रुचिका पालोदकर
पाकिस्तानात सर्जिकल स्टाइल करत केलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर जी पत्रकार परिषद पार पडली त्यानंतर दोन नावं चर्चेत आली आणि ती म्हणजे विंग कमांडर व्योमिका सिंह (Wing Commander Vyomika Singh)आणि सोफिया कुरैशी. भारतीय महिलांच्या हिमतीचे आणि शौयाचे दोन चेहरे. आत्मविश्वास आणि देशप्रेमाची प्रतीकच जणू. त्या दोघींपैकी व्याेमिका नेमक्या कोण आणि त्यांची पायलट होण्याची गोष्ट अतिशय प्रेरणादायी आहे. (operation sindoor)
व्योमिका सिंह या अतिशय धडाडीच्या पायलट म्हणून ओळखल्या जातात. काही वर्षांपुर्वी झालेल्या त्यांच्या एका मुलाखतीचा भाग सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये त्या सांगतात की लहानपणी सहावी- सातवीत असताना शाळेत एकदा एक शिक्षिका प्रत्येक विद्यार्थ्याला आपापल्या नावाचा अर्थ विचारत होत्या. व्यामिका यांनी सांगितलं की 'व्योम' या शब्दाचा अर्थ 'आकाश' असा होतो. तेवढ्यात मागून कोणीतरी खोडसाळ प्रश्न विचारला आणि म्हटलं की मग तू काय आता अवकाशाची राणी आहेस? तो प्रश्न ऐकून त्या चमकल्या आणि तेव्हापासूनच पायलट होण्याची ज्योत त्यांच्या मनात प्रज्ज्वलित झाली. त्या म्हणतात की तेव्हापासूनच त्यांनी ठरवून टाकलं होतं की मी माझ्या नावाप्रमाणे अवकाशात राज्य करणार आणि पायलट होणार.. त्या दिवशी पहिल्यांदा पाहिलेलं स्वप्न आज त्या जगत आहेत..
जिगरबाज व्यक्तिमत्त्व म्हणून व्योमिका ओळखल्या जातात. २५०० पेक्षाही जास्त तास हेलिकॉप्टर उड्डाण करण्याचा त्यांचा अनुभव आहे. आजवर जम्मू काश्मीर आणि उत्तर- पूर्व या डोंगराळ भागांमध्ये झालेल्या कित्येक मोहिमांमध्ये त्यांनी मुख्य भूमिका निभावलेली आहे. उंच पहाडी भागांमध्ये उड्डाण घेणे यामध्ये त्या निष्णात आहेत. २०२१ मध्ये २१ हजार ६५० फूट उंच माऊंट मनी रंग या मोहिमेतही त्यांची विशेष भूमिका होतील. ऑल वुमन माऊंटन एक्सपिडेशनचाही त्या महत्त्वाचा भाग होत्या. त्यांच्या धडाडीमुळे आणि त्यांच्या कामामुळे चीफ ऑफ एअर स्टाफ आणि एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ यांच्या हस्ते त्यांना गौरविण्यातही आले आहे. त्यांच्या कार्याचा भारताला नेहमीच अभिमान असेल..