आजकाल सगळीकडे प्लास्टिक कचऱ्याची समस्या खूप वाढली आहे. रस्त्यावर, नदी-नाल्यांमध्ये आणि शहरांच्या कचरा पेटीमध्ये प्लास्टिकचे ढीग साचलेले दिसतात. या प्लास्टिकमुळे पर्यावरणाचं मोठं नुकसान होत आहे. अनेक ठिकाणी हा कचरा जाळल्यामुळे विषारी धूर बाहेर पडतो, त्यामुळे लोकांच्या आरोग्यावरही वाईट परिणाम होत आहे. लोकांना श्वास घेण्यास त्रास होतो आणि फुफ्फुसांचे आजार होतात.
प्लास्टिक कचऱ्याच्या गंभीर समस्येवर केनियातील एका हुशार इंजिनिअरने एक कमाल उत्तर शोधून काढलं आहे. न्झांबी माती या महिलेने यावर जबरदस्त उपाय शोधून काढला आहे. टाकून दिलेल्या प्लास्टिक कचऱ्यापासून घरं बांधण्यासाठी टिकाऊ विटा तयार केल्या आहेत. तिने जेंज मेकर्स नावाची कंपनी सुरू केली आहे. ही कंपनी दररोज जवळपास ५०० किलो प्लास्टिक कचरा गोळा करते.
कचऱ्याचा योग्य वापर केला जातो. इतर कंपन्या ज्या प्लास्टिकवर प्रक्रिया करू शकत नाहीत, ते प्लास्टिक इथे वापरलं जातं. या प्लास्टिकला वाळूसोबत एकत्र केलं जातं आणि खूप जास्त तापमानाला (जवळपास ३६०°C) दाब देऊन त्याच्या विटा तयार होतात. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे या विटा साध्या कॉंक्रिटच्या विटांपेक्षा तब्बल सात पट जास्त मजबूत आहेत. त्या लवकर तुटत नाहीत, हलक्या असतात आणि त्यांची किंमतही कमी आहे.
रस्त्यांवर पडलेले आणि जाळले जाणारे प्लास्टिक आता इमारतीच्या कामात वापरले जात आहे. यामुळे हवेमध्ये विषारी धूर मिसळणं थांबलं आहे आणि लोकांचं आरोग्य सुरक्षित राहिलं आहे. या प्रकल्पामुळे स्थानिक तरुणांना आणि महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळाला आहे. तसेच, या स्वस्त आणि मजबूत विटांमुळे लोकांना परवडणाऱ्या दरात घरं बांधणं शक्य झालं आहे.
न्झांबी मातीला तिच्या या अद्भुत कामासाठी संयुक्त राष्ट्रांचा (UN) 'यंग चॅम्पियन ऑफ द अर्थ' पुरस्कारही मिळाला आहे. तिने दाखवून दिलं आहे की, 'कचरा' ही केवळ समस्या नसून, एका चांगल्या आणि सुरक्षित भविष्याचा तो 'पाया' असू शकतो. तिने टाकाऊपासून टिकाऊ कसं असतं याचं उत्तम उदाहरण सर्वांसमोर ठेवलं आहे. त्याच्यापासून अनेकांना प्रेरणा मिळत आहे.
