स्वप्न फक्त पाहिल्याने पूर्ण होत नाहीत. त्यासाठी कष्ट घ्यावे लागतात. कला सादर करावी लागते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे पंजाबच्या मोगा जिल्ह्यातल्या एका छोट्या खेड्यातून आलेली परमजीत कौर उर्फ 'PARAM'. वयाने लहान आणि एका खेड्यात राहणारी परम आज सोशल मीडियावर आणि संगीतविश्वात चर्चेत आहे. (Who is the ultimate panjabi rapper 'That Girl' PARAM? she is trending on social media, People went crazy with her very first song)तिचा आवाज, तिचं धाडस, आणि तिच्या गीतांमधून व्यक्त होणारा आत्मविश्वास यामुळे तिला लोकांचे प्रेम मिळत आहे.
परम फार सामान्य आणि गरीब कुटुंबात जन्माला आली. तिचे वडील मजूरी करतात, तर आई घरकाम. घरात आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नसूनही, परमला तिच्या आईचा पूर्ण पाठिंबा मिळाला. त्यामुळे परमने स्वप्न पाहणे थांबवले नाही. तिला बालपणापासूनच संगीताची आवड होती, विशेषतः रॅप आणि हिप-हॉप या वेगळ्या शैलीत रस होता. तिच्या गावात मुलींनी रॅप करणे हे अजिबातच साधारण नाही, पण परमने त्या सगळ्या सामाजिक चौकटी मोडल्या. परम सांगते, काहीतरी वेगळं करायची इच्छा होती. म्हणून गाणे लिहिले त्याला चाल लावली आणि मित्रमैत्रिणींना ऐकवले. त्यांना ते फार आवडलं. म्हणून मग एक पाऊल पूढे जाऊन आणखी गाणी लिहिली.
तिने तिचं पहिलं गाणं 'That Girl' प्रसिद्ध केलं, आणि काही दिवसांतच ते इंटरनेटवर जबरदस्त व्हायरल झालं. या गाण्याने तिला केवळ प्रसिद्धी नाही मिळवून दिली, तर ती पंजाबमधील नव्या पिढीच्या महिला कलाकारांसाठी प्रेरणा ठरली. या गाण्याचा संगीतनिर्माता Manni Sandhu आहे, आणि त्यांच्या जोडीने तयार झालेलं हे गाणं जगभरातील पंजाबी संगीतप्रेमींना भावलं.
"मला फक्त माझ्या आई-वडिलांसाठी एक सुंदर घर बांधायचं आहे. जेथे ते निवांत बसू शकतील अशी जागा त्यांच्यासाठी तयार करायची आहे. परिवाराला आनंदी पाहायचे आहे आणि हा माझा खरा उद्देश आहे." असे बीबीसी पंजाबीशी संवाद साधताना परमने सांगितले. तसेच तिच्या आईनेही त्यांना परमचा अभिमान वाटतो आणि परमला असेच यश मिळावे अशी इच्छा व्यक्त केली. सोशल मिडियावर २०२५ मध्ये व्हायरल होणाऱ्या गाण्यांच्या यादीत परमच्या गाण्याचाही समावेश असेल.