केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) क्रॅक करणं सोपं नाही, विशेषतः जेव्हा तुमच्याकडे संसाधनांची कमतरता असते. दरवर्षी UPSC नागरी सेवा परीक्षा घेतली जाते पण काहीच जण ती पास होतात. अनेक आव्हानांना तोंड देऊन आपलं स्वप्न पूर्ण करतात. अशीच एक प्रेरणादायी गोष्ट आता समोर आली आहे. महाराष्ट्रातील सोलापूरची रहिवासी असलेल्या स्वाती मोहन राठोड मोठं यश मिळवलं आहे.
स्वातीचे वडील भाजी विकायचे, ज्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह केला जायचा. तिची आई गृहिणी आहे. आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबातून आलेली स्वातीला सुरुवातीपासूनच शिक्षण घेण्यात अडचण येत होती. मूलभूत साधनसंपत्तीचा अभाव होता, परंतु असं असूनही, स्वातीने फक्त स्वप्न पाहिलं नाही तर ते मेहनतीने साकारही केलं.
अभ्यासात खूप हुशार
स्वातीने तिचं सुरुवातीचं शिक्षण सरकारी शाळेतून पूर्ण केलं. स्वाती सुरुवातीपासूनच अभ्यासात खूप हुशार होती. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर स्वातीने पदवी आणि नंतर भूगोल विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. तिच्या पालकांना विश्वास होता की, त्यांची मुलगी भविष्यात त्यांचं नाव उज्ज्वल करेल. म्हणूनच त्यांनी स्वातीसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले.
आईने गहाण ठेवले दागिने
स्वातीने मनाशी ठरवलं होतं की, आता यूपीएससीची तयारी करेल, कारण याद्वारे ती तिच्या आणि तिच्या कुटुंबाच्या जीवनात बदल घडवू शकते. अनेक समस्या असूनही तिने यूपीएससीची तयारी सुरू केली. स्वातीला तीन बहिणी आणि एक भाऊ आहे. स्वातीने सलग ५ वेळा यूपीएससी परीक्षा दिली. अनेक वेळा नापास होऊनही तिने हिंमत गमावली नाही. एकेकाळी तिच्या कुटुंबाची परिस्थिती अशी झाली होती की स्वातीच्या शिक्षणासाठी आणि कुटुंबाच्या पालनपोषणासाठी तिच्या आईला दागिने गहाण ठेवावे लागले, कारण स्वातीचे वडील तिच्या कुटुंबातील एकमेव कमावते होते.
कठोर परिश्रमाला फळ
असंख्य अडचणी आणि वर्षांच्या संघर्षानंतर स्वाती आणि तिच्या पालकांच्या कठोर परिश्रमाला फळ मिळालं. स्वातीने UPSC CSE २०२३ परीक्षेत ऑल इंडिया रँक ४९२ मिळवला. स्वातीच्या यशाच्या संघर्षाची गोष्ट केवळ तिच्या गावासाठी, कुटुंबासाठी आणि शहरासाठीच नाही तर जीवनात चांगल्या गोष्टी साध्य करण्यासाठी आणि कठोर परिश्रमाने आपली स्वप्नं पूर्ण करणाऱ्या प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे.