होणं हेच आहे. रागाचा प्रभाव इतक्यावरच थांबत नाही तर राग आल्यावर मेंदूचा निर्णय घेणारा भाग कमजोर होतो आणि कमी सक्रियतेने काम करतो. काही रिसर्च सांगतात की, हाय बीपी, हृदयरोग, मायग्रेन, अॅसिडिटी आणि झोपेची समस्या अधिक होते.
कसं कंट्रोल कराल?
राग आल्यावर सगळ्यात आधी तर मोठा श्वास घ्या. मोकळ्या ठिकाणी जाऊन श्वास घेण्याचा प्रयत्न करा. हात बाहेरच्या बाजूने झटका, असं केल्याने शरीरातील तणाव आणि राग कमी होण्यास मदत मिळेल. विज्ञान सु्द्धा हेच सांगतं की, कोणत्याही गोष्टीवर राग व्यक्त करण्याआधी स्वत:ला ९० सेकंद रोखा. याने राग हळूहळू कमी होतो आणि गोष्टी सुद्धा समजू लागतात.
